द दा विंची कोड - डॅन ब्राऊन | The Da Vinci Code - Dan Brown | Marathi Book Review


पुस्तक द दा विंची कोड
लेखक डॅन ब्राऊन
अनुवाद अजित ठाकूर
पृष्ठसंख्या ४५२
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाउस
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.५ | ५



एका जगप्रसिद्ध संग्रहालयात झालेला एक खून आणि त्या खुनाचा छडा लावता लावता कथेचा नायक जगाच्या प्राचीन इतिहासापर्यंत पोचतो. तो रहस्याचं उकल करण्यात यशस्वी होतो का? नक्की रहस्य काय आहे? दा विंची आणि या खुनाचा काय संबंध? मोनालिसाचं जगप्रसिद्ध चित्र काय सांगू पाहतंय? हे जाणून घेण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं म्हणून, द दा विंची कोड हे पुस्तक मराठी वाचकांनी वाचलंच पाहिजे.

डॅन ब्राऊन लिखित द दा विंची कोड हे एक रहस्यमयी थरारप्रकारातील पुस्तक २००३ साली प्रकाशित झालं. अमेरिकेत या पुस्तकाचा विक्रमी खप झाला आहे आणि पुस्तकावर आधारित चित्रपट पण येऊन गेला. कथेचा नायक रॉबर्ट लँग्डनवर एकूण ३ पुस्तकं लेखकाने लिहलीत आणि त्यातील दोन पुस्तकांवर चित्रपट आले, व रॉबर्ट लँग्डन या व्यक्तीरेखांचा समावेश असलेला एक हॉलिवूड चित्रपटदेखील येऊन गेला. यावरून आपल्याला रॉबर्ट लँग्डन हे पात्र लेखकाने किती ताकतीने उभं केलं असेल याची कल्पना येते.

रॉबर्ट लँग्डन हा एक चिन्हशास्त्रज्ञ आहे. संग्रहालयात झालेल्या खुनाच्या तपासासाठी त्याला पाचारण करण्यात आलं. कथेत पुढे सोफी हे पात्र येतं, जी पोलीस खात्यात चिन्हतज्ञ आहे. तपास पुढे सरकताना जगातील सर्वात मोठं रहस्य उकल होण्याच्या मार्गावर असतं. ख्रिश्चन धर्मासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या रहस्याबद्दल दा विंचीने त्याच्या चित्रांतून काही संकेत दिले आहेत का यावर रॉबर्ट भाष्य करतो. येशू, होली ग्रेल, किस्टोन, मेरी मॅग्दालिन आणि बरेच संदर्भ आणि दुवे या पुस्तकात वापरले आहेत.

मी वाचलेल्या रहस्यकथांपैकी सर्वोत्कृष्ट, मनाची पकड घेणारी ही कथा आहे. अर्थात, पुस्तक वाचताना मला ख्रिश्चन धर्माबद्दल जास्त माहिती नव्हती, पण त्याचा कुठेही अडसर आला नाही. कथा तुम्हाला अगदी गुंतवून टाकते. जर तुम्हाला रहस्यकथा आणि मानवी इतिहास आवडत असेल, तर यापेक्षा उत्तम पुस्तक शोधून सापडणार नाही.




संबंधित व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने