शिवावरील तीन पुस्तकांची मालिका - अमिश त्रिपाठी | Shiva Trilogy - Amish Tripathi | Marathi Book Review


पुस्तक शिवावरील तीन पुस्तकांची मालिका
लेखक अमिश त्रिपाठी
अनुवाद डॉ. मीना शेटे - संभू
प्रकाशन अमेय प्रकाशन
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.४ | ५


सामान्य व्यक्तींना देवत्व प्राप्त होते ते त्यांच्या कर्मांमुळे. या धाग्यालाधरून लेखक अमिश त्रिपाठी यांनी शिवावरील तीन पुस्तकांची मालिका लिहिली आहे. दंतकथा आणि भारतीय पुराणांमध्ये वर्णन केलेले देवदेवता जर आपल्यासारखेच सामान्य मनुष्य असतील तर?? त्यांनी केलेले कार्य पुढील पिढीपर्यंत पोचवताना त्यांना देवत्व प्राप्त झाले असेल तर??

बँकिंग क्षेत्रात काम करत असताना लेखक अमिश त्रिपाठी यांनी भारतीय पुराण वाचायला सुरुवात केली आणि पुढे त्यांनी शिवावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. पण पुस्तक प्रकाशनासाठी ३५ ते ४० प्रकाशकांनी नकार दिला. शेवटी फेब्रुवारी २०१० मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले आणि या पुस्तकाने इतिहास रचला. भारतीय साहित्यविश्वात ही सर्वात जास्त वेगाने विकलेली पुस्तकांची मालिका ठरली. अनेक मान्यवरांनी या पुस्तक मालिकेची प्रशंसा केली आहे. ही पुस्तकांची मालिका भारतीय भाषांसह परकीय भाषांमध्ये देखील अनुवादित झाली आहे आणि लोकप्रिय देखील झाली आहे.

ही कथा आहे तिबेटमधून मेलुहामध्ये स्थलांतरित झालेल्या शिवाची. शिवा हा एक विलक्षण योद्धा आहे. तो एका रानटी कळपात राहत असला तरी तो हळवा आहे, स्वतंत्र निर्णय घेण्याइतका सक्षम आहे आणि नेतृत्वगुण त्याच्या अंगी आहेत. मेलुहात आल्यानंतर तो नीलकंठ होतो. प्रजेचं प्रेम त्याला मिळतं. तो मेलुहासाठी चंद्रवंशीयांसोबत (आणि त्यांच्यासोबत असलेल्या नाग लोकांविरुद्ध) युद्ध करतो. पुढे मित्राच्या मृत्यूच्या सुडासाठी तो नाग लोकांच्या मागावर जातो. नीलकंठ हा रक्षणासाठी अवतरतो, हा लोकांचा समज असल्याने शिवाला भारतवर्षात सगळीकडे सन्मान मिळतो. कथा जशी पुढे सरकते, तशी अनेक गुपितं उघड होतात. शिवाला भारतवर्षाच्या मुळावर उठलेल्या सैतानाचा विनाश करायचा आहे. सैतान कोण आहे?? शिवा सैतानाला हरवतो का?? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मालिकेत मिळतील.

कथेत अनेक पौराणिक संदर्भ आहेत. हे संदर्भ आजच्या वस्तुस्थितीशी बांधण्यात आले आहेत, जसे की सरस्वती नदी लुप्त होण्यामागे तत्कालीन लोभ कारणीभूत होता. पुस्तकात शिवा आणि सती यांची प्रेमकथा आहे. तुंबळ युद्ध आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान आहे. कथेत अनेक पात्र आहेत, त्यातील अनेकांची नावे आपण जाणतो. कार्तिक आणि गणेशमधील बंधूप्रेम आहे. कथेचा कालखंड मोठा आहे आणि कथा तुम्हाला तत्कालीन भारतवर्षाच्या सर्व भागात फिरवून आणेल.

पुस्तक वाचताना लेखकाचा अभ्यास प्रकर्षाने जाणवतो. तिन्ही पुस्तकांचे मुखपृष्ठ अप्रतिम आहेत. मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. पुस्तकांच्या आतील बाजूला तत्कालीन भारताचा नकाशा आहे. पुस्तकाच्या शेवटी शब्दकोश आहे, ज्यात कथेतील नवीन शब्दांची माहिती दिली आहे.

या मालिकेतील पुस्तकं वाचताना वाचकांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की या कथेत पौराणिक संदर्भ जरी असले तरीही ही एक काल्पनिक कथा आहे. कारण कथेत आपण इतके हरवून जातो आणि पौराणिक संदर्भ इतके अचूक वापरले आहेत की आपण हेच सत्य मानायला लागतो.

हर हर महादेव.
आपण सारेच महादेव आहोत, आपण सारेच देव आहोत.


मेलुहाचे मृत्युंजय

रहस्य नागांचे

शपथ वायुपुत्रांची





संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने