द काईट रनर - ख़ालेद हुसैनी | The Kite Runner - Khaled Hosseini | Book Review in Marathi


पुस्तक द काईट रनर
लेखक ख़ालेद हुसैनी
पृष्ठसंख्या ३७२
प्रकाशन ब्लूम्सबरी
समीक्षण गुंजन थोरावत
मूल्यांकन  | ५



काही कथा आपल्या आयुष्याचा भाग बनतात, आपल्या मनात खोलवर त्या रुजतात. 'द काईट रनर' ही त्यापैकीच एक कथा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रेम, असूया, आणि पश्चात्तापाची ही कथा पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचकाला बांधून ठेवते.

ही कहाणी आहे आमिर आणि हसनची. दोघेही जिवलग मित्र, मित्र कसले, भाऊच म्हणा ना! काबूलमध्ये राहणाऱ्या इतर मुलांप्रमाणेच या दोघांनाही यावर्षी पतंगोत्सवात जिंकायचं आहे. मात्र, या पतंगोत्सवातूनच कथा एक अनपेक्षित आणि नाट्यमय वळण घेते. नातेसंबंधांतील गुंतागुंत, प्रेमासाठीची धडपड, आणि स्वतःशी चाललेली लढाई, सगळंच उघडं पडतं. अफगाणिस्तानमधील जातीयवाद आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितींचा कॅनवास लेखकाने हाती घेतला आहे आणि त्यावर आमिर व हसन यांच्या आयुष्याची गुंफण अतिशय प्रभावीपणे चितारली आहे.

आमिर आणि त्याच्या वडिलांचे नाते थोडं अस्थिर आहे. वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी आणि त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी आमिर सतत प्रयत्न करताना दिसतो. परंतु, त्याच्यावरील या दबावात, त्याच्यावर मनापासून प्रेम करणारा त्याचा जिवलग मित्र हसन विनाकारण बळी पडतो. याच दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे आमिर आणि त्याचे वडील अमेरिकेला निघून जातात. तिथे त्यांचं आयुष्य स्थिरस्थावर होतं, पण हसनवर झालेल्या अन्यायाची खंत आमिरच्या मनाला आतून पोखरत राहते. पश्चात्तापाच्या शोधात तो परत अफगाणिस्तानला येतो आणि त्याला सामोरं जाण्यासाठी उभं ठाकलेलं सत्य त्याला हादरवून टाकतं.

लेखकाने कथेची बांधणी आणि उकल इतकी सुंदर केली आहे की पुस्तकापासून एक क्षणसुद्धा दूर राहवत नाही. राजकारण असो, धर्मकारण असो, किंवा वैयक्तिक स्वार्थ असो, ख़ालेद हुसैनी यांनी सगळ्या गोष्टी कथेत इतक्या सहजपणे गुंफल्या आहेत की कथा आपलीच वाटू लागते. आमिरच्या दृष्टिकोनातून ही कथा अनुभवताना आपण कधी आमिरसारखे होऊन जातो, हे कळतच नाही. हीच लेखकाची जादू आहे. त्याने साकारलेली पात्रं इतकी प्रभावी आहेत की पुस्तकाचा उल्लेख जरी झाला, तरी डोळ्यासमोर निरागस हसन तो पतंग घेऊन उभा राहतो आणि म्हणतो, "फॉर यू, अ थाऊजंड टाइम्स ओव्हर."

लेखक म्हणतो, सगळ्यात मोठं पाप आहे 'चोरी करणं'. मला विचाराल, तर तुमच्यात आणि माझ्यातही एक चोर लपलेला आहे. तुम्ही कधी त्याला भेटला आहात? जर भेटायचं असेल, तर नक्की वाचा 'द काईट रनर'!





संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने