काळे पाणी - विनायक दामोदर सावरकर | Kale Pani - Vinayak Damodar Savarkar | Marathi Book Review


पुस्तक काळे पाणी
लेखक विनायक दामोदर सावरकर
पृष्ठसंख्या २८८
प्रकाशन रिया प्रकाशन
समीक्षण हर्षाली वरखडे
मूल्यांकन ४.५ | ५



सावरकरांची ही तिसरी कादंबरी आहे. त्यांच्या ‘माझी जन्मठेप’ या कादंबरीवर इंग्रजांनी १७ एप्रिल १९३४ रोजी बंदी घातली. ती बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच सावरकरांनी ‘काळे पाणी’ ही कादंबरी लिहिण्याचा घाट घातला. यामागचा उद्देश एवढाच होता की अंदमानातील कष्टप्रद, दुःखदायक, क्लेशकारक, आणि अन्यायकारक जीवन कसे जगावे लागते, हे दाखवणे.

प्रेम ही एक कोवळी आणि हळुवार भावना आहे. त्यामुळे सुरुवातीला सावरकरांसारख्या देशासाठी लढताना प्रसंगी कठोर होणाऱ्या आणि इंग्रजांशी ठामपणे तोंड देणाऱ्या योद्ध्याकडून प्रेमावर कादंबरी लिहिण्याचा विचार झाला की भुवया उंचावतात. पण सावरकरांनी मात्र या कादंबरीला पुरेपूर न्याय दिला आहे.

पुस्तकातील कथानक प्रमुखतः मालती आणि किशन या दोन पात्रांभोवती फिरते, तरीही इतर पात्रांनीही आपापल्या परीने रंग भरून कथानकाची शोभा वाढवली आहे. किशन-मालती यांच्यात ओझरती ओळख होते, आणि नंतर भयाण व भेसूर परिस्थितीतून मार्ग काढताना दोघांमध्ये निर्माण झालेले प्रेम वाचकाच्या मनात त्यांच्या बद्दल आत्मीयता निर्माण करते. अंदमानातील अंधारी, भयावह कारागृहे, रोजच्या मरणयातना, आणि तरीही एकमेकांविषयी असलेली ओढ आपल्या डोळ्यांत नकळत पाणी आणते.

एक मुलगा हरवलेला असल्याने आपल्या एकुलत्या मुलीवर जीव ओवाळून टाकणारी आई, राक्षसी वृत्तीचा रफीउद्दीन, अंदमानात भेटलेले १८५७ च्या युद्धातील अप्पाजी, आणि वेळप्रसंगी मदतीला धावून येणारे जावरे जातीचे सहकारी हे मनुष्याच्या स्वभावाचे विविध पैलू उलगडतात.

सावरकरांनी स्वतः अंदमानातील कष्टप्रद जीवन भोगले असल्याने त्यांनी आपल्या उच्च दर्जाच्या लेखणीतून ते अप्रतिमरित्या मांडले आहे. अशा कटू अनुभवांवर आधारित कादंबरी रुक्ष होण्याची शक्यता असते. पण सावरकरांनी आपल्या लिखाणात हा समतोल राखण्यात यश मिळवले आहे. त्यांनी कैद्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आरसा मांडला असला तरी काही कैद्यांना ही शिक्षा कशी योग्य होती, हेही दाखवले आहे. अशा शिक्षेमुळे मानववस्तीस अयोग्य असलेली जमीन कशी उपयोगात आणली गेली, याचा उत्तम नमुना त्यांनी मांडला आहे.

काही ठिकाणी भाषा किंवा शब्द कठीण वाटू शकतात, पण बऱ्याच ठिकाणी इंग्रजी प्रतिशब्द दिल्यामुळे संदर्भ समजणे सोपे झाले आहे. उलट, माझ्या मते या कादंबरीची भाषा उत्कृष्ट प्रतीच्या साहित्याचे उदाहरण आहे.

अंदमानातील यातनामय जीवन आणि सुंदर, तरल प्रेमकथा सावरकरांनी अशा प्रकारे गुंफली आहे की त्यामधून एका उच्च दर्जाच्या लेखकाचे, कवीचे, किंबहुना उत्कृष्ट साहित्यिकाचे दर्शन होते. तुम्हाला जर प्रेमकथा वाचायला आवडत असेल आणि सावरकरांच्या साहित्यिक भावूकतेची बाजू जाणून घ्यायची असेल, तर ही कादंबरी वाचायलाच हवी!




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने