पुस्तक | तुंबाडचे खोत (खंड १ आणि २) |
लेखक | श्रीपाद नारायण पेंडसे (श्री. ना. पेंडसे) |
पृष्ठसंख्या | १६०८ (खंड १ व २ मिळून) |
प्रकाशन | कॉन्टिनेन्टल प्रकाशन |
समीक्षण | रोहित मोहिते |
मूल्यांकन | ५ | ५ |
एकाच घराण्यातील चार पिढ्यांची गोष्ट सांगणारी द्विखंडीय कादंबरी म्हणजेच ‘तुंबाडचे खोत’. तुंबाड हे गाव जरी वास्तविक असले तरी श्री. ना. पेंडसे यांनी डोळ्यासमोर उभारलेली कथा व पात्रे काल्पनिक आहेत पण त्याला वास्तवाची किनार देखील आहे.
१९८७ साली प्रकाशित झालेली कादंबरी 'तुंबाडचे खोत' म्हणजे मराठी साहित्यातील सुवर्णपान. लेखक श्री. ना. पेंडसे यांनी २५ वर्ष या कादंबरीवर काम केलं, त्यासाठी त्यांनी जगबुडी नदीतून प्रवास केला, तुंबाड गावाला अनेक भेटी दिल्या, आपल्या कल्पनाशक्तीच्या परिसीमा ओलांडल्या, अशक्यप्राय लिखाण केलं, मानवी स्वभावाचे सर्व कांगोरे रेखाटून ताकदीने प्रसंग उभे केले आणि हि कादंबरी (माझ्यामते हि एक महाकथा आहे) पूर्ण केली.
या कथेची सुरुवात होते १७२५ पासून. प्रस्तुत कादंबरीमध्ये अनेक ठिकाणी "मोरया" या मूळ पुरुषाचा उल्लेख केला आहे. हा मोरया तोच ज्याने अनेक वर्षांपूर्वी तुंबाड हे गाव वसवले. तुंबाडचे "खोत" - खोत म्हणजे एक प्रकारे गावचे प्रमुख. कथेच्या आरंभी उल्लेख असलेला खोत म्हणजे लोभी, नीती - अनीतीची जाणीव नसलेला, स्त्रीलंपट आणि दहशत-भीतीच्या जोरावर वर्चस्व गाजवणारा दाखवला आहे. मात्र सत्ता आणि संपत्तीचा अतिलोभामुळे अघोरी मांत्रिकाच्या सान्निध्यात येऊन कथेतील पहिला खोत हा स्वतःचा नाश ओढावून घेतो.
या प्रसंगा नंतर खोताची आणि ते राहत असलेल्या वाड्याची गावात चेष्टा होते. एक प्रकारे वाडा आणि संपूर्ण खोताचे घराणे एकाकी पडते. खोत हयात असताना झालेल्या अन्यायामुळे त्रस्त असलेले लोक उघडपणे वाड्याची आता नाचक्की करू लागले होते. या बदनामीची झळ पुढच्या पिढीला सोसावी लागली. मात्र सर्व हाल अपेष्टा सहन करत पुढच्या पिढीतून "गणेश शास्त्री तुंबाडकर" नावारूपास येतो. हा खोत परोपकारी, विनम्र, संपत्तीची हाव नसलेला आहे. पूर्व पिढीचे सर्व पाप हा गणेश शास्त्री धुवून काढणार असा विश्वास सर्वाना वाटू लागतो. घराण्याला नवीन वैभव मिळवून देऊन "गणेश शास्त्री तुंबाडकर" सर्वांसाठी वंदनीय बनतात.
गणेश शास्त्री तुंबाडकरांच्या एकाही मुलामध्ये त्यांचे गुण येत नाही. चिमापा, जनापा, बजापा सर्वच वडिलांच्या पुण्याईवर सुख भोगतात. कथेमध्ये जगबुडी नदीचा उल्लेख आलेला आहे. या नदीच्या पलीकडे लिंबाड हे गाव आहे जिथे तुंबाड घराण्याची आणखी एक शाखा नांदते. नरसू खोत हे यांतील एक कर्तृत्वान नाव. गुण आणि अवगुण याचा समतोल नरसू खोत मध्ये दिसतो. आपली तुंबाडची भावकी आपल्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे याची कल्पना असूनही अनेकदा नरसू तुंबाडकरांच्या मदतीसाठी जातो. "गणेश शास्त्री तुंबाडकरांचा" बजापा हा मुलगा नरसूची मदत घेऊन उद्योगक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त करतो. यातूनच त्याची ओळख जुलाली सोबत होते. जुलालीसोबतची ओळख इतकी पुढे जाते की यानंतर तो तिच्याशी दुसरे लग्नही करतो. जुलालीदेवीची संपत्ती बजापा तुंबाडला आणतो आणि वाड्याची आर्थिक भरभराट होते. बजापाचे आपल्या दोन्ही पत्नींवर सारखेच प्रेम असते, म्हणूनच पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर थोड्याच दिवसांनी तो आजारपणाने ग्रासून जातो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. या नंतर एकटे पडलेल्या जुलालीदेवी कथेच्या शेवटी आत्महत्या करतात. चार पिढ्या बघणारा वाडा देखील जळून खाक होतो. एकप्रकारे शोकांतिकाच...
कथेचा कालखंड जवळजवळ २५० वर्षांचा आहे. कथेत १०० हुन अधिक पात्र आहेत. पात्रांच्या परिचयासाठी 'खोतांची वंशावळ' देखील देण्यात आली आहे. प्रत्येक पात्राचे स्वभावगुण भिन्न आहेत. अशी पात्रे उभी करण्यासाठी लेखकाकडे अफाट कल्पनाशक्तीच असावी लागते. कथानक अत्यंत वेगाने पुढे सरकत राहतं. पुस्तकाच्या भाषेवर कोकणी प्रभाव जाणवतो. काही ठिकाणी शिवराळ भाषेचा वापर केला आहे आणि काही प्रणय प्रसंग देखील आहेत.
माझ्या मते जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या 'गेम ऑफ थ्रोन्स' शी 'तुंबाडचे खोत' या कादंबरीची तुलना होऊ शकते (विषय भिन्न असले तरीही) कारण हि कादंबरी त्या ताकदीची किंबहुना त्याहून जास्तच ताकदीची आहे. एक जागतिक दर्जाची कथा अंतरराष्ट्रीय पातळीवर गाजायला तयार आहे. एकूणच प्रगाढ शब्द रचना, प्रसंगांची गुंफण आणि लेखन प्रतिभेने लेखक आपल्याला एका रोमांचक सफरीवर घेऊन जातात हे नक्की. सदर पुस्तक वाचून हि सफर तुम्हीही अनुभवा....