पुस्तक | माझ्या लिखाणाची गोष्ट |
लेखक | अनिल अवचट |
पृष्ठसंख्या | १५० |
प्रकाशन | समकालीन प्रकाशन |
समीक्षण | मृणाल जोशी |
मूल्यांकन | ४ | ५ |
हे पुस्तक फ्लिपकार्ट वरून विकत घ्या | Buy on Flipkart
सर्वात आधी प्रांजळपणे कबूल करतो की अनिल अवचट यांचे ह्या एका पुस्तकाखेरीज दुसरे एकही पुस्तक वाचले नाही. अर्थातच तो दोष माझा आहे, आणि ह्या क्षणी त्याचे वाईटही वाटत आहे. समाजातील ज्वलंत विषयांवर पोटतिडकीने लिहिणारा लेखक, स्वतःचे लेखन साचेबद्ध न ठेवता, एका वर्तुळात किंवा एका चौकटीत न मावणारा लेखक, स्वतःला वाटेल तसे लिहिणारा, स्वतःच्या अटींवर व नियमांवर लेखन करणारा, कोणत्याही अडथळ्यांना न भिता विषयांना सरळ भिडणारा लेखक, कलासक्त मन जपणारा, फुलांत-पानांत रमणारा, लहान मुलांमध्ये नाचणारा-गाणारा लेखक — कलावंत! हे सगळे ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ वाचताना प्रकर्षाने जाणवते.
मुळात कोणत्याही वाचकाला लेखकाच्या सुरुवातीपासूनच लेखन वाचायला हवे. त्यामुळे लेखक कसा घडत गेला, हे आपोआप समजते. पण माझी चूक अशी झाली की मी या लेखकाचे 'लेटेस्ट' पुस्तक आधी हाती घेतले. मात्र, एका अर्थाने ते बरेच झाले, असे म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे त्यांची एकूण ग्रंथसंपदा कशी घडत गेली, हे कळले.
अनिल अवचट यांची ३८-३९ पुस्तके ही अतुलनीय ग्रंथसंपदा आहे. या साऱ्या लिखाणाची गोष्ट ह्या पुस्तकात मोठ्या खुबीने मांडली आहे. इतर लेखक गोडी-गुलाबी कथासंग्रह, काव्यसंग्रह लिहित असताना, अनिल अवचट वेगळ्या धाटणीचे विषय हाताळताना दिसतात. विषय कोणताही असो, त्या विषयासाठी त्यांचा सखोल अभ्यास जाणवतो. अनिल अवचट यांचे लिखाण सत्याशी निगडित आहे. त्यांच्या लेखांसाठी प्रचंड भटकंती करणारा हा लेखक एका लेखासाठी मैलोन्मैल प्रवास करतो, त्या लोकांच्या घरात राहतो, त्यांच्या संसारात व आयुष्यात डोकावतो. हे अचाट अनुभव आहेत. हे लिहायला सोपे वाटले तरी प्रत्यक्ष कृतीत कठीण काम आहे.
स्वतःच्या लिखाणात त्यांनी जुने, साचेबद्ध शब्द न घेता, अनोख्या प्रकाराने विषय मांडले आहेत. वाचताना असे वाटते की, एखादा आपल्याला कानात या लेखांच्या गोष्टी सांगतो आहे.
घटनांविषयी, माणसांविषयी, प्रांतांविषयी, स्वतःविषयी ब्रॉड माईंडने लिहिलेले लेखन हे अवचट यांच्या लिखाणाचा मूलभूत पाया आहे. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेले विषय — हमाल लोक, दलित, व्यसनी, प्राणी, धार्मिक अंधश्रद्धा, वैश्यवस्तीतील स्त्रिया, आदिवासी, विद्यार्थी, मुक्तांगण, ओरिगामी, बासरी, लाकडाची कला, घरचे लोक, मित्र, गुरू यांच्यासाठी त्यांनी अप्रतिम लेखन केले आहे. हे लेखन केवळ विषयांचा आवाका दाखवणारे नाही, तर त्यातील निरीक्षणांची खोलीही जाणवते. विविध लोकांशी संवाद साधून, त्यांचे सुख-दुःख जाणून घेत, त्यांची विवंचना मांडून, त्यांनी लेखन साकारले आहे. कुठलाही विषय वर्ज्य नसतो, हे त्यांच्या ग्रंथसंपदेतून स्पष्ट होते.
या लेखांमध्ये त्या काळातील राजकीय, आर्थिक परिस्थितीचा उत्तम आढावा घेतला आहे. त्या काळातील अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी लिहिले आहे.
अनिल अवचट एक लेखक, एक कलावंत, एक समाजसेवक, एक माणूस म्हणून कसे घडले, हे या पुस्तकात फार सुंदरपणे मांडले आहे. त्यांनी सहजसोप्या भाषेत उत्कटतेने सर्व विषय समजावले आहेत. हे विषय त्यांच्या समोर कसे आले? कोणामुळे आले? कोणत्या घटना किंवा व्यक्ती यासाठी कारणीभूत ठरल्या? याचे नेमके वर्णन त्यांनी केले आहे. एका लेखकाने स्वतःच्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहिलेले हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
आजही अनिल अवचट त्यांच्या घरात कधी लिहिताना, कधी बासरीचे सूर काढताना, कधी मुलांना ओरिगामी शिकवताना, कधी लाकूड कोरताना दिसतात. माध्यम कोणतेही असो, व्यक्त होणे महत्त्वाचे. या लेखनातूनही आपण स्वतःसाठी आनंद शोधू शकतो. हळूहळू त्यांची इतर पुस्तकेही वाचणार आहे.