पुस्तक | सत्तांतर |
लेखक | व्यंकटेश माडगूळकर |
पृष्ठसंख्या | ६२ |
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
'सत्तांतर' हि कादंबरी म्हणजेच 'हनुमान लंगूर' प्रजातीच्या वानरांच्या जीवनसंघर्षाची गोष्ट. संघर्ष हा जसा माणसाच्या जीवनात असतो तसाच तो प्राण्यांच्या जीवनात देखील असतो. अवघ्या ६२ पानांची आणि ८ प्रकरणे असलेली 'सत्तांतर' हि मराठी साहित्यातील वेगळ्या धाटणीची कादंबरी. गजानन माडगूळकर (गदिमा) यांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर यांनी 'नागझिरा' आणि 'ताडोबा' अभयारण्यात वानरे पाहिली आणि त्यांचे कुतूहल जागृत झाले. पुढे त्यांनी इतरही अभयारण्यात जाऊन वानरांची निरीक्षणे केली, अनेक प्रबंध आणि पुस्तके वाचली आणि 'सत्तांतर' लिहिलं. लेखक स्वतः चित्रकार असल्याने त्यांनी वानरांची रेखाटने देखील केली आहे. मुळात हे लिखाण एका साप्ताहिकाच्या दिवाळी अंकासाठी केलं होत असं त्यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे.
मध्य भारतातील एका विशाल अरण्यात असलेल्या सात वानर टोळ्यांपैकी एक, 'मुडा' वानर आणि त्याची टोळी. सीमेलगतच 'लालबुड्या' ची टोळी असल्यामुळे या दोन्ही टोळ्यांमध्ये तुंबळ भांडणे होत असे पण हि भांडणे जीवावर बेतत नसत. त्याचबरोबर हाकलून दिलेल्या नर वानरांची एक टोळी 'सत्तांतरासाठी' योग्य संधीची वाट बघत टपून बसली आहे. पुढे 'लालबुड्या' अचानक गायब होतो. त्याच्या टोळीतील एका वानरीसोबत 'मुडा' लपून 'जुगतो'. नंतर 'मुडा' दोन्ही टोळींचे स्वामित्व स्वतःकडे घेतो आणि स्वतःच्या साम्राज्याच्या सीमा वाढवतो. आता नर वानरांच्या टोळीला या साम्राज्यावर स्वामित्व मिळवायचं आहे. ते त्यात यशस्वी होतात का? 'सत्तांतर' होत का? जीवनसंघर्ष संपतो कि अखंडपणे सुरूच राहतो?
लेखकाने बराच काळ जंगलामध्ये वानरांचे निरीक्षण करण्यात व्यतीत केला आहे त्यामुळे वानरांच्या सवयी, आवाज काढायच्या पद्धती, खान-पान, भांडण, झोप, दिनचर्या, प्रणय, भीती, माज, शरीर वैशिष्ट्य या सगळ्याचं गोष्टी अचूक टिपल्या आहेत. कादंबरीत चितारलेले वानरचाळे वाचताना हळूच मनाला असं वाटून जात कि आपण खरंच डार्विनच्याच्या सिद्धांताप्रमाणे वानरांतून उत्क्रांत झालो कि काय!
आपल्या लेखणीच्या ताकदीने माडगूळकर, अरण्य आणि त्यात घडत असलेल्या घटना आपल्या डोळ्यांसमोर जिवंत करतात. कोणतेही प्रसंग खोटे किंवा अधिक रंगवले आहेत असे वाटत नाही. यात अनेक पात्र आहे, त्यांची नावं त्यांच्या शरीर वैशिष्ट्यानुसार ठेवण्यात आली आहेत. जस कि भांडणात कान मोडलेला असल्यामुळे 'मुडा', प्रचंड वस्तुमान असल्यामुळे 'मोगा', उनाडक्या करणारी 'उनाडी' तसेच 'लाजरी', 'बोकांडी' असे अनेक वानर, वानरी आहेत. उन्हाळा संपून पाऊस सुरु होणार याच वर्णन लेखकाने खालील प्रमाणे केलं आहे:
"सृष्टी अन्नब्रह्माच्या पूजेला बसणार होती."
लेखकाने मोजक्या शब्दांत जंगलाचं आणि पावसाचं जे वर्णन केलंय त्याचं करावं तितकं कौतुक कमी. अनुभव, निरीक्षण आणि कल्पकता याने समृद्ध झालेली हि कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. भविष्यात या कादंबरीवर आधारित एखादा अनिमेशनपट आला तरी नवल वाटायला नको. माझ्यामते या पुस्तकाची प्रस्तावना देखील तितकीच महत्वाची आहे त्यामुळे आपल्याला पुस्तकाची पार्श्वभूमी समजते. वरवर साधी-सरळ वाटणारी हि कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते कि मनुष्यात आणि वानरांमध्ये किती साम्य आहे. मनुष्य देखील इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा शरीर उपभोगासाठी आयुष्यभर संघर्ष करत राहतो पण त्यात तो हे विसरून जातो कि शेवटी 'सत्तांतर' निश्चित आहे. या कादंबरी मधून लेखकाला मनुष्य आणि वानर यांच्या जीवनातलं सत्तासंघर्षांच्या रहाटगाडग्याचं साधर्म्य अभिप्रेत होत कि नाही हे नक्की सांगता येणार नाही पण पुस्तकाच्या सुरुवातीला असलेलं वि. का. राजवाडे यांचं वाक्य त्याला पूर्ण विराम देऊ शकतं:
"मनुष्य हा पशुकोटीतील प्राणी आहे व त्याचे जवळचे सगेसोयरे पशू म्हटले, म्हणजे वानर होत."