पुस्तक | यमुनापर्यटन: हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण |
लेखक | बाबा पद्मनजी |
पृष्ठसंख्या | १६० |
प्रकाशन | रिया पब्लिकेशन |
समीक्षण | मनाली नम्रता नामदेव घरत |
मूल्यांकन | ४.१ | ५ |
हे पुस्तक बुकस्टेशन वरून विकत घ्या | Buy on BookStation
बाबा पद्मनजी लिखित यमुनापर्यटन ही १८५६ साली प्रकाशित झालेली मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. या संपूर्ण कादंबरीत हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. १८५६ साली विधवा पुनर्विवाह कायदा लागू झाल्यानंतर सुधारकांच्या प्रयत्नांमुळे भारतात काही प्रमाणात विधवा पुनर्विवाहाला सुरुवात झाली. तथापि, त्यापूर्वी आणि १८५६ नंतरही बराच काळ हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी व परंपरांमुळे विधवांना मोठ्या जाचाला सामोरे जावे लागले.
यमुनापर्यटन या कादंबरीत ख्रिस्ती धर्माचा प्रसार दिसत असला, तरीही विधवांच्या जीवनातील दु:खमय परिस्थितीचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. ही कादंबरी यमुनाबाई आणि विनायकराव या दाम्पत्याच्या सांसारिक प्रवासाच्या माध्यमातून त्या काळातील विधवांच्या जीवनावस्थेचे प्रभावी चित्रण करते. सतीची चाल, बालविवाह, केशवपन यांसारख्या अनिष्ट रूढींच्या जाचामुळे स्त्रियांना होणारे हाल बाबा पद्मनजी यांच्या लेखणीतून प्रभावीपणे उलगडले आहेत. पतीच्या अकाली निधनानंतर लहान वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांची होणारी अवहेलना आणि त्या काळातील पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांवर लादलेल्या अन्यायांचे प्रत्ययकारी वर्णन लेखकाने केले आहे.
स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार केला असता, पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांच्या भावभावनांचा वेळोवेळी अव्हेर केला असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, स्त्रियांच्या खच्चीकरणासाठी काही प्रमाणात स्त्रियांच जबाबदार असल्याचेही लेखक अधोरेखित करतो.
यमुनाबाई आणि विनायकराव हे कादंबरीतील सुधारक विचारसरणीचे पात्र असून, त्यांच्या संवादांमधून पुनर्विवाहाविषयीची विविध मतमतांतरे लेखकाने मांडली आहेत. कादंबरीच्या शेवटी, विनायकरावांच्या मृत्यूनंतरही यमुनाबाईंनी केशवपनाच्या अनिष्ट रूढीला बळी न पडता धैर्याने पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह म्हणजे त्या काळातील नव्या पर्वाची सुरुवात मानली जाते. या परिस्थितीमागे अनेक सुधारकांचा योगदान आहे, हे लेखकाने ठळकपणे मांडले आहे.
सध्याची परिस्थिती खूप सुधारलेली असली, तरीही काही प्रमाणात पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या कादंबरीतील प्रसंग आणि घटना जरी १८५६ सालच्या असल्या, तरी आजच्या काळाशी त्यांची तुलना करून आपण त्यापासून महत्त्वाचे धडे घेऊ शकतो.