पुस्तक | रावण: आर्यावर्ताचा शत्रू |
लेखक | अमिश त्रिपाठी |
पृष्ठसंख्या | ३७४ |
प्रकाशन | वेस्टलॅंड पब्लिकेशन्स |
समीक्षण | अभिजीत देशपांडे |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
अंधार नसेल, तर प्रकाशाला काही हेतूच उरत नाही.
खलनायक नसेल, तर देवांचे काम काय?
प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या नावाजलेल्या रामचंद्र सिरीजमधील हे तिसरे पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी रावणाबद्दल एक काल्पनिक प्रतिमा उभी केली आहे आणि त्यालाच या पुस्तकाचा नायक म्हणून साकारले आहे. अमिश त्रिपाठी म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पौराणिक कथांचे काही दृश्य उभे राहतात, अलगद डोळ्यांभोवती फेर धरतात. त्या साऱ्या पौराणिक, रोचक कथा एका विशिष्ट प्रकारे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा त्यांचा हातखंडा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवा ट्रायोलॉजी ही सिरीज.
रामचंद्र सिरीजमधील हे तिसरे पुस्तक असल्यामुळे, याच्या आधीची दोन्ही पुस्तके वाचणे आवश्यक आहे. त्यातूनच बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. लेखकाने तिन्ही पुस्तके एका विशिष्ट प्रकारे गुंफलेली आहेत. त्यांच्या अर्थगर्भित आशयामुळे आपल्याला या पुस्तकात गुंतवून ठेवतात.
या पुस्तकातून आपल्याला रावण आपल्या आयुष्यात कसा वागला? आणि त्याच्या अशा वागण्यामागचे कारण काय? याची उत्तरे मिळतात. कन्याकुमारी आणि रावण यांच्यातील संवाद आपल्याला काही विशिष्ट गोष्टींवर विचार करण्यास प्रवृत्त करतो. धर्म आणि कर्म यांची आपली कल्पना आणि रावणाची कल्पना यांमध्ये बरीच विसंगती आहे, आणि हीच विसंगती आपल्याला राग, क्रोध, मत्सर यामधील बारीक अंतर शिकवते.
या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून ऐकलेल्या कथांपेक्षा काहीशा वेगळ्या आहेत. या दोन गोष्टींमधील तफावत आपल्याला रावणाचा आणि रामाचा एक वेगळा दृष्टिकोन शिकवते. त्यातून आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांमुळे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा वाटू लागतो आणि आपण त्यात गुंतून जातो. सहाजिकच आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि विचारांची परिपक्वता जाणवते. माझ्याप्रमाणेच तुम्हालाही हे पुस्तक खूप आवडेल, आणि त्यातील बऱ्याच गूढ रहस्यांची प्रचिती तुम्हाला येईल.