पुस्तक | हसरे दुःख |
लेखक | भालचंद्र दत्तात्रय खेर |
पृष्ठसंख्या | ५१४ |
प्रकाशन | राजहंस प्रकाशन |
समीक्षण | कुमार विश्वजीत |
मूल्यांकन | ४.४ | ५ |
माझ्या संग्रहात असलेली बरीच पुस्तके, जी धावपळीच्या काळात वाचायची राहून गेली होती, ती मला लॉकडाऊनच्या काळात वाचण्याची एक सुवर्णसंधी मिळाली. त्यात भा. द. खेर लिखित हसरे दुःख हे पुस्तकही होतं. विनोदवीर पु. ल. देशपांडे यांचे दैवत, जगप्रसिद्ध हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे जीवनचरित्र नुकतेच वाचून पूर्ण केले.
लोकांना नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरचे बालिशपण आणि निरागसता दिसते, पण त्यामागचे दुःख कोणालाच जाणवत नाही. पाच वर्षांच्या चार्लीने, आईचा गाण्याचा कार्यक्रम बंद पडू नये म्हणून रंगमंचावर प्रवेश केला आणि तो कायमचाच ठरला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत, कष्टमय बालपणात, गरिबीशी झुंज देताना, आईला अधूनमधून येणारा वेडाचा झटका, वयाने मोठा असलेला सावत्र भाऊ सिडने याचे अतोनात प्रेम यामुळे चार्लीला आधार मिळाला. परिस्थिती जरी वाईट असली तरी आईच्या सुसंस्कृत संस्कारामुळे चार्लीच्या अंधकारमय जीवनात सतत प्रकाश पडत राहिला. सतत होणाऱ्या काळाच्या आघातामुळे, दुःखमय प्रसंगांतून आणि दारिद्र्यातून एक प्रगल्भ कलाकार घडत गेला. त्याच्या कलेला करुणेची झालर मिळत गेली.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी भाग्याचा दिवस उगवतोच. तसाच तो चार्लीच्याही आयुष्यात उगवला. एका पात्रासाठी त्याच्या दिग्दर्शकाने त्याला विनोदी पोशाख करण्यास सांगितले. "तू विनोदी दिसायला हवा," असे बजावले. तेव्हा चार्लीने वेशभूषेच्या खोलीत जाऊन मोठी ढगळ विजार चढवली, बॅगी पँटवर तंग जॅकेट आणि तंग कटवे कोट घातला, डोक्याच्या आकारापेक्षा लहान डबी हॅट घेतली, हातात काठी घेतली आणि पायाच्या आकारापेक्षा मोठे बूट घातले. या पोशाखासोबतच त्याने ती फेंगडी आगळीवेगळी चाल तयार केली आणि एक संपूर्ण विनोदी व्यक्तिरेखा उभी केली. या विनोदी व्यक्तिरेखेने पुढे ट्रॅम्प म्हणून प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हुकूमशहा हिटलर आणि चार्ली यांचा जन्म एकाच आठवड्यात झाला. हिटलरने लाखो माणसांना युद्धाच्या दरीत लोटून संसार उद्ध्वस्त केले, तर चार्लीने त्याच लोकांना हसवून जीवन जगण्याची प्रेरणा दिली. चार्लीचा व्यक्तिगत संसार जरी सुकला तरी त्याचा कलेचा अलौकिक संसार मात्र फुलला. यशाच्या सतत पायऱ्या चढत असलेल्या चार्लीने व्यक्तिगत संसाराकडे दुर्लक्ष केले. परंतु उतरत्या वयात चॅप्लिन यांच्या चौथ्या पत्नी ऊना (वय १८) यांनी शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. ऊनाने इतर तीन पत्नींसारखे हिरोईन बनण्यासाठी किंवा पैशाच्या मोहापोटी त्यांच्याशी लग्न केले नव्हते. तिने संसार सुखाचा करण्यासाठी आणि मुलांचे संगोपन व्यवस्थित करण्यासाठी लग्न केले. उतरत्या वयात तिने त्यांचा संसार नीट उभा केला.
परंतु कलेचे क्षेत्र हे अपूर्णच असते. कितीही काम केले तरी कलाकाराला ते कमीच वाटते. वृद्धापकाळातही चार्लीला नेपोलियन आणि येशू ख्रिस्त यांवर चित्रपट काढायचे होते. पण काळ पुढे जात होता आणि त्यांची तब्येत साथ देत नव्हती. तरीही या माणसाने, एवढ्या दुःखाचा भार असूनही, मनमुराद हसणे शिकवले.
अमेरिकेने त्यांचा ऑस्कर पुरस्कार देऊन मोठ्या आदराने गौरव केला. माणूस कितीही मोठा असला तरी कालगतीला कोणीही थांबवू शकत नाही. शेवटी, १९७७ सालच्या नाताळच्या दिवशी, मिस्टर चॅप्लिन शांतपणे या नाट्यमय जगातून कायमचे निघून गेले.
हसरे दुःख ही एका महान मूक अभिनय सम्राटाचे जीवनचरित्र वाचताना अनेक प्रसंग मनाला भिडतील. वाचकांमध्ये वेगळी उमेद निर्माण होऊन परिस्थितीसमोर न झुकता अपार कष्टांद्वारे जीवनाची उंची गाठण्याची प्रेरणा मिळेल. म्हणून वाचकांनी चार्ली चॅप्लिनचे आत्मकथन एकदा जरूर वाचावे.