पुस्तक | डहाणूत खळबळ !! समुद्रकिनाऱ्यावरचे रहस्य
|
लेखक | मीनल दिघे |
अनुवाद | पूनम छत्रे |
पृष्ठसंख्या | ८३ |
प्रकाशन | अस्तित्व प्रकाशन |
समीक्षण | गायत्री पाठक |
मूल्यांकन | ३.८ | ५ |
हे पुस्तक, लेखिका मीनल दिघे यांचं 'डिसरप्शन्स इन डहाणू: अ सी साईड मिस्ट्री फ्रॉम इंडिया' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ७ ते १२ वयोगटातील मुलांसाठी हे पुस्तक योग्य आहे.
'डहाणूत खळबळ' हे लहान मुलांसाठी अतिशय सुंदर असे पुस्तक आहे. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच ही एक रहास्यकथा आहे. हे पुस्तक लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन लिहिण्यात आलेलं आहे. लेखिकेने बारकाव्यांचे वर्णन अतिशय समर्पक आणि मुलांना समजेल अश्या भाषेत योग्यरीतीने केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतच वडिलांची बदली झाल्यामुळे डहाणू मधे आई वडिलांसोबत राहायला आलेली मिनी, नवीन ठिकाणी तिचे नुकतेच मित्र झालेले रिचा आणि क्रिश, एका महत्वाच्या कामगिरीसाठी डहाणूमध्ये पोहोचलेली आरती मावशी व तिचा छोटा मुलगा आदित्य यांनी शोधून काढलेल्या एका रहस्यमय घटनेवर आधारित ही कथा आहे.
या कथेतील मुले हुशार आणि धाडसी आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पूर्ण वेळ मोकळा असलेल्या मुलांना काही संशयास्पद घटनांनी बेचैन केले आहे. तिथूनच या रहस्यमय कथेची सुरुवात होते. डहाणूत एका पाठोपाठ एक बरेच विचित्र प्रसंग घडू लागतात. संशयास्पद लोकं, जंगलातून येणारे आवाज आणि चोऱ्या अशा अनेक घटना मुलांना विचित्र वाटतात. त्यांना या सगळ्या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे असं वाटत राहतं. अर्थात मोठ्यांना या गोष्टी पटवून देणे अवघड जातं.
उत्तम निरीक्षण शक्ती असलेली मिनी, छोट्या छोट्या घटना टिपून ठेवायची. तिची हि सवय मुलांना रहस्याची उकल करताना मदत करतं आणि शेवटी मुलं स्वतः रहस्य उलगडतात आणि कुत्र्यांची होणारी तस्करी पकडून देतात.
पुस्तकाचं मुखपृष्ठ नेटफ्लिक्सवरील 'स्ट्रेन्जर थिंग्स' या सिरीज ची आठवण करून देतं. कथा साधी, सरळ आणि लहान मुलांना आवडेल अशी आहे. मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. एकूणच लहान मुलांना वाचण्यासाठी / भेट देण्यासाठी ‘डहाणूत खळबळ’ एक छान पर्याय आहे.