पुस्तक | श्रीमंत होण्याची तुमची असीम शक्ती |
लेखक | जोसेफ मर्फी |
अनुवाद | नवनाथ लोखंडे |
पृष्ठसंख्या | १८१ |
प्रकाशन | मंजुळ प्रकाशन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४ | ५ |
"युअर इन्फायनाईट पॉवर टू बी रिच" या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजेच "श्रीमंत होण्याची तुमची असीम शक्ती". हे पुस्तक प्रामुख्याने तुमच्या सुप्त मनाची शक्ती वापरून श्रीमंतीच्या मार्गावर जाण्याबद्दल आहे. पुस्तकात लेखकाने सुप्त (अवचेतन) मनाची शक्ती आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व आणि त्या विचारांचा मनावर होणारा परिणाम अधोरेखित केला आहे.
"पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माईंड" या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक जोसेफ मर्फी यांनी श्रीमंत होण्यासाठी सुप्त मनाचा वापर कसा करता येईल, हा विषय या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकात असंख्य उदाहरणे दिली आहेत, तसेच बायबलमधील काही वचने आहेत. या उदाहरणांतून वाचकांनी विषय गांभीर्याने घ्यावा असे लेखकाला अभिप्रेत असावे, पण मला या उदाहरणांतून एक पॅटर्न दिसून आला. ही उदाहरणे सहसा "असे केल्याने या व्यक्तीचे जीवन बदलले" अशा प्रकारची आहेत, पण त्या व्यक्तीची नावे त्यात नमूद केलेली नाहीत. शेवटी, वाचकांना या उदाहरणांवर किती विश्वास ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पुस्तकातील शेवटची दोन प्रकरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. या विषयाचे सार तुम्हाला या दोन प्रकरणांत सापडेल. पुस्तकाचा अनुवाद बऱ्यापैकी छान झाला आहे, पण काही ठिकाणी व्याकरणातील चुका सहजपणे लक्षात येतात.
काही वाचकांना हा विषय अतिशयोक्ती वाटू शकतो. पण अवचेतन मनाचा उपयोग करून विचारांमध्ये आणि आचरणामध्ये थोडा देखील फरक पडणार असेल तर नक्कीच तो प्रयत्न करायला हरकत नाही. हे पुस्तक तुमच्या मनातील पैशांविषयी काही गैरसमजुती दूर करेल, पैशांविषयी साकारात्मकता निर्माण करेल, सुप्त मनाला संदेश कसे द्यावेत हे सांगेल, तसेच सुप्त मनाला तुम्ही तुमच्या आणि समाजाच्या फायद्यासाठी कसे वापरून घेऊ शकता याबद्दल मार्गदर्शन करेल. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी तुम्हाला मुद्देसूद सारांश वाचायला मिळतील. एकूणच "श्रीमंत होण्याची तुमची असीम शक्ती" हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे असं आहे; त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.