पुस्तक | चिअर्स |
लेखक | वसंत पुरुषोत्तम काळे |
पृष्ठसंख्या | १५० |
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस |
समीक्षण | आकाश राहुल कोठाडिया |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
या पुस्तकात व. पु. काळे आपल्याला त्यांच्या आवडत्या १६ व्यक्तींबरोबर ओळख करून देतात. जसजसे आपण पुस्तक वाचत जातो, तसतसे आपली त्या व्यक्तींशी ओळख गहिरी होते, आणि त्या व्यक्ती आपल्यालाही आवडायला लागतात. याचे सर्व श्रेय व. पु. यांच्या लेखनशैलीला जाते. व. पु. नेहमी साध्या व सोप्या भाषेत लिहितात, म्हणून त्यांच्या लेखनातील पात्रे व व्यक्ती आपल्याला जवळच्या वाटतात आणि आपल्याला भावतात. हीच त्यांच्या लिखाणाची खासियत आहे.
या पुस्तकासाठी व. पु. यांनी त्यांच्या आवडत्या १६ व्यक्तींची निवड विचारपूर्वक केली आहे, असे जाणवते. या व्यक्तींमध्ये आपल्याला कवी, बालकलाकार, फोटोग्राफर, लेखक, डॉक्टर, जादूगार अशा विविध क्षेत्रांतील आणि स्वभावांच्या व्यक्ती भेटतात. या व्यक्तींबरोबर व. पु. यांची झालेली पहिली भेट, त्यांचे अविस्मरणीय किस्से, रंगतदार गप्पा, तसेच त्यांच्याकडून मिळालेली अनमोल शिकवण आणि विचार, याबद्दल व. पु. यांनी लिहिले आहे.
सर्व व्यक्तींपैकी अण्णा, भाऊसाहेब, भावेअण्णा, डॉ. श्रीकांत आणि टी.टी. यांच्याबद्दल वाचताना, काही काळ आपल्यालाही वाटते – "ही मंडळी आपल्याला भेटली असती तर किती छान झाले असते!" आणि मग त्या व्यक्तींना भेटता न आल्याचे दुःख मनाला चटका लावून जाते. याव्यतिरिक्त व. पु. यांनी पुस्तकात एक सरप्राईज देखील ठेवले आहे – ते म्हणजे या १६ व्यक्तींमध्ये सौ. काळे यांचा समावेश.
चिअर्स या पुस्तकाबद्दल उल्हासच्या (पुस्तकातील एक पात्र) भाषेत सांगायचे झाल्यास,
"वाचनालयात व. पु. यांचे चिअर्स सापडले की पहिला पेग घेतल्यासारखे वाटते. व. पु. च्या मागील पुस्तकाच्या आठवणी, त्यातील कथा व पात्रांची उजळणी ही अवस्था दुसऱ्या पेगसारखी असते. मग आपण पुस्तक हातात घेतो, पहिले पान उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो. तेव्हा इतकी एक्साइटमेंट येते की तिसरा पेग कधी हातात आला, हेही कळत नाही. आपण व. पु. यांना प्रत्येक पानावर भेटत राहतो. एकदा वाचन सुरू झाले की पेग मोजायचे नसतात. आणि शेवटचे पान वाचून झाल्यानंतर पुढचे पुस्तक हातात घेईपर्यंत मागे उरतो तो 'हँगओव्हर!"
आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक अज्ञात लोकांना भेटतो. त्यापैकी काही लोक विसरले जातात, तर काही कायम लक्षात राहतात. व. पु. यांनी या पुस्तकात अशाच लक्षात राहणाऱ्या लोकांबद्दल लिहिले आहे. वरती म्हटल्याप्रमाणे, जसजसे आपण या व्यक्तींना ओळखत जातो, तसतसे त्या आपल्याला आवडू लागतात. प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते – मग तो त्यांचा साधेपणा असो, किंवा समाजासाठी खूप काही नाही तरी थोडेफार करण्याची इच्छा असो. याशिवायही प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात.
हे पुस्तक वाचताना व. पु. आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात. तसेच माणसांवर प्रेम करायला आणि माणसांचे वेड लावायला प्रेरित करतात. त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे जाणवते – जसा मला जाणवला.