पुस्तक | फ्रॅन्केन्स्टाईन |
लेखक | नारायण धारप |
पृष्ठसंख्या | २०० |
प्रकाशन | साकेत प्रकाशन |
समीक्षण | आदित्य लोमटे |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
विक्टर फ्रॅन्केन्स्टाईन हा युरोपातील एक उत्साही युवक. विज्ञानाच्या मोहात त्याने गूढ प्रयोगांद्वारे एका निर्जीव शरीराला जीवन देण्याचे रहस्य शोधून काढले आहे. त्याचा विश्वास आहे की, त्याचा हा निसर्गावरील विजय विज्ञानाला नवीन दिशा देईल.
परंतु, "निसर्गाच्या पंचमहाभूतांनी काहीतरी खेळ करावा आणि एखादी विकृती अपघाताने जन्माला यावी; तिच्या हातून मला मृत्यू यावा!" असे म्हणणारा बॅरन फ्रॅन्केन्स्टाईन सूडाने पेटून उठतो, तेव्हा मनाला भयाची ओलसर थरथर जाणवते.
त्याचा प्रयोग यशस्वी होतो का? त्या प्रयोगातून काय निर्माण होते? बॅरन फ्रॅन्केन्स्टाईन कोण? या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. १९व्या शतकाच्या त्या काळातली विज्ञानविषयक मानवी वृत्ती, संशोधनाची ओढ, आणि तर्कशुद्ध विश्लेषण या कथानकाचे वैशिष्ट्य आहेत.
कथानकातील पात्रे आणि त्यातील उत्कंठा वाचकांना थरारक वातावरणात बुडवून ठेवतात. हेच पुस्तक वाचताना एक वेगळी मजा निर्माण करते. लेखक फ्रॅन्केन्स्टाईनच्या गूढ प्रयोगात नेमके काय साध्य होते, हे उत्सुकतेने कायम ठेवतात, आणि वाचक त्या कथेत गुंतून जातो.
धारपांच्या लेखणीची धार या पुस्तकात अनुभवता येते. स्थल-काल वर्णनांनी वाचकांचे काळीज गोठवून ठेवण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते. एकूणच भयकथा/गूढकथा या श्रेणीत मोडणाऱ्या धारपांच्या शैलीतले, भरदिवसा वाचकांच्या मेंदूला भयाचा झटका देणारे हे पुस्तक एक गूढ मेजवानी ठरते.