सीन्स फ्रॉम ए रायटर्स लाईफ - रस्किन बॉण्ड | Scenes From Writers Life - Ruskin Bond | Book Review in Marathi



पुस्तक सीन्स फ्रॉम ए रायटर्स लाईफ
लेखक रस्किन बॉण्ड
पृष्ठसंख्या १७८
प्रकाशन पेंग्विन बुक्स
समीक्षण अभिषेक गोडबोले
मूल्यांकन ४.९ | ५



रस्किन बॉण्ड... लालसर गोरा चेहरा, गुटगुटीत शरीरयष्टी आणि निळे मिश्किल डोळे! त्याच्या डोळ्यांतील मिश्किलपणा त्याच्या लिखाणात जागोजागी दिसून येतो, आणि प्रत्येकवेळी तेवढीच मजा देऊन जातो! रस्किनचं वय जवळपास पंच्याऐंशी तरी असेल, तरीही त्याचा उल्लेख एकेरी करावासा वाटतो. हे त्याचा अवमान अजिबात नाही, तर त्याच्या प्रेमळ पण खट्याळ व्यक्तिमत्वातून आणि लिखाणातून अनेक पिढ्यांशी साधलेली जवळीक आहे!

आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा पहिल्या एकवीस वर्षांचा प्रवास लेखकाने या पुस्तकात लिहिलेला आहे. ही वर्षं महत्त्वाची कारण याच काळात तो पहिल्यांदा प्रेमात पडला, याच काळात त्याने 'आपण लेखकच व्हायचं' हे ठरवलं आणि 'आपण कायम याच देशात, या देशाचा नागरिक म्हणून राहायचं' हेही ठरवलं! आता त्याने असं का ठरवलं, आणि यासाठी कुठल्या घटना किंवा व्यक्ती कारणीभूत ठरल्या, हे कळण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावंच लागेल!

मराठी माध्यमात शिकलेल्या प्रत्येकाला इंग्रजी वाचण्याची विनाकारण भीती वाटते. ही भीती घालवण्यासाठी आणि इंग्रजी वाचायला सुरुवात करण्यासाठी रस्किन बॉण्डसारखा सोपा, पण समृद्ध इंग्रजी लिहिणारा लेखक शोधून सापडणार नाही!

'द रूम ऑन द रूफ' ही रस्किनची पहिली कादंबरी. त्या कादंबरीतील कथा जिथे घडते ती जागा, कथेतल्या पात्रांशी साम्य असलेल्या रस्किनच्या आयुष्यातल्या व्यक्ती, असं सगळं या पुस्तकात पाहायला मिळतं. 'द रूम ऑन द रूफ' लिहायला सुरुवात केल्यापासून ती छापून येईपर्यंतच्या प्रवासात आलेले अनेक अनुभव यामध्ये आहेत.

रस्किन त्या कादंबरीचं, त्यातल्या पात्रांचं आणि त्यांचा खऱ्या व्यक्तींशी असलेल्या संबंधांचा उल्लेखसुद्धा करतो. रस्किनला आलेल्या एकटेपणातून वाचन आणि त्यानंतर लेखनाची निर्माण झालेली आवड, त्याचं व त्याच्या वडिलांचं एक खूप छान, हळवं नातं, अशा अनेक किस्से आणि गमतीजमती या पुस्तकात आढळतात. साधारणतः एकोणीसशे त्रेचाळीसच्या काळातून सुरु होऊन पुढील अनेक वर्षांचा आढावा रस्किनने यात घेतला आहे.

एखादी ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा मागं वळून पाहून आपल्या भूतकाळाबद्दल लिहिते, आणि ती व्यक्ती स्वतः लेखक असेल, ते लिखाण उपदेशात्मक होण्याची सहजच शक्यता असते. पण इथे अपवाद असा आहे की ही व्यक्ती 'रस्किन बॉण्ड' आहे आणि त्याचं लिखाण उपदेशात्मक कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या इतर लघुकथांप्रमाणे आणि भयकथांप्रमाणे हेही लिखाण तेवढीच मजा देऊन जातं.

या पुस्तकात त्याने लिहिलेली पत्रं खरंच वाचण्यासारखी आहेत. त्याने आपल्या वडिलांना लिहिलेलं पत्र तर अगदी प्रत्येकाने वाचायला हवं असं मला वाटतं! त्या काळात त्याने आपल्या डायरीत लिहिलेल्या नोंदीही या पुस्तकात आहेत. त्या वाचून रस्किन हा लेखक म्हणून यशस्वी होणारच होता, हे आपल्याला पटतं.

या पुस्तकात मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्याने प्रत्येक प्रकरणाला दिलेली नावं! ती नावं वाचूनच प्रकरणाबद्दलची उत्सुकता वाढत जाते. जे पुढे जाऊन लेखक होऊ इच्छितात, त्यांना उत्तम मांडणी, सोपी भाषा, शब्दांची निवड अशा अनेक गोष्टी यातून शिकता येतील.

एक उत्तम लेखक कसा तयार होतो, हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचायला हवं!





संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने