पुस्तक | सावित्री |
लेखक | पुरुषोत्तम शिवराम रेगे |
पृष्ठसंख्या | १७७ |
प्रकाशन | मौज प्रकाशन |
समीक्षण | मनाली नम्रता नामदेव घरत |
मूल्यांकन | ४ | ५ |
रेगेंची सावित्री माझ्या आयुष्यात आली, ती मी एस. वाय. बी. ए. च्या वर्गात शिकत असताना. अभ्यासक्रमात असणारी सावित्री कधी माझ्या लिखाणाला कारण ठरली, ते कळलंच नाही. पु. शि. रेगे लिखित सावित्री ही एक पत्रात्मक कादंबरी आहे. ३९ पत्रांचं हे संभाषण वाचताना आपण फक्त सावित्रीची पत्रं वाचत आहोत, याचं आपल्याला भानच राहत नाही.
पहिल्या पत्रापासून ते अगदी ३९ व्या पत्रापर्यंत रेगे आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतात. आईविना आप्पांच्या सानिध्यात आणि राजम्माच्या गोष्टी ऐकत वाढलेली सावित्री एका निराळ्याच सावित्रीचं रूप घेऊन आपल्या समोर उभी राहते. पुराणकाळापासून आपल्या कथांमध्ये असणारी सावित्री, ज्योतिबांची सावित्री, आणि रेगेंची सावित्री—या तिघींचंही आपल्या-आपल्या ठिकाणी वेगळं स्थान आहे. भिन्न काळांत जन्मलेल्या या तिघी, तरीही एकमेकींशी जोडलेलं नातं ठेवून आपल्याला काहीतरी नवं शिकवून जातात.
"मोर हवा तर आपणच मोर व्हायचं,जे जे हवं ते ते आपणच व्हायचं"(पत्र १)
हे सांगत आप्पांची आनंदभाविनी साऊ आपल्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहते. अर्थात, तो परिपूर्णतेचा आनंद शेवटच्या पत्रापर्यंत जाताना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही.
पत्रांतून सावित्री ज्याच्याशी संवाद साधते, तो स्पष्टपणे आपल्या समोर येत नसला किंवा ही पत्रं केवळ सावित्रीने लिहिलेली असली, तरी तिच्या बोलण्यातून, तिच्या स्पष्टीकरणातून, प्रत्येक पत्रातून हळूहळू 'तो' आपल्यासमोर उलगडत जातो. यासाठी एकविसावं पत्र खास आहे कारण त्याने विचारलेल्या साठ सांभाळलेल्या प्रश्नांची पाच संगतवार उत्तरं सावित्रीने यात दिली आहेत.
"मला माझं मन समजून घ्यायचं आहे. ते समजलं की तुमचंही समजेल."(पत्र १६)
असं म्हणणारी सावित्री मध्येच आपल्याला पेचात टाकते. यावेळी तो खरंच आहे की सावित्री फक्त त्याला आपल्यातच शोधण्याचा प्रयत्न करते, या संभ्रमात आपण पडतो. पण पुढे सावित्रीच आपल्याला त्या पेचातून बाहेर काढते.
बऱ्याचदा एक उच्चतम पातळीचं निस्वार्थी नातं अनुभवायला मिळतं, ते नातं रेगे आपल्याला या कादंबरीतून अनुभवायला देतात. अनेक प्रसंगांतून सावित्रीच्या तोंडून रेगे वेळोवेळी सांगतात, की जसं राधा कृष्ण होतो आणि कृष्ण राधा होते, तसंच कधीतरी आपण आपलं 'मी'पण विसरून दुसरं काहीतरी बनावं. त्यातून इतरांसाठी काय निष्पन्न होईल, माहित नाही, पण आपण स्वतःसाठी खूप काही नवं मिळवू शकतो.
"केवळ बदल याला महत्त्व नसतं, सगळंच बदलत असतं. त्यातून जी जाणीव प्रगत होत असते, तिला माझ्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे."(पत्र ३४)
कलाकार, लेखक, कवी हे कलाकृती निर्माण करत असतात. त्या कलाकृतीतील पात्रं ही त्यांची आपत्यं असतात. तेच त्यांच्या तोंडून आपले विचार, आपली मतं मांडतात. रेगेही त्यांच्या मानसकन्येच्या तोंडून आपल्याला आयुष्याचे अनेक रंगीबेरंगी पाठ शिकवून जातात.
शेवटी, सावित्रीचं काय झालं? तो आला का? त्यांच्या गोष्टीचं पुढे काय झालं? या पत्रांचा शेवट काय झाला? असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. पण ते प्रश्न तसेच अधांतरी ठेवून आपण आपल्याला विसरून कधी रेगेंची सावित्री होऊन जातो, ते आपल्यालाच कळत नाही.