तीन हजार टाके - सुधा मूर्ती | Tin Hajar Take (3000 Stiches) - Sudha Murthy | Marathi Book Review


पुस्तक तीन हजार टाके
लेखक सुधा मूर्ती
अनुवाद लीना सोहोनी
पृष्ठसंख्या १५२
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस 
समीक्षण नंदिता शेवाळकर
मूल्यांकन ४ | ५



सुधा मूर्ती हे नाव आपण अनेकदा ऐकले असेल. लिखाणात साधेपणा आणि त्यातून सामान्य लोकांसाठी एक असमान्य विचार मांडण्यासाठी केलेली धडपड आपल्याला माहीत आहे. यामुळेच मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि वाचताना आजूंच प्रेरित झाले. त्याची कारणही तशीच आहेत. आपल्या अनुभवातून आपल्याला शिकवण तर मिळतेच पण तीच शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

लेखिकेचा 'इन्फोसिस फाउंडेशन'च्या माध्यमातून काम करत असताना समाजातील विविध घटकांशी परिचय झाला.  त्याचवेळी समाजातल्या दुर्लक्षित घटकांच्या आयुष्याबद्दल तसेच त्यांना येणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी, त्यांचा संघर्ष, त्यांना होणाऱ्या वेदना या कथासंग्रहामधून सुधा मूर्ती यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांत मांडले आहे. तीन हजार टाके या पुस्तकांमधून मानवी स्वभावाच्या दोन्ही बाजूंचा म्हणजेच सौंदर्य आणि घृणा यांचा उल्लेख दिला आहे. या कथा संग्रहातील प्रत्येक कथा ही सत्यकथा आहे. माणसांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या यशाच्या वाटा याचे अत्यंत मार्मिक चित्रण केले आहे. यात एकूण ११ कथा आहेत.

या कथांमधून आयुष्य सन्मानाने कसे जगता येते, हे सांगितले आहे. बऱ्याच वेळा आपण हिंमत आणि धैर्य दाखवून केलेली छोट्यातली छोटी गोष्ट देखील इतरांसाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी होते. लेखिकेने केलेला दूरदूरचा प्रवास त्याचबरोबर त्यांना स्वतःला आलेले अनुभव, या कथासंग्रहातून आपल्यापुढे मांडले आहेत. याचा आपल्या आयुष्यातही फायदा होतो. आपणही सामान्य माणसाच्या नजरेतून नवीन गोष्ट पाहतो आणि विचार करायला लागतो. विचारांची सजावट आणि त्यातून मिळणारा बोध ही या पुस्तकाची जमेची बाजु आहे.

देवदासी समाजासाठी केलेले, काम त्याची माहिती त्यात आलेल्या अडचणी तसेच बॉलिवूड चित्रपटांच्या बाबतीत परदेशात आलेले अनुभव. आपल्या वडिलांचा प्रेमळ स्वभाव, भारतीय भाज्यांचे मूळ स्थान आणि इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शेकडो मुलांमध्ये एकुलती एक मुलगी म्हणून शिकत असताना आलेल्या अडचणी ह्या विषयी कथन केले आहे. अगदी सोप्या भाषेत त्यांनी सामान्य माणसांच्या आयुष्यातले असामान्य अनुभव आपल्या पर्यंत पोहचवले आहे. 

सुद्धा मूर्ती इंजिनिअर झाल्या. पण त्यांचा ओढा सामाजिक कामांकडे जास्त होता. देवदासी प्रथा बंद व्हावी असे त्यांना मनापासून वाटे. म्हणून त्या एकदा देवदासी महिलांच्या वस्तीत गेल्या. त्या महिलांशी संवाद साधायचा होता. त्यावेळी सुधाजी आधुनिक कपड्यात होत्या. देवदासींच्या वस्तीत गेल्यावर तिथल्या महिलांना त्या आपल्यातल्या वाटल्या नाही. सुधाजींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलांनी चप्पल फेकून त्यांना हाकलून दिले. सुधाजींना वाईट वाटले. पण त्या हरल्या नाहीत. दोन आठवड्याने पुन्हा तिथे गेल्या. त्यावेळी टोमॅटोचा हंगाम होता. त्या बायका टोमॅटो निवडण्याचं काम करत होत्या. सुधाजी पुन्हा आल्या हे पाहून त्यांनी सुधाजींच्या अंगावर टोमॅटो फेकून मारले. 


पुन्हा मागे फिरावे लागले. सुधाजी हतबल झाल्या. त्यांनी हा किस्सा आपल्या वडिलांना सांगितला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांनी सुधाला सांगितले, तू आधुनिक वेशभूषेत तिथे गेलीस. त्यामुळे त्या महिलांना तू परकी वाटलीस. जर तू साडी नेसून गेलीस तर त्या तुला आपल्यातली एक समजतील. तुझे बोलणे ऐकतील. सुधाजींना हा सल्ला पटला. त्या साडी नेसून पुन्हा देवदासींच्या वस्तीत गेल्या आणि मोठा फरक झाला. त्या महिला सुधाजींशी बोलू लागल्या. त्या महिलांपैकी काही जण वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या वस्तीमध्ये काहीच सुविधा नव्हत्या. सुधाजींनी त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली. बँक हा प्रकार त्या महिलांना माहित नव्हता. मग तिथे एक बँक आणली. एड्स आजाराची माहिती दिली. एड्सपासून रक्षण करण्याचे उपाय सांगितले. त्या महिलांचा सुधाजींवर विश्वास बसू लागला. एक नातं तयार झालं. त्यांचे अनेक प्रश्न सुटू लागले. सुधाजी इन्फोसिस फौंडेशन चालवतात ह्या गोष्टी त्या महिलांना माहीतही नव्हत्या. आपली मुले शिक्षण घेत आहेत. परिवर्तन होत आहे हे त्यांना दिसू लागलं. सुधाजींच्या चिकाटीला आणि कष्टाला फळ आलं. त्या महिलांनी एक कार्यक्रम करायचं ठरवलं. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून सुधाजींनी यावं इतकाच आग्रह करून त्या थांबल्या नाहीत तर सुधाजींना बंगलोरवरून येणं सोपं व्हावं म्हणून वोल्वो एसी बसचं तिकीट पाठवलं. सुधाजी त्या कार्यक्रमाला गेल्या. सुधाजींमुळे ३००० पेक्षा जास्त महिलांचे जीवन बदलले होते. ह्या महिलांनी सुधाजींना ३००० टाके असलेली एक गोधडी भेट दिली. सुधाजींनी ह्या महिलांसाठी जे काम केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गोधडी दिली आहे.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने