बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर | Bangarwadi - Vyanktesh Madgoolkar | Marathi Book Review



पुस्तक बनगरवाडी
लेखक व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठसंख्या १३०
प्रकाशन मौज प्रकाशन
समीक्षण समीर निचीते
मूल्यांकन ४.६ | ५



सहजता म्हणजे काय, हे बनगरवाडी कादंबरी वाचल्यानंतर समजते. व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या मोठ्या भावाकडून (म्हणजेच गदिमा यांच्याकडून) लेंगरवाडी या धनगर वस्तीबद्दल ऐकले आणि त्यांनी त्यातील काही प्रसंग घेऊन ही सुंदर कादंबरी लिहिली. त्यांनी हे एका सोलापूरच्या कार्यक्रमात भाषण करताना सांगितले होते.

ही कथा साधारण १९३८ च्या काळातील आहे. कथा एका शिक्षकावर आणि गावकऱ्यांवर आधारित आहे. बनगरवाडी या गावात, एक शिक्षक जवळच्या गावातून आलेला असतो. नुकताच सातवी पास झालेला हा तरुण गावात येतो आणि गावकऱ्यांशी ओळख करून घेतो. तो त्यांना शाळा सुरू करण्याचे महत्त्व समजावून सांगतो आणि एका खोलीत शाळा सुरू होते. वाडीतील बरेच लोक मास्तरला मानत असतात, कारण तो सर्वांना मदत करणारा असतो.

गाव धनगरांचे होते. गावातील बरेच लोक मेंढीपालन करणारे होते आणि त्यांचा रोजगार यावरच अवलंबून असे. सर्वांची दिनचर्या सारखीच होती – सकाळी सूर्य उगवल्यावर उठणे, मेंढ्यांना घेऊन रानात जाणे, आणि संध्याकाळी परत येणे. जेवण झाल्यावर गावातील लोक पारावर रोज बैठक भरवत, तंबाखू व सुपारीचा खांड खात गप्पा मारत, आणि त्यात वेळ कसा निघून जात ते कळतही नसे. पावसाळ्यात बरेच लोक शेती करत आणि वर्षभर पुरेल इतके धान्य पिकवत.

मास्तर यांच्या मनात गावात एक तालीम सुरू करावी, असे येते आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात. कथेचा हा भाग लेखकाने अत्यंत सुरेख रंगवला आहे. त्यात गावकऱ्यांच्या विविध भावनांचे दर्शन घडते. त्यानंतर घडणारी घटना विलक्षण आहे.

गावात दुष्काळ पडतो, आणि पाहता पाहता पूर्ण गाव विस्कटून जाते. उरतात फक्त उजाड आणि ओसाड पडलेली घरं.

माडगूळकर यांचे खरे कौशल्य म्हणजे ग्रामीण व्यक्तिरेखा ठळक आणि जिवंतपणे उभ्या करणे. त्यामुळे कथा अगदी जिवंत वाटते. बनगरवाडीत त्यांनी चितारलेली कारभारी, आनंदया, आयबू अशी अनेक पात्रे खऱ्या आयुष्याशी जोडलेली वाटतात. त्यांच्यातील निरागसता प्रेक्षकाला स्पष्टपणे जाणवते, आणि हेच बनगरवाडी ला विशेष बनवते.

पुस्तकात अनेक रेखाचित्रे आहेत, जी कादंबरीला अधिकच प्रभावी बनवतात. एकाच बैठकीत वाचून संपवता येईल अशी ही कादंबरी प्रत्येक वाचकाने नक्कीच वाचली पाहिजे.



संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने