The Elon Musk Methods | एलॉन मस्क | Randy Kirk | रँडी कर्क


लेखक रँडी कर्क
अनुवाद सुनीति काणे
पृष्ठसंख्या २१६
प्रकाशन साकेत प्रकाशन
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन  | ५


काही लेखक उत्कृष्ट लेखनासाठी ओळखले जातात, तर काही लेखक सर्वाधिक पुस्तक विक्रीसाठी (बेस्ट सेलर्स). साहजिकच, जास्त पुस्तक विक्री म्हणजे जास्त नफा, आणि त्यात काहीच वावगं नाही. पण विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नैतिकता पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकांची दिशाभूल न करणे ही एक नैतिकता आहे. इंटरनेटवर ब्लॉग यशस्वी करण्याचा हमखास मार्ग म्हणजे आधीच प्रकाशझोतात असलेल्या व्यक्ती, संस्था, उत्पादनं किंवा सेवांबद्दल लिहिणं किंवा त्यांचं समीक्षण करणं.

२०२१ च्या सुरुवातीलाच एलॉन मस्कचं नाव जगभर चर्चेचा विषय बनलं. कारणही तसंच होतं—एलॉन मस्कने धनाढ्य जेफ बेजोस (अमॅझॉनचे संस्थापक) यांना मागे टाकत जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा किताब पटकावला. तसं बघायला गेलं तर, एलॉन या ना त्या कारणाने सतत प्रकाशझोतात असायचाच. टेस्ला, स्पेसएक्स, सोलारसिटी अशा विविध कंपन्यांचा मालक आणि त्याची अद्भुत अशी भव्यदिव्य स्वप्नं वाचून, एलॉन बद्दल आणखी जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. त्यातच हे पुस्तक हाती आलं. बहुधा एलॉन मस्कवर आधारित हे मराठीतील पहिलं पुस्तक असावं.

"द एलॉन मस्क मेथड्स" या मूळ पुस्तकाचा अनुवाद म्हणजे "एलॉन मस्क" हे पुस्तक. गंमत म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कुठेच मूळ पुस्तकाचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. आणि मूळ पुस्तकाच्या नावातील "मेथड्स" हा शब्द मराठी आवृत्तीतून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ होणार हे नक्की.

"एलॉन मस्क" हे पुस्तक एलॉनचं ना चरित्र आहे, ना आत्मचरित्र. पुस्तकाच्या सुरुवातीला एलॉन मस्कबद्दल संक्षिप्त स्वरूपात लिहिलं आहे आणि पुढे त्याचे काही कृष्ण-धवल फोटो सुद्धा दिले आहेत. लेखकाने एलॉन मस्कला केंद्रबिंदू मानून, व्यवसाय कसा करावा, कसा वाढवावा यांसारख्या विषयांवर १६ कार्यपद्धती दिल्या आहेत. या कार्यपद्धतींमध्ये एलॉनच्या काही वाक्यांचा (लेखकाने न घेतलेल्या मुलाखतीतील, कारण लेखक आणि एलॉनची भेट अजूनतरी झालेली नाही) आणि त्याने केलेल्या काही कृतींचा समावेश आहे.

या कार्यपद्धती नक्कीच उत्तम आहेत. लेखक स्वतः उद्योजक असल्याने त्यांचा अनुभवदेखील या कार्यपद्धतीत अधूनमधून डोकावतो. मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. एकूणच, जर तुम्हाला व्यवसायाबद्दल वाचायचं असेल किंवा ज्ञान वाढवायचं असेल, तरच या पुस्तकाबद्दल विचार करा. एलॉन मस्कबद्दल वाचायचं असेल, तर मात्र नक्कीच नाही.




संबंधित व्हिडिओ


Post a Comment

Previous Post Next Post