पुस्तक | झिरो टु वन |
लेखक | पीटर थील, ब्लेक मास्टर्स |
पृष्ठसंख्या | १९५ |
प्रकाशन | रँडम हाऊस |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
"द्विमान पद्धतीमध्ये झिरो म्हणजे बंद आणि वन म्हणजे चालू" या एका तत्त्वावर आज संपूर्ण संगणक क्षेत्र कार्यरत आहे. लेखक पीटर थील हे याच क्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. ते फेसबुक आणि पेपाल सारख्या दिग्गज कंपन्यांशी जोडलेले आहेत. पुस्तकाचं शीर्षक स्टार्टअप्ससाठी अगदी सूचक आहे, कारण पहिल्या तीन वर्षांतच ९०-९५ टक्के स्टार्टअप्स बंद पडतात.
एक स्टार्टअप यशस्वी करण्याची गुरुकिल्ली या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक उद्योगासाठी तो एक क्षण महत्त्वाचा असतो, जिथे त्यांना समजतं की आपण नक्की काय करायला हवं. नवीन पिढीतील बिल गेट्स नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बनवणार नाहीत, नवीन मार्क झुकेरबर्ग नवीन फेसबुक बनवणार नाहीत, नवीन लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन नवीन सर्च इंजिन बनवणार नाहीत. नवीन पिढीला नवीन समस्या सोडवणं गरजेचं आहे, तोच एक यशाचा खात्रीलायक मार्ग आहे.
जुनाट कल्पना घेऊन त्यांना नवीन रंगसंगती देऊन तेच-तेच विकसित करण्यापेक्षा असं काहीतरी विकसित करा, जे पूर्णतः नवीन आहे आणि ज्यात जग बदलण्याची ताकद आहे, असं परखड मत लेखक या पुस्तकातून सांगू पाहतात.
पुस्तकात स्टार्टअप क्षेत्राचा इतिहास थोडक्यात दिला आहे आणि संगणक क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण घटना, जसं की डॉट कॉम बस्ट आणि इतर काही घटना याबद्दल विश्लेषण केलं आहे. पुस्तक तुम्हाला उद्यमशील होण्यासाठी, नवा विचार करायला प्रोत्साहित करेल, तसेच ते तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.
लेखक पीटर थील यांना स्टार्टअप क्षेत्राचा विस्तृत अनुभव आहे. ते जगभरातील सर्वोत्तम स्टार्टअप्सपैकी एकाला "थील फेलोशिप" सुद्धा देतात. एकूणच संगणक क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. तुम्ही उद्योगविश्वात काही मोठं काम करू इच्छित असाल किंवा तुमच्या विचारांना दिशा देऊ पाहत असाल, तर हे पुस्तक नक्कीच वाचा.