पुस्तक | स्टार्टअप सीक्रेट्स फ्रॉम रामायण |
लेखक | प्राची गर्ग |
पृष्ठसंख्या | १३२ |
प्रकाशन | सृष्टी प्रकाशन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ३.४ | ५ |
असं म्हणतात की एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा तिथं पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा असतो.
लेखिका प्राची गर्ग या घुमोफिरो.कॉम या एका यशस्वी स्टार्टअपच्या संस्थापिका आहेत. याच स्टार्टअपच्या प्रवासात लेखिकेला स्टार्टअप क्षेत्रातील खाचखळगे माहित झाले आहेत. यशस्वी स्टार्टअपचा भक्कम अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी उद्योजकतेवर सुपरवूमन आणि आणखी तीन पुस्तके लिहिली आहेत.
रामायणातून स्टार्टअपचे धडे असं लक्षवेधी नाव कोणत्याही भारतीयाचं लक्ष खेचून घेईल. त्याशिवाय पुस्तकाचं मुखपृष्ठही उत्तम आहे. ही कथा राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्या भोवती फिरते. कथेत रामायणातील पात्रांची आणि प्रसंगांची रेलचेल आहे. रामायणाच्या मूळ कथेला इथे मॉडर्न फोडणी देऊन त्यात लेखिकेचे स्वतःचे उद्योजकतेचे अनुभव आणि व्यवसायासंबंधी टिप्स जोडून या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रभू रामचंद्रांना सोसावा लागलेला वनवास आणि पुस्तकातील प्रकरणांची संख्या ही १४ आहे. असे एक ना अनेक संदर्भ आपल्याला रामायणाशी जोडू पाहतात.
लेखिका प्राची गर्ग यांच्या स्टार्टअप आणि रामायण यांची सांगड घालण्याच्या कल्पकतेबद्दल नक्कीच कौतुक करायला हवं. मुळात जे स्टार्टअप सीक्रेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचायला घ्याल त्याबद्दल फार कमी लिहिलं आहे. पण व्यवसायासंबंधी जे सल्ले प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिले आहेत, ते नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत. जे व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसाय वाढवण्याच्या आणि सुरक्षित करण्याच्या टिप्स मिळतील.
विशेषतः जे व्यवसाय करू इच्छितात, त्यांना हे पुस्तक वाचून व्यवसायाची व्याप्ती किती मोठी असते याचा अंदाज येईल. त्यामुळे हे पुस्तक, जे स्टार्टअप क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत, त्यांना भेट म्हणून देण्यास योग्य आहे.
एकूण कथानक रटाळ असलं तरी लेखिकेचे अनुभव वाचकांसाठी उपयुक्त आहेत. उद्योजकांनी स्टार्टअप सीक्रेट्स फ्रॉम रामायण हे पुस्तक एकदा तरी वाचणं अत्यंत गरजेचं आहे.
संबंधित व्हिडिओ