सावधान - नारायण धारप | Savdhan - Narayan Dharap | Marathi Book Review



पुस्तक सावधान
लेखक नारायण धारप
पृष्ठसंख्या १४४
प्रकाशन साकेत प्रकाशन
समीक्षण आदित्य लोमटे 
मूल्यांकन ४.५ | ५




भयकथा आणि गूढकथांचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप हे आजच्या पिढीसाठी एक नवे, पण प्रभावी लेखक आहेत. आपल्या रहस्यमय कथांनी धारपांनी एकेकाळी मराठी मनावर राज्य केले होते. माणसाला नेहमीच रहस्य जाणून घेण्याची आवड असते, आणि त्याच उत्कंठा व उत्सुकता 'सावधान' हा कथासंग्रह पूर्ण करतो, ज्यामुळे वाचकांना समाधान मिळते.

आजच्या काळात मराठीत भयकथा आणि विज्ञानकथा लिहिणारे लेखक कमीच आहेत. विज्ञानकथेला भयाची किनार देऊन धारपांनी एक वेगळी शैली या पुस्तकात साकार केली आहे. या पुस्तकातील कथा या विज्ञानकथा प्रकारातील भयकथा आहेत, ज्या कथानकात पुढे काय होणार याची उत्कंठा टिकवून वाचकाला कथेत गुंतवून ठेवतात. इतकेच नव्हे, तर त्या रहस्यमय वातावरणाचा भाग वाचकाला बनविण्याचे कसब या कथांमध्ये दिसून येते.

पुस्तकातील कथा वाचकाला गुंतवून ठेवतात आणि रहस्यमय गूढ शक्तींनी मानवी आकलनाच्या पलीकडील जगाचे भव्य दर्शन घडवतात. यातील “काळाला तिरका छेद” यांसारख्या कथा काळाचा प्रवास किंवा टाईम ट्रॅव्हल सारख्या कल्पनांवर आधारित आहेत. यामध्ये कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची काळजी लेखकाने घेतली आहे.

त्याचप्रमाणे “आकाशात तरंगणारा डोळा” ही कथा विज्ञानाच्या तार्किक आधारावर बांधलेली असून गूढ वातावरण निर्माण करते. धारपांच्या लेखणीचा गुण दर्शवणारी ही कथा वाचकांना खिळवून ठेवते.

या कथा जितक्या रहस्यमय आहेत तितक्याच रोचकही आहेत. लेखकाने यामध्ये कथांना रटाळ होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. मानवाला न समजणाऱ्या अगम्य नैसर्गिक शक्ती आणि त्यांच्या भयप्रद अनुभवांचे दर्शन या कथांमध्ये वाचायला मिळते.

नारायण धारप यांचा हा कथासंग्रह रहस्यमय गूढकथांची मेजवानी ठरतो. यातील सर्व कथा नवीन आणि जुन्या मराठी वाचकांसाठी नक्कीच आकर्षक ठरतील यात शंका नाही.




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने