जहांगीर - Jahangir | पार्वती शर्मा - Parvati Sharma | Marathi Book Review



पुस्तक जहांगीर
लेखिका पार्वती शर्मा
अनुवाद प्रशांत तळणीकर
पृष्ठसंख्या २४८
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस
समीक्षण उत्कर्षा मिसाळ
मूल्यांकन ४.१ | ५



नरुद्दीन मुहम्मद जहांगीर, चौथा मुघल बादशहा, तख्तावर आरूढ होण्यापूर्वी शहजादा सलीम म्हणून प्रसिद्ध होता. ‘जलालुद्दीन मुहम्मद अकबर’ हा सलीमचा पिता, तर ‘मरिअम-उझ-झमानी’ ही सलीमची आई होती. जहांगीर हा अकबराचा नवसाचा ज्येष्ठ पुत्र होता.

ओमरच्या राजा भगवानदास यांची कन्या मानबाईशी १५८५ मध्ये जहांगीरचा पहिला विवाह झाला. मानबाई खुसरो मिर्झा व सुलतान-उन-निसा बेगम या मुलांची आई होती. मिर्झा मुराद हा सलीमचा मधला सावत्र भाऊ, तर मिर्झा दानियाल हा धाकटा सावत्र भाऊ होता.

१२-१३ व्या वर्षी मिर्झा मुराद व मिर्झा दानियाल यांचा पराक्रम थक्क करणारा होता. परंतु नंतर ते व्यसनाधीन झाले. त्यानंतर सलीम म्हणजेच सम्राट जहांगीरचे कार्यकर्तृत्व समोर येऊ लागले. सात प्रकरणांतून या सम्राटाच्या शैलीदार व आनंददायी चरित्रातून जहांगीर हा प्रतिभाशाली, कलेचा चाहता आणि माणूस म्हणून कसा होता, हे समजते.

सम्राट अकबर बादशहा सुद्धा निसर्ग व कलेचा चाहता व महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याच्या कारकिर्दीत युरोपियन लेखक, बिरबल व तानसेनसारखे गुणग्राही लोक होते. अकबराच्या ‘नवरत्न दरबारा’तील अनेक ऐतिहासिक किस्से आणि चातुर्यकथा आजही आनंदाने ऐकल्या जातात.

लहानपणी सलीमचे धार्मिक शिक्षण शेख अब्दुल नबी यांच्याकडे झाले, तर तलवारबाजीचे शिक्षण दख्खनच्या सरदाराकडे झाले. सलीम त्याला वर्जिश (व्यायाम) खान म्हणत असे. उच्च कुळातील मुलांना मिळणारे शालाबाह्य शिक्षणही सलीमला मिळाले, पण यावर करडी नजर अकबराचीच होती. अकबर स्वतः सलीमला न्यायदानाचे नियम, आत्म्यांची गुपिते व मनाचे विलक्षण अंतरंग शिकवत असे.

सलीमच्या व्यक्तिमत्त्वातील जाणतेपण ‘राजा जहांगीर’ या पदवीस पात्र ठरले. सलीम आठ-नऊ वर्षांचा होताच त्याचा अज्ञाधारकपणा, चांगले वर्तन, समंजसपणा व चिकाटी या गुणांबद्दल कौतुक होऊ लागले. त्यामुळे त्याला दहा हजार जाट व दहा हजार स्वारांची मनसबदारी बहाल केली गेली. धाकटे शहजादे मुराद व दानियाल यांनाही अनुक्रमे सहा हजार व सात हजार जातींचे हुद्दे देण्यात आले.

‘राजसत्तेचा विद्यार्थी’ म्हणून सलीमला अकबर दरबारात सर्वोच्च स्थान होते. अकबर स्वतः चौदाव्या वर्षी बादशहा झाल्याने, त्याने आपल्या किशोरवयीन शहजाद्यांना लष्करी तुकड्यांचे प्रमुखपद दिले, जेणेकरून त्यांना कर्तव्य व जबाबदारीची जाणीव होईल.

सलीम १३ वर्षांचा व मुराद १२ वर्षांचा झाल्यावर काबूलमधील बंड मोडण्याच्या मोहिमेचे नेतृत्व अकबराने त्यांना दिले. मुराद आघाडीने पुढे गेला, सलीम व अकबर मागून गेले. परंतु बादशहा पोहोचण्यापूर्वीच मुरादने मिर्झा हकीमचा पराभव करून मोहिम यशस्वी केली.

मुरादच्या लहान वयातील या पराक्रमाने त्याला विजयी माळ मिळाली. परंतु अकबराने सलीमची युद्धनीतीत कमी आवड ओळखली व त्याला बैरामखानचा मुलगा अब्दुर रहीम याच्याकडे सोपवले.

जहांगीरने आपल्या ‘तुजुक-ए-जहांगीरी’ या आत्मकथनात समर प्रसंग व गुलाबापासून अत्तर बनवण्याची कला नूरजहां बेगमच्या आई अस्मत बेगमने शोधून काढली, हे लिहिले आहे. सलीम हा नूरजहांचा दुसरा पती होता. नूरजहां अत्यंत हुशार व सकारात्मक निर्णय घेणारी होती. तिने शेवटपर्यंत जहांगीरला साथ दिली.

१६०२ मध्ये अकबर बादशहाला साधकांचा बंधुत्वविकास करण्यासाठी राजी केलेल्या अबुल फजलचा खून सलीमने केला. त्यामुळे अकबर हतबल झाला. त्याच वेळी जहांगीरच्या मद्यपानामुळे पित्याला विषप्रयोग केल्याच्या गैरसमजांनी वाद निर्माण केले.

१६०५ मध्ये अकबर मरणासन्न अवस्थेत असताना नाराजीनिशी त्याने जहांगीरच्या डोक्यावर ‘शाही पगडी’ ठेवली. या पगडीमागे अकबराची शोकांतिका दडलेली होती. लेखिकेचा सखोल अभ्यास आणि उत्तम अनुवाद यांमुळे 'जहांगीर' हे चरित्र वाचनीय झालेलं आहे. तत्कालीन ऐतिहासिक संदर्भांमुळे इतिहास वाचकांसाठी महत्वाचे हे पुस्तक ठरते.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने