पुस्तक | पळती झाडे |
लेखक | नारायण धारप |
पृष्ठसंख्या | १६० |
प्रकाशन | साकेत प्रकाशन |
समीक्षण | आदित्य लोमटे |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
भयकथांचे अनभिषिक्त सम्राट नारायण धारप आताच्या पिढीसाठी नवीन आहेत. मराठी साहित्यात भयकथा, गूढकथा, विज्ञान कथा यांचे स्वतंत्र विश्व निर्माण करून त्यांनी साहित्यविश्वात आपली खास ओळख निर्माण केली आहे. ज्या काळात प्रसारमाध्यमांची तितकीशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. वाचनालयात त्यांची पुस्तके वाचण्यासाठी वाचक रांगा लावत असत. ही गोष्ट त्यांच्या लेखनाच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे.
मानवाला नेहमीच रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा असते. याच जिज्ञासेच्या भावनेत धारपांच्या कथा नायकांचे गूढ, रहस्यमय अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीत, म्हणजेच धारप स्टाईलमध्ये प्रस्तुत कथासंग्रहात मांडले आहेत. या कथासंग्रहातील सर्वच कथा भयकथाच आहेत. धारपांची चित्रमय भाषा कथेतील घटनांना वाचकांच्या डोळ्यांसमोर सजीव करते.
प्रस्तुत कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत, त्यापैकी 'पळती झाडे' ही एक भयविज्ञान कथा आहे. श्रीरंग नावाच्या कथा नायकाची सोलापूरला बदली होते, आणि तो आपल्या मामा-मामींकडे राहायला जातो. तेथे त्याला चंदी भेटते, आणि एक दिवस ती अचानक गायब होते. ही कथा वाचताना धारपांच्या सिद्धहस्त लेखणीची जाणीव होते.
ती विलक्षण गंभीर झाली होती, कोणत्यातरी तणावाखाली होती. तिचा मूड संसर्गजन्य होता. आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती; बाल्कनीचा पुढचा भाग तर आणखी अंधारलेला होता. तिकडे चंदी एकटक पाहत होती आणि मग तिने माझा डावा हात घट्ट धरला. ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली, पण तिने मला सांगायची गरजच नव्हती. मलाही ते दिसत होतं - ते किंवा ती बाल्कनीच्या त्या टोकाकडून आमच्या दिशेने येत होतं.
अशा प्रसंगांच्या वर्णनाने मनाला भयाने ग्रासून टाकते. भयकथासंग्रहातील सर्व कथा मानवी व अमानवी शक्तींच्या सीमारेषेचे सुंदर निरूपण करतात. तसेच, या कथा मानवी मनावर आमानवी शक्तींचा प्रभाव व त्यातून निर्माण होणारे भय स्पष्ट करतात. नेहमीच्या त्रिमितीय मितींमध्ये घडणाऱ्या गोष्टींना अतींद्रिय मितीची जोड देऊन, वाचकांना त्यांच्या नेहमीच्या आयुष्यातील एक नवा भयाचा अनुभव देण्याचे धारपांना कसब साध्य झाले आहे.
धारपांची भाषा अत्यंत चित्रमय आहे आणि त्यांच्या लेखनातून घटनांचे दृश्य वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. अज्ञात, अकल्पनीय आणि अतर्क्याचा मागोवा घेणाऱ्या या कथा मराठीतील श्रेष्ठ भयकथा ठरतात. शेवटी, 'पळती झाडे' हा कथासंग्रह भयकथा प्रेमींसाठी नक्कीच एक मेजवानी ठरतो.