अमीबा - श्रीकांत सिंधू मधुकर | Amiba - Shrikant Sindhu Madhukar | Marathi Poetry Book Review



कवितासंग्रह अमीबा
कवी श्रीकांत सिंधू मधुकर
पृष्ठसंख्या १२०
प्रकाशन अंतर्नाद प्रकाशन
समीक्षण अमुल्या गवारे
मूल्यांकन  | ५




करूनि अंत माणुसकीचा
खेळूयात रक्ताची होळी
मी सरस की तू, ठरवूयात हे
चालव तू माझ्यावर गोळी!
आणि पडू दे सदा निष्पाप नात्यांचा
होऊ दे राखरांगोळी भावनांची
चेहऱ्यामागे लपवू चेहरे आपण
दुनिया राहिलीच कुठे अता माणसांची

 

'अमीबा' हा कवी श्रीकांत यांचा पहिला कवितासंग्रह. दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी रायगडावर या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. कवितासंग्रहाच्या शीर्षकाबद्दल सविस्तर सांगताना तो म्हणतो, "माणसाचे आयुष्य हे एक पेशीय स्वच्छंदी असावे, हवा तसा आकार घेऊन साऱ्यांच्या नजरेत योग्य भासणाऱ्या अमिबासारखे. 'अमिबा' मागे अजून एका अर्थाने दडली आहे त्यातील शब्दांची किमया." ज्याच्या नावात 'अ' आईचा, 'मी' माझा व 'बा' बाबांचा आहे, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे." यामुळेच या संग्रहाचे नाव 'अमिबा' ठेवण्यात आले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून देखील हाच अर्थ आपल्याला जाणवतो.

या काव्यसंग्रहात एकूण ६९ कविता आहेत. काही कविता मुक्तछंदात, तर काही छंदात आहेत. समाजातील विविध विषयांवर प्रकाशझोत टाकताना, काही कविता निसर्गावर, प्रेमावर, विरहावर, स्वाभिमानावर देखील आहेत. इतिहासावर आणि कवींच्या जीवनावर देखील काही कविता आढळतात. कवितेची भाषा सोपी असून कोणालाही समजेल, पण तितकीच मनाला भावेल अशी आहे. प्रत्येक कवितेच्या शीर्षकातूनच अर्थबोध होतो आणि त्यातीलच काही "किन्नर, रायबा, कवी, पाऊस कारण, समुद्र, सूर्यपुत्र" या कविता मनाला विशेष भावतात.

अर्थपूर्ण, सोप्या शब्दातील, मुक्तछंदातील कविता आवडणाऱ्या सर्व कविता प्रेमींसाठी हे उत्तम पुस्तक आहे. काही कविता फार जवळच्या वाटतील, काही मंत्रमुग्ध करतील, आणि विशेषतः तरुण पिढीला या कविता नक्कीच आवडतील याची खात्री आहे. तसेच इंस्टाग्रामवर 'एक होता कवी' या अकाऊंटवरून तो रोज अनेक कविता लोकांपर्यंत पोहचवत असतो.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने