नटरंग - आनंद यादव | Natrang - Anand Yadav | Marathi Book Review



पुस्तक नटरंग
लेखक आनंद यादव
पृष्ठसंख्या २०
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस 
समीक्षण आकाश तानाजी जाधव
मूल्यांकन ५ | ५




महाराष्ट्रातून लोप पावत चाललेल्या 'तमाशा' लोककलेतील कलावंतांची शोकांतिका मांडणारी मराठी साहित्यातील महत्वपूर्ण कादंबरी.


महाराष्ट्रातील जत्रांमध्ये आजही तमाशांचे खेळ प्रचंड रंगतात. प्रसिद्ध फडाचा गावच्या जत्रेत खेळ आणण्यासाठी नेतेमंडळींना त्यांचे राजकीय आणि सामाजिक वजन देखील वापरावे लागत असे. तमाशाकडे नेहमीच अश्लीलतेच्या भिंगातुनच बघितले जाते. त्यात तथ्य असले तरी तमाशा सादर करणारे देखील कलावंतच असतात. तमाशात काम करणाऱ्यांकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. तमाशात काम हे 'इभ्रतीचे' नाही. मराठी माणूस नाटक बघायला कुटुंबासोबत जाऊ शकतो तसा तो तमाशा बघायला जाऊ शकत  नाही. तमाशा हा काही कौटुंबिक कार्यक्रम नाही, पुरुषांच्या मनोरंजनासाठी मांडलेला तो खेळ. पण त्याकडे कधी लोककला म्हणून बघितलंच गेलं नाही. तमाशा सादर करणारे लोक नक्की कोण आहेत? ते कुठून आलेत? त्यांच्या कुटुंबाचं काय? त्यांचं भविष्य काय? त्यांच्या अंगी खरंच कलागुण आहेत का ते फक्त त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रपंच करत आहेत? 'नटरंग' कादंबरी या सर्व प्रश्नांवर भाष्य करते.   


नटरंग ची कथा काल्पनिक असली तरी तिला वास्तवाची किनार आहे. लेखक आनंद यादव कोल्हापुरातील कागल गावचे. त्यांचा घराजवळ असलेल्या मांगवाड्यात त्यांनी तमाशाच्या तालमी बघितल्या. गावात असलेल्या गहिनीनाथ (गैबी) च्या देऊळात दरवर्षी होणाऱ्या उरुसात मांगवाड्यातील तरुण जमून गाणी, तमाशा सादर करून पैसे कमवत असतं. लेखक आनंद यादव यांनी अनेक वर्ष हि दृश्य पाहिली. ते अनेक तमाशा कलावंतांना भेटले आणि नटरंगची पार्श्ववभूमी तयार झाली. 


स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापुरातील कागल गावात कथेची सुरुवात होते. गुणा कागलकर आपल्या परिवारासोबत म्हणजेच बायको दारका, वडील बाळू, अंधळी आई बायना आणि मुलं यांच्यासमवेत मांगवाड्यात राहतो. गुणाचा मोठा भाऊ मिलिटरीमध्ये असताना युद्धात बेपत्ता झाला आहे. गुणा दिवसभर शिरपतरावच्या शेतावर काम करून हजेरी कमावतो. मांगवाड्यात आधीच अठराविश्वे दारिद्र्य, लोकांच्या हाताला काम नाही त्यात नवीनच आलेल्या मोटारीमुळे अनेकांचा रोजगार गेला. आईच्या डोळ्यांचं ऑपेरेशन करण्यासाठी लागणारे २५० रुपये गुणाकडे नाहीत त्यामुळं ऑपेरेशन 'बघू नंतर' स्थितीत आहे. असं असलं तरीही गुणाचा स्वभाव राजेशाही आहे त्याला तमाशाची भलतीच झिंग आहे. तमाशा बघण्यासाठी तो अर्धी हजेरी खर्च करायला देखील मागंपुढं बघत नाही.        


गुणाच्या वडिलांना तो आपला मुलगा नसल्याचा संशय आहे कारण तो त्यांच्या सगळ्यात उजवा आहे. त्यासाठी तो बायनाला अजूनही शिव्या देतो. रोजगार नसल्याने पुढं जाऊन गुणा आणि मांगवाड्यातील इतर तरुण मिळून तमाशा सुरु करण्यासाठी आणाभाका घेतात. वाद्यांची जुळवा जुळव करण्यासाठी कधी पैसे गोळा करतात तर कधी गावातील वस्तू गायब होतात. नंतर तालमी सुरु होतात. तालमीतील गमती भयाण वास्तवापासून त्यांना दूर नेतात. पावसामुळं बंद पडलेली तालीम पुन्हा सुरु तर होते पण तमाशात बाई नाही तर तमाशा कोण बघायला येणार? या प्रश्नाचं समाधान शोधण्यासाठी प्रत्येक जण तमाशासाठी बाई शोधायला वेगवेगळ्या गावात जातात प्रसंगी मार  देखील खातात. शेवटी पांडबाच्या ओळखीतील यमुनाबाई त्यांच्या मुलींसोबत म्हणजेच नयना आणि शोभना सोबत काम करायला तयार होतात. पण त्यासाठी नयनाची अट आहे कि सोंगाड्यासोबत एक 'नाच्या' पाहिजेच तरंच त्या काम करतील. नाच्या होण्यासाठी कोणीही तयार होत नाही हे बघून पांडबा शेवटी गुणाला गळ घालतो. गुणाला तमाशातील राजाचे पात्र साकारायचे असल्यामुळं नाच्या होण्यासाठी त्याचं मन चलबिचल होतं. पण शेवटी नाच्या बनून बायकी हावभाव करण्याची कला त्याला सोडून इतर  कोणालाच जमणार नाही म्हणून तो नाच्या व्हायचं ठरवतो. नयना त्याला बायकी हावभाव, चाल शिकवते. 


गावच्या उरुसात पहिला खेळ रंगतो, गावकरी देखील गावातल्या पोरांनी सुरु केलेला तमाशा म्हणून प्रोत्साहन देतात. पण आपल्या मुलाने नाच्या होऊन घराण्याची इभ्रत वेशीवर टांगली या दुःखात गुणाचे वडील गळफास लावून आत्महत्या करतात. पुढे २-३ वर्षात फड चांगलाच लोकप्रिय होतो, अनेक गावच्या जत्रेच्या सुपाऱ्या त्यांना मिळू लागतात. पावसाळा सोडला तर वर्षभर गुणा आणि इतर मंडळी फिरतीवर असत. त्यामुळं त्याचं दारकीकडे दुर्लक्ष होऊ लागतं. तिच्याकडे गाव वेगळ्या नजरेने बघू लागतं. नाच्याची बायको म्हणून हिणवलं जातं, नको नको ते आरोप केले जातात, भांडणं होतात. पण दारकीला संभाळायला तिला आधार द्यायला गुणा जागेवर नाही, त्याचा पत्ता नाही. तमाशा परिषदेकडून गुणाला पुरस्कार मिळतो त्यात त्याला नटराजाची मूर्ती देखील दिली जाते. तो त्या मूर्तीची पूजा करतो आणि नेहमी स्वतः जवळच ठेवतो. 


आर्थिक सुबत्ता आल्यामुळं गुणा घर बांधतो ते मांगवाड्यात उठून दिसतं. त्यामुळं दारकी आता गावातल्या इतर बायकांच्या डोळ्यात अजूनच खुपू लागलीये. त्या तिच्यावर नको नको ते आरोप करतायेत. गावातली पोरं, गुणाचा मुलगा राजाला, तुझा बाप फलका म्हणून डिवचतात. गुणा यासर्वांपासुन अनभिज्ञ आपली कला सादर करतोय नवीन वग लिहितोय. बृहन्नडाचा वग सादर करताना प्रेक्षक गदारोळ माजवता, कनातिला आग लावतात. गुना, नयना आणि शोभनावर बलात्कार होतो. महाराष्ट्रभर बातमी पेपरात छापून येते. सगळं होत्याच नव्हतं होऊन जातं. माहेरी गेलेल्या दारकीला आणायला गेलेला गुणबा सासऱ्यांकडून अपमानित होऊन घरी येतो. दुसऱ्यादिवशी पांडबासमवेत जाताना मनाशी ठरवतो. आता संपूर्ण समर्पण या कलेसाठीचं.


कादंबरीत कोल्हापुरी रांगड्या भाषेचा प्रभाव आहे. भाषा शिवराळ आहे पण ती प्रसंगानुरूप (शिवराळ भाषेचा विचार करता लहान मुलांसाठी हे पुस्तक योग्य ठरणार नाही). वाचकांना सुरुवातील काही शब्द नवीन आणि गमतीशीर वाटू शकतात. लेखकाने आपल्या अविश्वसनीय लिखाणाची ताकद या कादंबरीतून दाखवून दिली आहे. मांगवाड्याचं केलेलं वर्णन मनाला चटका देऊन जातात तर वाद्यांची जुळवा जुळव करतानाची कसरत हास्य उमलवतं. तमाशाबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन मांडताना लेखक आपल्याला पुन्हा विचार करायला भाग पाडतो. मोटारीमुळं बंद पडलेलं काम, मन विषन्न करणाऱ्या गरिबीचं चित्र, नाच्या होताना गुणाच्या मनाची होणारी घालमेल, दारकीला न समजणारी कला, नयनाचा गुणाला नकार, समाजाची गुणाबद्दल असलेली मतं, राजाची होणारी घालमेल हे सर्व आनंद यादव यांनी उत्कृष्टरित्या लिहिलं आहे. प्रत्येक प्रसंग वाचताना तो आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. कागल गावात आपल्यासमोर प्रत्येक प्रसंग होत असल्याचा आपल्याला भास होतो. आनंद यादव यांनी ग्रामीण भागातील व्यथा तर मांडल्याच आहेत त्याचबरोबर वर्षानुवर्षे समाजाने दुर्लक्ष केलेल्या तमाशा संस्कृतीवर भाष्य केले आहे. तमाशा कलावंताची व्यथा मांडली आहे. एक काळ आपल्या लेखणीने जिवंत केला आहे. हि कादंबरी मराठी साहित्यातील महत्वपूर्ण कादंबरीच्या यादीत नेहमीच वरच्या स्थानावर राहील. लेखकाने आपल्या सिद्ध लेखणीने ते स्थान अढळ केले आहे. 


२००९ साली प्रदर्शित झालेला 'नटरंग' चित्रपट महाराष्ट्रात प्रचंड गाजला. हा चित्रपट आनंद यादवांच्या याच 'नटरंग' कादंबरीवर आधारित होता. अभिनेते 'अतुल कुलकर्णी' यांनी 'गुणा कागलकर' हि भूमिका अजरामर करून ठेवली आहे. चित्रपटात काही ठिकाणी बदल करण्यात आले असले तरीही चित्रपट कादंबरीच्या तोडीस तोड झाला आहे. ज्यांनी चित्रपट पहिला आहे त्यांना कादंबरी वाचताना चित्रपटातील पात्र नक्कीच आठवतील. 


एकूणच नटरंग कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण आहे, तीत असलेला मराठी भाषेचा गोडवा आणि रांगडेपणा आपल्याला जाणवतो. प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहावेत एवढी त्या लिखाणाची ताकद, तमाशा लोककलेचे महाराष्ट्रातील स्थान, कलावंतांच्या व्यथा, दारिद्र्य, गरजा, वासना, कलेची उपासना, समाज आणि समाजाचा दृष्टिकोन, कुटुंब या सर्व पैलूंचा विचार करता मराठी साहित्यातील 'नटरंग' हि महत्वपूर्ण कादंबरी सर्वानी नक्कीच वाचायला हवी.    




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने