पुस्तक | ब्लॉगच्या आरशापल्याड |
लेखिका | मनस्विनी लता रवींद्र |
पृष्ठसंख्या | १३६ |
प्रकाशन | शब्द पब्लिकेशन |
समीक्षण | गुंजन थोरावत |
मूल्यांकन | ४.३ | ५ |
खरं पाहिलं तर लेखक किंवा लेखिकेची आणि आपली ओळख ही त्यांच्या लेखणीतून होते. मात्र, मनस्विनीची ओळख मला तिच्या विचारांतून झाली, आणि मी अक्षरशः तिच्या प्रेमात पडले. गैरसमज नको; तिचं लिखाण उल्लेखनीय आहे, त्याविषयी नंतर लिहीनच. पण त्याआधी तिच्यातल्या माणसाबद्दल थोडंसं...
काळानुसार होणारे बदल स्वीकारून बरेच लोक स्वतःला नव्या विचारसरणीचे मानतात. पण खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावं अशी माणसं कमीच दिसतात. माझ्या आयुष्यात तर अशी माणसं नाहीच म्हणावं लागेल. मनस्विनीशी प्रत्यक्ष कधी भेट झाली नाही. पण तिच्या लिखाणातून, मग ते लेख, सिनेमे, मालिका, नाटकं, पुस्तकं वा दोन ओळींचे संवाद असोत, तिच्या विचारसरणीतला तो पुरोगामी माणूस स्वतःचं अस्तित्व ठामपणे मांडतोच!आणि याच गोष्टीमुळे मी या पुस्तकाकडे आकृष्ट झाले.
हा कथासंग्रह तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातून टिपलेले असामान्य क्षण आहेत.
या कथासंग्रहातील प्रत्येक गोष्ट घटनेच्या एकतर्फी मांडणीने सुरुवात करते, आणि हळूहळू लेखिका त्या घटनेशी जोडले गेलेले सर्व पैलू उलगडते. पण असं करताना कोणताही विचार वाचकावर लादला जात नाही. उलट तुमच्या मताला आकार घेण्यासाठी लेखिका पुरेशी जागा ठेवते.
वेगवेगळी पात्रं, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची प्रतिक्रिया, आणि त्यांचे स्वतःशी असलेले संवाद खूप सहज आणि सोप्या भाषेत मांडले आहेत. लेखिकेची हीच खासियत आहे असं मला वाटतं, कारण मोठमोठाले शब्द वापरून अर्थाचा बळी घेण्याचं पाप ती करत नाही. तिची कलेवरची मजबूत पकड तिच्या शब्दनिवडीतून आणि वाक्यरचनेतून दिसते.
या कथासंग्रहासाठी मनस्विनीला ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ही मिळाला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी,’ ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट,’ ‘चहा आणि बनमस्का’ अशा मालिका, ‘ती सध्या काय करते,’ ‘रमा माधव’ सारखे सिनेमे, ‘अमर फोटो स्टुडिओ,’ ‘सिगारेटस अलविदा’ ही नाटकं आणि अजून बऱ्याच कथा-पटकथांना तिने आकार दिला आहे.
आजचं मराठी साहित्य वाचायचं असेल आणि आपल्या समाजमान्य पूर्वग्रहांना तपासून पाहायचं असेल, तर नक्की वाचा 'ब्लॉगच्या आरशापल्याड.’