एलोन मस्क: टेस्ला, स्पेसएक्स अँड क्वेस्ट फॉर अ फँटॅस्टिक फ्युचर - ऍशली व्हॅन्स | Elon Musk: Tesla, SpaceX & Quest For A Fantastic Future - Ashlee Vance | Book Review in Marathi



पुस्तक एलोन मस्क: टेस्ला, स्पेसएक्स अँड क्वेस्ट फॉर अ फँटॅस्टिक फ्युचर
लेखक ऍशली व्हॅन्स
पृष्ठसंख्या ४१६
प्रकाशन व्हर्जिन बुक्स
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.५ | ५



पृथ्वीवरील सर्वात व्यस्त कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी एक, एलोन मस्क, एकाच वेळी अनेक कंपन्यांचे व्यवस्थापन सांभाळत आहे. या कंपन्या साधारण नसून मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे व्यवस्थापन करताना येणाऱ्या अडचणी कोणीच यापूर्वी सोडवल्या नसाव्यात असे म्हणता येईल. कदाचित त्यामुळेच एलोन मस्क या व्यक्तिमत्त्वाभोवती एक वलय निर्माण झाले आहे. एलोन मस्कला 'रिअल लाईफ आयरन मॅन' म्हटले जाते. त्याच्या एका ट्विटमुळे जगभरात (विशेषतः क्रिप्टो बाजारात) कोट्यवधींची हालचाल होऊ शकते. इलेक्ट्रिक कार संकल्पना पुन्हा लोकप्रिय करणारा आणि मानवाला अंतरग्रहीय प्रजात बनविण्याचे स्वप्न पाहणारा हा अब्जाधीश अनेक अर्थांनी वेगळा आहे.

एलोन मस्क यांचे चरित्र लिहिणे म्हणजे महाकठीण काम; पण हे शिवधनुष्य ऍशली व्हॅन्स यांनी समर्थपणे पेलले आहे. सुरुवातीला ऍशली व्हॅन्स यांनी जेव्हा एलोन मस्कला चरित्र लिहिण्याबद्दल विचारले तेव्हा त्याने हा प्रस्ताव सपशेल नाकारला. पण ऍशली व्हॅन्स यांनी ठरवले की तो एलोनचे चरित्र लिहिणारच, मग त्याला त्याची परवानगी असो अथवा नसो. एलोनला जिद्दी लोक आवडतात, ऍशली व्हॅन्स यांची जिद्द पाहून त्याने चरित्र लिहिण्यासाठी परवानगी दिली आणि आवश्यक मुलाखतींची सोय देखील केली.

एलोनचे बालपण, अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, त्याने सुरू केलेल्या सर्व कंपन्यांबद्दल, त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, संसारिक जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वप्नांबद्दल तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. आज एलोन मस्क जगातील अतिश्रीमंत लोकांच्या यादीत अग्रक्रमावर आहे, पण एका दशकापूर्वी स्थिती काही वेगळी होती. टेस्ला कंपनीला टाळे लागण्यास फक्त काही आठवडे बाकी होते; त्या परिस्थितीतून टेस्लाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे काम एलोनने केले. अंतरग्रहीय जमात बनविण्याचे स्वप्न त्याच्या बालपणातच रुजले होते. एलोनला वाचनाची प्रचंड आवड होती; त्याने स्पेसएक्ससाठी रॉकेट विज्ञानाचे ज्ञान पुस्तके वाचून मिळवले. त्याने केलेल्या चुका आणि त्यावर त्याने कशी मात केली याबद्दल तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल.

पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे एलोनसाठी "अशक्य" हा शब्द अस्तित्वातच नाही. जर एखादा कामगार त्याच्याकडे "हे साध्य करणे शक्य नाही." असे बोलला तर त्याला कामावरून कायमची सुट्टी मिळण्याची शक्यता असते. स्पेसएक्स प्रकरण वाचताना तुमच्या वैचारिक कक्षा रुंदावतील यात शंका नाही. हे प्रकरण इतके प्रभावी आहे की तुम्हीही "अशक्य" हा शब्द विसरून जाल. कारण एलोन मस्क आणि स्पेसएक्सच्या कामगारांनी अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी जी धडपड आणि मेहनत घेतली आहे, ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. एलोन आजही आठवड्यात ८० ते १०० तास काम करतो आणि तो त्याच्या कामगारांकडूनही तीच अपेक्षा ठेवतो.

एलोनला जगभरात मानवजातीचा हिरो म्हणून ओळख मिळाली असली तरीही त्याच्या स्वभावातील काही गोष्टी सर्वसामान्यांना खटकतील अशा आहेत. लेखकाने या गोष्टींबद्दल उघडपणे लिहिले आहे. लोकांना कामावरून काढण्याबद्दल आणि ८०-१०० तासांच्या अवाजवी अपेक्षांबद्दल देखील लेखकाने लक्ष वेधले आहे. एलोनच्या आयुष्यातील काही निवडक रंगीत छायाचित्रे देखील या पुस्तकात देण्यात आली आहेत. एकूणच हे चरित्र तुम्हाला पहिल्या शब्दापासून खिळवून ठेवते. अशक्यप्राय गोष्टी शक्य आहेत हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी एकदा नक्कीच वाचावे.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने