पुस्तक | तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे? |
लेखक | रॉबिन शर्मा |
पृष्ठसंख्या | २२५ |
प्रकाशन | जयको |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.२ | ५ |
"तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?" हे शीर्षक थोडं नकारात्मकतेकडे झुकलेलं वाटू शकतं, पण ते वाचून गोंधळून जाणं स्वाभाविक आहे. मात्र, हे पुस्तक प्रत्येक शब्दागणिक सकारात्मकता आणि प्रत्येक वाक्यागणिक रचनात्मक सौंदर्याचा अनुभव देतं. जगप्रसिद्ध लेखक आणि बिझनेस कोच रॉबिन शर्मा लिखित "हू विल क्राय व्हेन यू डाय?" या पुस्तकाचा मराठी अनुवाददेखील तितकाच वाचनीय आहे.
या पुस्तकातील १०१ प्रकरणं म्हणजे जीवन योग्य आणि आनंदाने कसं जगावं, याचे धडे. प्रत्येक प्रकरण जवळपास १-२ पानांत संपतं, त्यामुळे पुस्तक वाचताना उत्सुकता वाढत जाते. पुस्तकात अलंकारिक भाषेचा वापर आहे, लहान लहान गोष्टी आणि अनुभव आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मकता आहे.
पुस्तक वाचताना लेखक रॉबिन शर्मा यांच्या विनम्रतेचा अनुभव येतो. पुस्तकाची भाषा आपल्याला खिळवून ठेवते आणि नकळतपणे मानवतेचं शिक्षण देते. एखाद्या व्यक्तीला भेट देण्यासाठी हे पुस्तक एकदम योग्य आहे. त्याशिवाय पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक नक्की वाचायला द्यावं, कारण या पुस्तकामुळे त्यांना वैश्विक मूल्यं आणि मानवतेची जाणीव होईल.