पुस्तक | मुसाफिर |
लेखक | अच्युत गोडबोले |
पृष्ठसंख्या | ४८४ |
प्रकाशन | मनोविकास प्रकाशन |
समीक्षण | संदिप सांगळे |
मूल्यांकन | ४.१ | ५ |
आयुष्याचा अर्थ मागे वळून पाहताना कळतो, पण ते जगावं लागतं मात्र पुढं बघून....!
हे वाक्य लक्षात ठेवून लेखक अच्युत गोडबोले यांनी आपलं आयुष्य सगळ्यांसमोर सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या आत्मचरित्रातून केला आहे. त्यांची 'संगणकयुग', 'बोर्डरूम', 'नादवेध', 'किमयागार', 'गुलाम', 'कॅनव्हास', 'मनात', ‘जिनिअस’ अशी कित्येक पुस्तकं वाचकांच्या मनात घर करून गेली आहेत. या सगळ्यांची यशस्वी बांधणी करताना त्यांचं आयुष्य वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत आलं.
अच्युत गोडबोले यांचा जन्म सोलापूर येथे झाला. एकत्रित कुटुंबात वाढल्यामुळे त्यांचं बालपणही खूप रंजक होतं. त्यांच्या सर्व भावंडांनी आपापल्या क्षेत्रांत चांगली प्रतिष्ठा मिळवली होती. लहानपणीच्या अनेक आठवणींमध्ये इलेक्ट्रीशियनने लावलेला उलटा पंखा, काकांचा शर्ट घालून आलेला धोबी, परीक्षा संपल्यावर गदग रेस्टॉरंटमध्ये खाल्लेला डोसा, सुट्टीत पुण्याला जाण्याचा आनंद अशा खूप मजेशीर गोष्टी त्यांनी अनुभवल्या. त्यांचे वडीलही हुशार व्यक्तिमत्त्वाचे असल्याने ते अनेक गोष्टी सांगत असत. मग सोलापूरचा भुईकोट किल्ला, हुतात्मा चौक, मोतीबागेतला कबर तलाव, पाच्छा पेठ, तिथली विविध सिनेमा थिएटर्स, आणि हैदराबादी-हिंदी बोलणाऱ्या माणसांच्या कथा, या सर्व आठवणी खूप रंगतदारपणे सांगितल्या आहेत.
पुढे त्यांच्या आयुष्यात आलेले पुजारी नावाचे शिक्षक, बोर्डात येण्याचा आनंद, गणितात मिळणारे चांगले गुण, पण हिंदीत येणारा संघर्ष या आठवणी विशेष ठरल्या.
IIT च्या प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊन ते एका वेगळ्याच जगात पोहोचले. तिथल्या होस्टेलवरील गमतीजमती, विविध पुस्तकांवरील चर्चा, साहित्य-संगीत यावर घालवलेल्या रात्री या आठवणी अविस्मरणीय ठरल्या. एका रागाचा आनंद घेण्यासाठी पावसात प्रवास करून पहाटे मामाच्या घरावर थाप मारणं, कॅसेट मिळाली नाही म्हणून बाजारातून आणून ऐकणं हे सगळं अप्रतिम होतं. साहित्य समजून घेण्यासाठी अनेक पुस्तकं वाचणं आणि इतिहासाचा अमर्याद शोध लावणं ही त्यांची जिद्द होती.
गरीबी आणि श्रीमंती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आयुष्यभर काम करण्याचा वडिलांना दिलेला शब्द, शहाद्याच्या चळवळीत सहभागी होणं, त्या काळातील जेलमधील दहा दिवसांचे विदारक अनुभव यांनी त्यांना खूप काही शिकवलं. हे सगळं सोडून ते मुंबईला परतले. धारावीच्या झोपडपट्टीतील जीवन, कामाठीपुरातील वेश्यांचे अनुभव याने त्यांचे मन हेलावून गेले.
आयुष्यात काहीतरी करायचं या विचाराने त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड, प्रोग्रॅमिंग शिकण्याची ऊर्मी, आणि नंतर शोभा या पत्नीच्या सोबत सुरू झालेला प्रवास, त्यांच्या मुलाच्या ऑटिझम आजारातून उभा राहून अशा मुलांसाठी स्थापन केलेली संस्था, यासाठी केलेले परिश्रम उल्लेखनीय ठरले. 'Operating System' हे लिहिलेलं पुस्तक आणि त्याचा झालेला प्रचंड खप, यांनी त्यांना आत्मविश्वास दिला.
L&T, PATNI, INFOTECH यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करूनही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. पण मन रमेनासं झाल्यामुळे त्यांनी या जगमगाटातून पायउतार होऊन पुन्हा मित्रांच्या मदतीने पुस्तकं लिहण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातही ते कमालीचे यशस्वी ठरले. या पुस्तकातील प्रत्येक प्रसंग वाचकांना नवी उभारी देतो. त्यामुळे हे पुस्तक निश्चितच वाचायला हवं.