गदिमांच्या पंचवटीतून - शीतल श्रीधर माडगूळकर | Gadimanchya Panchvatitun - Sheetal Shridhar Madgulkar | Marathi Book Review


पुस्तक गदिमांच्या पंचवटीतून
लेखिका शीतल श्रीधर माडगूळकर
पृष्ठसंख्या ४१४
प्रकाशन डिंपल पब्लिकेशन
समीक्षण विनया बापट
मूल्यांकन ४.१ | ५




फार कमी लेखकांच्या वाट्याला येत असेल असे भाग्य गदिमांच्या वाट्याला आले. त्यांच्या मृत्यूला जवळजवळ अर्धशतक लोटले तरी मराठी सारस्वतावर आणि मराठी जनमानसावर उमटलेली त्यांची नाममुद्रा अजूनही तितकीच लखलखीत आहे. त्यांची गीते, त्यांचे गद्य साहित्य, त्यांचे चित्रपट यातील काहीही विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले नाही. त्यांच्या साहित्याप्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्वही इतके प्रभावी कि त्यांच्याबद्दल, त्यांच्या सहवासात आलेल्या अनेकांनी त्यांच्याबद्दल विपुल लेखन केले. तेही तितक्याच आवडीने वाचले गेले. गदिमा आणि त्यांचे पंचवटी हे घर किंवा माडगुळमधील 'बामणाचा पत्रा' याबद्दल जेवढे लिहिले गेले तेवढे क्वचितच एखाद्या लेखकाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा निवासस्थानाबद्दल लिहिले गेले असेल. 


गदिमांच्या ज्येष्ठ स्नुषा, श्रीधर यांच्या पत्नी, शीतल (माया) माडगूळकर यांनी नुकतेच लिहून प्रसिद्ध केलेले आत्मकथन - 'गदिमांच्या पंचवटीतून' - हाही गदिमायणातील एक नवा आध्याय आहे. लेखिका, अवघी साडेतीन वर्षे गदिमांच्या प्रत्यक्ष सहवासात राहू शकल्या आणि तरीही संपूर्ण आत्मकथनावर 'गदिमा' नावाचे गारुड पसरून राहिले आहे असे स्पष्टपणे दिसून येते. इतर सर्व नाती सांभाळूनही मायाताई स्वतःची ओळख कायम जपतात ती 'गदिमांच्या थोरल्या सुनबाई' म्हणूनच!


गदिमांचे घरातले 'पपा' हेच संबोधन मायाताई आपलेसे करतात. साहित्यिक म्हणून आपल्या सासऱ्यांचे मोठेपण त्यांनी जाणलेच आहे पण त्याचबरोबर माणूस म्हणून असलेले त्यांचे मोठेपणही त्या दाखवतात. गदिमांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा लेखिकेने जिवंत केल्या आहेत त्याचबरोबर आपल्या सासूबाई विद्याताईंचे गुण आणि मोठे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी यांचे अनेक दाखले त्या देतात.        


कालानुक्रमानुसार पहिले तर 'मुकी अंगडी बालपणाची', 'रंगीत वसने तारुण्याची' आणि 'लेणे वार्धक्याचे' या तीन स्वाभाविक टप्प्यांमधून जाणारे हे आत्मकथन आहे. कर्जत येथील आरेकरांच्या मोठ्या एकत्र कुटुंबात वाढलेल्या मायाताईंनी  आपले कर्तबगार वडील, आई, काका, काकू, आजी आणि भावंडे यांच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. विवाहानंतर त्या पतीबरोबर अवघ्या 'पंचवटी' शीच मनाने एकरूप झाल्या. या एकत्र कुटुंबातील गमतीदार प्रसंगाचेही चित्रण मायाताई अगदी रसभरीत करतात. पुरुषप्रधान मूल्ये रूढ असणाऱ्या कुटुंबात, नवऱ्यासकट अनेक इतर माणसांची तंत्रे सांभाळत केलेल्या सुरुवातीच्या काळातील या संसारात मजा, आनंद घेत असतानाच विविध ताणतणाव सोसण्याची कसरतही होतीच.  एक प्रकारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीचे प्रतिबिंब त्यांचा लेखनात आपल्याला दिसते. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही हे जिवंत साहित्यिक दाखले उपयोगी पडू शकतात.  


क्षण नावाच्या कवितेत त्यांची (अनेक गृहिणींना जाणवणारी) खंत या कवितेत व्यक्त झालेली आहे:


आयुष्याच्या या वळणावर 

मागे वळून पाहताना वाटतं 

कधीतरी एखादी दुपार 

एखादी संध्याकाळ 

निदान एखादा क्षण तरी

माझा म्हणून जगायला हवा होता मी!  

माझा म्हणून जगायला हवा होता मी!



मायाताईंच्या या प्रत्ययकारी आत्मकथेतून त्यांची जी प्रतिमा वाचकांसमोर येते ती आहे एका समर्पणशील, घरासाठी आणि कुटुंबीयांसाठी आपले जास्तीत जास्त योगदान देण्यास तत्पर असणाऱ्या कर्तव्यदक्ष पत्नीची आणि गृहिणीची. तिचे आत्मभान जागे असले तरी आपली 'आर्य पतिव्रता' हि प्रतिमा तिला जपायची आहे. नव्याची आस आहे पण श्रद्धा, परंपरा यांनाही ती मानते. काही वाचकांना त्यात थोडासा भाबडेपणा हि जाणवेल. पण जी मूल्य स्वीकारली आहेत ती मनापासून स्वीकारली आहेत. त्यात कोणतेही ढोंग किंवा खोटेपणा नाही.  


मायाताईंच्या लेखनशैलीबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते कि त्यांची शैली 'सहज सुंदर' म्हणावी अशी आहे. अलंकाराचा सोस नसलेले साधेपणातील सौंदर्य त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्या अगदी खुलवून, रंगवून सांगतात. त्यांचे लेखन विपुल तपशिलांनी युक्त आहे; पण गंमत म्हणजे हा दोष न ठरता लेखनाची रंगत वाढविणारा गुण ठरतो. आनंदी, गोड घटनांचे वर्णन करताना त्यांच्या लेखनालाही आनंदाचा बाहेर येतो. पण, कटू, दुःखद प्रसंगाचे वर्णन करताना त्यांची लेखणी विवेकाने आणि संयमाने चालते. लेखनातून कोणती मूल्ये आपण वाचकांपर्यंत पोहचविणार आहोत याचा विचार सतत जागृत ठेवणे - अशा अनेक गोष्टींचे भान ठेवत मायाताईंनी लेखन केल्याचे जाणवते. एखाद्या कादंबरीसारखे ते उत्कंटापूर्ण आणि सुरस झाले आहे, हे त्यांच्या लेखनशैलीचा मोठे यश आहे.  


मायाताई आपले प्रिय पती श्रीधर यांना उद्देशून लिहिलेल्या अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे गदिमांच्या पंचवटीतून अनुभवलेल्या 'गतस्मृतींचा बकुळी बहर' वाचकांनाही त्याच्या सौम्य सुगंधाने दीर्घकाळ आकर्षित करत राहील.   




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने