पुस्तक | जिनियस: जग बदलणारे अणुविज्ञान (लीझ माइट्नर) |
लेखक | अच्युत गोडबोले, दीपा देशमुख |
पृष्ठसंख्या | ५९ |
प्रकाशन | मनोविकास प्रकाशन |
समीक्षण | अभिषेक गोडबोले |
मूल्यांकन | ४ | ५ |
अच्युत गोडबोलेंचं 'मुसाफिर' हे पुस्तक वाचलं आणि ते इतकं आवडलं की त्यानंतर कधीही पुस्तक प्रदर्शनात किंवा पुस्तकाच्या दुकानात गेलो की ज्यावर त्यांचं नाव असेल ते पुस्तक घेण्याची सुरुवात केली. त्यावेळी घेतलेल्या पुस्तकांमध्येच ही जग बदलणाऱ्या जिनियस व्यक्तिमत्त्वांची रंजक, प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य मांडणारी अच्युत गोडबोले आणि त्यांच्या सहलेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेली 'जिनियस' ही सिरीज हाती लागली.
अच्युत गोडबोलेंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी. त्यांच्या कुठल्याही विषयावरच्या पुस्तकात असं वाटतं की ते आपल्याला शेजारी बसवून एकेक गोष्ट उलगडून सांगताहेत. त्यामुळं विज्ञान असो, अर्थकारण असो, हिंदुस्थानी आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत असो किंवा मानसशास्त्र, त्यांची कुठल्याही विषयावरची पुस्तकं आपल्याला त्या विषयाची गोडी लावल्याशिवाय राहत नाहीत.
शाळेत असताना ज्या शिक्षकांचं शिकवणं मला आवडायचं, तो विषय मला आवडायचा. मात्र, त्यात विज्ञान कधीच आलं नाही, त्यामुळे तो विषय मला कधी जवळचा वाटला नाही. पण ही पुस्तकं वाचताना आपण किती रंजक गोष्टींपासून एवढी वर्षं विनाकारण दूर होतो, हे लक्षात आलं.
सिरीजमधलं हे पुस्तक आहे लीझ माइट्नर या ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या आणि आपलं बरंचसं महत्वाचं कार्य जर्मनीमध्ये पार पाडणाऱ्या एका महान, तरीही उपेक्षित राहिलेल्या महिला शास्त्रज्ञावर. "माझं काम हीच माझी ओळख आणि तेच माझं चरित्र," या लीझच्या वाक्यापासून सुरु होणारा या पुस्तकाचा प्रवास आपल्याला एका रोमांचकारी अनुभव देतो. या लेखक जोडीने लीझचं संपूर्ण आयुष्य मांडलेलं आहे, पण विशेष म्हणजे लीझनं भौतिकशास्त्रात केलेलं काम खूप सोप्या शब्दांत सांगितलं आहे.
कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्या वेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं असतं. लीझच्या आयुष्यावर परिणाम करणारी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावेळी उद्भवलेली दुर्दैवी परिस्थिती, हिटलरची मनमानी, तिनं स्वतः प्रोटेस्टंट धर्म स्वीकारलेला असूनही तिचे पूर्वज ज्यू असल्यामुळे तिला स्थलांतर करावं लागणं, तिचे आणि ऑटो हान या शास्त्रज्ञाचे अनेक चढउतार पाहिलेले निखळ मैत्रीपूर्ण संबंध, तिचे समकालीन शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड, जेम्स फ्रॅंक, मॅक्स प्लॅन्क यांच्यासारखे विज्ञान क्षेत्रातले सहकारी, यांची लीलया गुंफण यात केली आहे.
लीझ माइट्नर ही ऑस्ट्रियाची. तिची शिकायची इच्छा असूनही कायद्याच्या बंधनामुळे चौदाव्या वर्षी तिला शिक्षण सोडून घरी बसावं लागलं. वयाच्या तेविसाव्या वर्षी स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहायला लागल्यावर लीझनं विद्यापीठाची परीक्षा दिली आणि भौतिकशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यात तिनं मूलभूत संशोधन केलं. तिला जेव्हा संशोधनातल्या कामगिरीसाठी पदक मिळालं, तेव्हा ती केवळ एक स्त्री आहे म्हणून तिला प्रत्यक्ष पदक देण्याऐवजी पदकाची प्रतिकृती स्वीकारावी, असं सुचवलं गेलं. परंतु स्वाभिमानी लीझनं त्याला नकार दिला. तब्बल पंधरावेळा नामांकन मिळूनही केवळ स्त्री असल्याने तिला नोबेल पारितोषिक दिलं गेलं नाही.
अच्युत गोडबोलेंचं लिखाण त्यांच्या अनेकवर्षांच्या वाचनानं, त्यांचं विविध क्षेत्रातील तज्ञांसोबत केलेल्या कामातून आलेल्या अनुभवानं समृद्ध असतं. या पुस्तकात त्यांनी आणि दीपा देशमुखांनी खूप मेहनत घेत, चरित्र मांडताना अनेक पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना कमी वेळात भरपूर ज्ञान मिळवल्याचं समाधान मिळतं. लीझचं आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं होतं आणि तिला कायम ती करत असलेल्या कामाचं श्रेय न देण्याचं दुर्भाग्य वाट्याला आलं. तिच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग पुस्तकात जागोजागी आढळतात आणि त्यांची उत्तम मांडणी असल्यामुळे ते लक्षात राहतात. लीझ माइट्नर आपल्याला या पुस्तकातून एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणून भेटते.
विज्ञानासारख्या तांत्रिक विषयात योगदान दिलेल्या एखाद्या व्यक्तीचं चरित्र कदाचित एखाद्या पाठ्यपुस्तका सारखं झालं असतं, पण अणुरेणू, रेडिओऍक्टिव्हिटी, किरणोत्सर्ग आणि अणुगर्भविज्ञान यांसारख्या संकल्पनाही सोप्या भाषेत सांगून लीझचं काम किती अवघड आणि मोठं होतं, हे लेखक जोडीने या पुस्तकातून आपल्याला जाणवून दिलं आहे. हे पुस्तक विज्ञानात रस असणाऱ्यांना नक्कीच आवडेल; पण ज्यांना विज्ञानाची अगदीच बेसिक माहिती आहे, त्यांनाही हे पुस्तक विज्ञानावरील अशीच अनेक पुस्तकं हुडकून वाचायला लावेल, यात शंका नाही!