पुस्तक | सिनेमाची शाळा |
लेखक | राहुल जोशी |
पृष्ठसंख्या | २१० |
प्रकाशन | मनोविकास प्रकाशन |
समीक्षण | आकाश तानाजी जाधव |
मूल्यांकन | ४.२ | ५ |
'सिनेमाची शाळा' या पुस्तकामुळे तुम्हाला चित्रपट निर्मितीची बाराखडी समजते आणि चित्रपटांकडे बघण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन मिळतो.
आजमितीस चित्रपटाची निर्मिती करणे हा मुख्यत्वे एक व्यवसाय आहे. ज्यांना चित्रपट निर्मितीचे तंत्र अवगत आहे आणि प्रेक्षकांना काय हवंय हे अगदी उत्तम माहिती आहे त्यांचा कल मुख्य प्रवाहातील (मास एंटरटेन्मेंट किंवा कमर्शियल) चित्रपट बनवण्याकडे अधिक असतो. त्याच बरोबर ‘समांतर’ चित्रपट, दिग्दर्शकाला काय मांडायचं आहे या दृष्टिकोनातून निर्मित केला जातो. 'सिनेमाची शाळा' या पुस्तकातून तुम्हाला या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांविषयी माहिती मिळते.
"चित्रपट नक्की कसा बनवतात?" हा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर या पुस्तकात तुम्हाला त्याच उत्तर मिळेल. या पुस्तकात दोन भाग आहेत. पाहिल्या भागात चित्रपट निर्मितीचे पाच मुख्य टप्पे पाच प्रकरणांत विभागले आहेत आणि प्रत्येक प्रकरणाशी संबंधित स्वतंत्र उपप्रकरणे आहे. दुसऱ्या भागात तीन चित्रपटांबद्दल विस्तृतपणे लिहिलं आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक राहुल जोशी यांनी चित्रपटांविषयी कुतूहल कसे निर्माण झाले या बद्दल लिहिलं आहे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिटयूट (FTII) मुळे त्यांना उत्तोमोत्तम चित्रपट बघायला मिळाले. काही चित्रपट समजून घेण्यासाठी त्यांनी ते पुन्हा पुन्हा पाहिले. FTII मध्येच त्यांना चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाची प्रभावीपणे मांडणी कशी करायची याबद्दल विस्तृतपणे माहिती मिळाली. जागतिक स्तरावर नावाजलेले चित्रपट बघितल्याने त्यांना चित्रपट बघण्याची एक व्यापक दृष्टी मिळाली. 'सिनेमाची शाळा' हे पुस्तक ते अनुभव आणि व्यापक दृष्टी वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतं.
दुसऱ्या भागात - 'द नोटबुक', 'शोले' आणि 'श्वाशॅन्क रिडम्शन' या तीन चित्रपटांची सीन बाय सीन स्टोरी, निर्मितीमधील टप्पे, शूटिंग मधील गडबड आणि पार्शवभूमी याबद्दल लिहिलं आहे. या चित्रपटांबद्दल वाचताना तुम्हाला चित्रपटनिर्मिती बद्दल अजून सखोल माहिती मिळते.
चित्रपटाच्या मुहूर्त शूटिंग पासून वितरणापर्यंत सर्व टप्पे लेखकाने यात मांडले आहेत. उदाहरणांसाठी संबंधित फोटोज आणि आकृत्या दिल्या आहेत ज्यामुळे वाचकांना विषय पटकन समजतो. तसेच गॉडफादर चित्रपटाच्या सुरुवातीची 'पटकथा' (स्क्रीनप्ले) यात दिली आहे. अनेकांना पटकथा नक्की कशी असते ते यामुळे समजेल. VFX प्रकरण प्रत्येकालाच वाचून समजण्यासारखं नक्कीच नाहीये कारण त्यात बऱ्याच क्लिष्ट गोष्टी आहेत पण इतर प्रकरणे सर्वाना सहज समजतील अशा सोप्या शब्दांत मांडलेली आहेत. प्रकरणांचा क्रम देखील चित्रपटनिर्मिती सारखाच असल्याने, चित्रपट तुमच्या समोर घडत जातो. काही इंग्रजी शब्द जसे च्या तसे वापरले आहेत कारण शूटिंग करताना ते तसेच वापरले जातात (लेखकाने यासाठी पुणेकरांची विशेष माफी मागितली आहे).
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे.
३५ एम.एम. आणि ७० एम.एम. मध्ये काय फरक आहे? 4K आणि 2K मध्ये काय फरक आहे? VFX म्हणजे काय? छायालेखनाचे प्रकार कोणते? शूटिंगसाठी अँगल कोणते वापरले जातात? कास्टिंग, लोकेशन, पडद्यामागचे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ, संवाद, स्टोरीबोर्ड, साउंड, कॅमेरा, प्रोजेक्टर आणि वितरणाचे प्रकार एकंदरीत चित्रपटाशी संबंधित सर्व गोष्टी या पुस्तकात नमूद केल्या आहेत आणि त्यांची सविस्तर माहिती तुम्हाला मिळते.
एकूणच ज्यांना चित्रपट निर्मितीत रस आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक 'मस्ट रिड' आहे. आणि ज्यांना चित्रपट कसा बनवतात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी याहून उत्कृष्ट पुस्तक मराठीत माझ्या वाचनात तरी अजून आलेलं नाही. काही तांत्रिक गोष्टींशी संबंधित प्रकरणे सोडली तर पुस्तक वाचनीय आहे. 'सिनेमा' विषय असल्यामुळे ते तुमचं मनोरंजन देखील करतं, नवनवीन गोष्टी शिकवतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला चित्रपट डोळसपणे आणि रसिक दृष्टीने बघायला शिकवतं. माझ्या मते हे पुस्तक, मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने वाचल्यास मराठी चित्रपटांचा दर्जा अधिक उंचावेल. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल माहिती द्यायला हवी होती आणि पुस्तकाच्या आतील बाजूस मराठी चित्रपटसृष्टीमधील एखाद्या तरी दिग्दर्शक किंवा अभिनेता/अभिनेत्री चा फोटो द्यायला हवा. हा बदल पुढील आवृत्तीत होईल अशी आपण अपेक्षा करूयात.