पुस्तक | नर्मदे हर हर |
लेखक | जगन्नाथ कुंटे |
पृष्ठसंख्या | २५६ |
प्रकाशन | प्राजक्त प्रकाशन |
समीक्षण | आदित्य लोमटे |
मूल्यांकन | ४.८ | ५ |
शतकानुशतके माणसे नर्मदा परिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हे असेच एक परिक्रमावासी. लेखकाने १९९९ ते २००१ दरम्यान एकूण तीन परिक्रमा केल्या; त्यांचे अनुभव या पुस्तकात प्रकट केले आहेत. देश-विदेशात पत्रकार राहिलेले जगन्नाथ कुंटे हे केवळ धार्मिक-आध्यात्मिक ओढीने परिक्रमेला जाणारे भाविक नाहीत, तर पूर्वकल्पना मनावर न ठेवता, मोकळ्या मनाने येणाऱ्या प्रत्येक अनुभूतीला सामोरे जाणारे एक शोधयात्री आहेत. पत्रकारितेच्या अनुभवाचे सामाजिक भान आणि आध्यात्मिक जाण ही त्यांची शिदोरी. एकेदिवशी साधनेत त्यांना आदेश मिळतो की, नर्मदा परिक्रमेला जा, आणि त्यानुसार लेखक परिक्रमेला सुरुवात करतो. 'परी' म्हणजे सभोवती, 'क्रम' म्हणजे फिरणे. उजव्या बाजूला देवतेला ठेवून फिरणे म्हणजे प्रदक्षिणा किंवा परिक्रमा.
अमरकंटक येथे नर्मदेचा उगम आहे, तेथून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपारिक नियम आहे; मात्र काही जण ग्वारी घाट, ओंकारेश्वर, नारेश्वर, गरुडेश्वर किंवा इतरही ठिकाणांहून परिक्रमेला सुरुवात करतात.
परिक्रमा सुरू करण्यापूर्वी, जिथून सुरुवात करायची तेथून प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र द्यावे लागते आणि त्यावर निरनिराळ्या गावांत शिक्के मारून घ्यावे लागतात. डाळ किंवा भात शिजवण्यासाठी एक छोटे पातेले, एक छोटी थाळी, चहा किंवा ताकासाठी स्टीलचा एक प्याला घेऊनच प्रवासाला निघावे.
परिक्रमेतील अनेक गमती लेखकाने आपल्या खास शैलीत सांगितल्या आहेत. मीठ या खारट पदार्थाला 'रामरस' म्हणतात, तर चावलराम, सब्जीराम, चपातीराम अशी पद्धत पदार्थांच्या नावात 'राम' लावण्याची आहे. लेखकाला परिक्रमा करताना अनेक वल्ली भेटतात; त्यांपैकी कुंटल चॅटर्जी एक खास वल्ली आहे. त्याच्यासोबतचा लेखकाचा प्रवास वाचताना आपणही नकळत त्यांच्यात सामील होऊन नर्मदा किनारी पोहोचतो.
परिक्रमेत असताना येणाऱ्या अनुभवांबद्दल लेखक मनमोकळेपणाने लिहितो. शूलपाणीश्वराच्या जंगलातील लुटीचा प्रसंगही, केलेल्या तीन परिक्रमा, त्यातील विलक्षण अनुभव, चमत्कार हे सर्व खरे का खोटे? याची चर्चा करायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे. या सर्वात अडकून न राहता आलेले अनुभव एकसुरी न वाटता बहुआयामी वाटतात. चमत्कारही वाटावा असा अनुभव लेखक सहजतेने सांगतो. मोकळ्या मनाने खऱ्या अनुभूतीला सामोरे जाणारे जगन्नाथ कुंटे हे एक खरे शोधयात्री वाटतात.
परिक्रमेतील अनेक गावांतील अनुभव, माणसांचे स्वभाव लेखकाला भारावून टाकतात. साधुत्वाच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीवरही ते कोरडे ओढतात. तसेच, मेधा पाटकर यांच्या कामाबद्दल तळमळीने लिहितात.
शेवटी 'नर्मदे हर हर' हे नर्मदा परिक्रमेवरील एका झपाटलेल्या प्रवासाचे कथन वेगळेपणा घेऊन येते आणि वाचता-वाचता आपल्याला नकळत नर्मदा किनारी घेऊन जाते.