पुस्तक | द पर्क्स ऑफ बीईंग अ वॉलफ्लावर |
लेखक | स्टिफन शबॉस्की |
पृष्ठसंख्या | २२४ |
प्रकाशन | सायमन आणि शूस्टर |
समीक्षण | गुंजन थोरावत |
मूल्यांकन | ४ | ५ |
ह्या कथेशी ओळख झाली ती ह्याच पुस्तकावर आधारित सिनेमातून. अर्थात, सिनेमाला वेळेचं बंधन असल्याने पुस्तकाइतकं स्वातंत्र्य मिळत नसतं, तरीही त्यात कथेचा आत्मा अखंड जपला आहे. ही कथा आहे चार्लीची, त्याच्या शब्दांत आणि फक्त त्याच्याच दृष्टिकोनातून. हीच मांडणी वॉलफ्लावरला एक वेगळी ओळख देते. चार्लीचं विश्व उलगडतं ते त्याने लिहिलेल्या पत्रांतून. एका अज्ञात व्यक्तीला लिहिलेली ही पत्रं वाचताना असं वाटतं की जणू ती आपल्यासाठीच लिहिलेली आहेत. कदाचित म्हणूनच आपण नकळत त्याच्या जगाचा एक अविभाज्य भाग बनतो आणि तो आपल्या.
लेखकाला चार्ली हा एखाद्या वॉलफ्लावरसारखा वाटतो, अशा व्यक्तींपैकी, ज्या भर गर्दीत अलिप्त असतात आणि त्यांच्या त्या शांत कोपऱ्यातून जग न्याहाळतात, लोकांना जाणून घेतात, त्यांना समजून घेतात. ह्या पत्रांतून आपण चार्लीला तर भेटतोच, पण ह्या व्यतिरिक्त अनेक पात्रांनाही भेटतो, ज्यांनी कळत-नकळत चार्लीच्या आयुष्याला आकार दिला आहे. सॅम, तिचा सावत्र भाऊ पॅट्रिक, चार्लीचे शिक्षक बिल, आणि चार्लीची मावशी ही पात्रं चार्ली इतकीच मनाला घर करून जातात.
हायस्कूल म्हणजे अमेरिकन शालेय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. चार्लीच्या कथेतील ह्या नवीन आणि महत्त्वाच्या वळणावर तो एकटाच आहे, कारण त्याच्या जिवलग मित्राने कोणतेही कारण न देता आत्महत्या केली असते. आधीच नाजूक मन:स्थितीत असलेल्या चार्लीसाठी हा मोठा धक्का ठरतो. लेखक स्टिफन शबॉस्की यांची लेखनशैली इतकी नितळ आणि प्रभावी आहे की चार्लीची मन:स्थिती, निराशा, भावनिक गुंतागुंत, आणि त्याच्या अंतर्मनाचे खेळ अतिशय कुशलतेने हाताळले गेले आहेत. कोणत्याही टप्प्यावर तुम्ही कथेशी विलग होत नाही.
ह्या कथेतून लेखकाने प्रेम, मैत्री, नातेसंबंध, कुटुंब, बालपणाचा आपल्या आयुष्यावर पडणारा प्रभाव, आणि अंतर्मनातील अस्पृश्य कोपऱ्यांवर भाष्य केलं आहे. प्रेमाविषयी बोलताना लेखक म्हणतो की,
We accept the love we think we deserve
आपण तेच प्रेम स्वीकारतो, ज्या प्रेमायोग्य आपण स्वतःला समजतो. अशाच अनेक सोप्या वाक्यरचनेतून लेखक काही खोल विचार मांडतो, जे चार्लीइतकंच आपल्याही आयुष्याला लागू पडतं.
ही कथा म्हणजे दुसऱ्याची रोजनिशी वाचण्यासारखं आहे. तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील, आणि जाणवेल की आपण सगळेच सारख्याच प्रश्नांत गुंतलो आहोत. चार्लीच्या आयुष्यात एकदा डोकावून पाहा—काहीच नाही तर एक आरसा नक्कीच सापडेल!