पुस्तक | मोडेन पण वाकणार नाही |
लेखक | वसंत पुरुषोत्तम काळे |
पृष्ठसंख्या | ११२ |
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस |
समीक्षण | नेहा गावडे |
मूल्यांकन | ४.८ | ५ |
मराठी साहित्यसृष्टीतील एक महत्वाचे लेखक प्रस्थ म्हणजे व. पु. काळे. मराठी वाचकांच्या मनावर वपुंच्या लेखणीने आणि त्यांच्या पुस्तकांनी अक्षरशः गारूड घातले आहे. त्यामुळे मोडेन पण वाकणार नाही वाचायला घेतले तेव्हा ज्ञानात आणि अनुभवात भर घालणारे सुंदर आणि अजोड असे काहीतरी वाचायला मिळणार याबद्दल शंका नव्हती. पुस्तक वाचताना वाचकांच्या अपेक्षांचा कुठेही भंग होत नाही.
मोडेन पण वाकणार नाही हा आठ कथांचा कथासंग्रह आहे. वपुंच्या शब्दांत सांगायचे झाले तर, आठ वेगवेगळ्या 'पॅटर्न'च्या व्यक्तींशी आपली या कथासंग्रहात भेट होते. या आठ व्यक्तींचे वागणे आणि त्यांचे विचार त्यांच्या परिस्थितीनुसार वेगळे असले तरी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आलेल्या व्यक्ती किंवा परिस्थितीसमोर न वाकण्याची आणि ठामपणे, स्वाभिमान राखून उभे राहण्याची समान वृत्ती या आठही प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये दिसून येते. यामुळेच पुस्तकाचे शीर्षक किती सार्थ आहे याची जाणीव वाचकाला होते.
एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहताना, या कथांतील काही पात्रांचे वागणे आणि विचार अवाजवी वाटू शकतात. परंतु त्या पात्रांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, त्यांच्या स्वभावाला धरूनच त्यांचे वागणे आहे याची जाणीव होते. त्यामुळे कथेच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत व्यक्तिरेखांच्या विचारांमध्ये आणि स्वभावामध्ये कुठेही विसंगती आढळत नाही.
वपुंनी रंगवलेल्या या आठ व्यक्तिरेखा कधी स्वतःची तत्त्वे जपण्यासाठी तर कधी स्वतःच्या किंवा जवळच्या माणसांच्या स्वाभिमानाची आणि इभ्रतीची जपणूक करण्यासाठी कोणासमोरही शरण गेल्या नाहीत. प्रत्येक कथेतल्या स्वाभिमानासाठीच्या लढ्यात सर्वस्व गमावून नामशेष होण्याची वेळ आली, तरी या व्यक्तींनी त्यांच्या वागणुकीतून मोडेन पण वाकणार नाही या उक्तीला सार्थ ठरवले आहे.
एकशे बारा पृष्ठे आणि आठ कथा असल्याने हा कथासंग्रह लवकर वाचून संपतो. परंतु या आठ कथांतील विविध पात्रे, त्यांचा जीवनाकडे आणि वाट्याला आलेल्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाचकाच्या मनावर जबरदस्त प्रभाव पाडतो. या कथा वाचकाला अंतर्मुख करतात आणि म्हणूनच दीर्घकाळ स्मरणात राहण्याची ताकद या कथांमध्ये आहे.
कठीण परिस्थितीलाही प्रबळ स्वाभिमानाच्या जोरावर तोंड देण्याची प्रेरणा हा कथासंग्रह देतो. त्याचसोबत, प्रसंगी अवाजवी स्वाभिमानामुळे भोगाव्या लागणाऱ्या किंमतीची जाणीवही हा कथासंग्रह करून देतो.