Secrets of the Millionaire Mind | सिक्रेट्स ऑफ मिलियनेर माईंड | T. Harv Eker | टी. हार्व एकर | Marathi Book Review | मराठी पुस्तक समीक्षण



लेखक टी. हार्व एकर
अनुवाद म्रीनल काशीकर
पृष्ठसंख्या २१४
प्रकाशन मंजुळ पब्लिशिंग हाऊस
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.२ | ५


"पैसे झाडाला लागतात का?" हे वाक्य आपण लहानपणापासून कदाचित असंख्य वेळा ऐकलं असेल. या वाक्याऐवजी आपण "पैशांचं झाड कसं बनवता येईल?" हे वाक्य ऐकत मोठे झालो असतो, तर कदाचित आपली आर्थिक स्थिती आजच्या तुलनेत कैक पटींनी उत्तम असती. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? ज्यांनी कोणी अवचेतन मनाबद्दल वाचलं आहे, त्यांना हे नक्कीच समजलं असेल की तुम्ही तुमच्या मनाला जे प्रश्न सोडवायला सांगता, ते प्रश्न तुमचं मन या ना त्या मार्गाने सोडवतचं.

आपली मानसिकता बहुतेक वेळा आपल्या पालकांनी, नातेवाइकांनी, मित्रांनी आणि सभोवतीच्या व्यक्तींनी घडवलेली असते. ही मानसिकता तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी पूरक असेलच, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. श्रीमंत व्यक्ती सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने विचार आणि कृती करतात. श्रीमंत लोकांची मानसिकता कशी असते आणि ती जाणून घेऊन ती तुम्ही स्वतःसाठी कशी वापरू शकता, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला "सिक्रेट्स ऑफ मिलियनेर माईंड" या पुस्तकात मिळतील.

पुस्तक जर श्रीमंत मानसिकता घडवण्याबद्दल असेल, तर लेखक सुद्धा श्रीमंत असायलाच हवा, आणि तो आहे (टी. हार्व एकर यांची नेट वर्थ ३ मिलियन डॉलर्स आहे *डिसेंबर २०२०). पुस्तक मुख्यत्वे तुमची आर्थिक मानसिकता बदलण्यावर भर देतं. जे तुम्ही यापूर्वी शिकला आहात, कदाचित तुम्हाला ते विसरून नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. पुस्तकात १७ "वेल्थ फाइल्स" दिल्या आहेत, ज्या प्रामुख्याने श्रीमंत आणि सामान्य लोकांच्या विचारांमधील तफावत दर्शवतात. त्या कशा प्रकारे तुम्हाला श्रीमंत मानसिकता आत्मसात करण्यासाठी उपयोगी ठरतील, तेही लेखकाने सविस्तरपणे मांडलं आहे. पुस्तकाचा सारांश असा आहे की तुम्हाला स्वतःला घडवणे आणि तुमच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन नवीन गोष्टी आत्मसात करणे महत्त्वाचं आहे.

हे पुस्तक, "थिंक अँड ग्रो रिच" आणि "रिच डॅड पुअर डॅड" या दोन्ही पुस्तकांपेक्षा उजवं ठरतं. पुस्तक वाचनीय तर आहेच, पण शक्य असल्यास या पुस्तकाचं ऑडिओबुक ऐकावं, कारण ते अधिक प्रभावी ठरतं. एकूणच मानसिकता घडवण्यासाठी वेळ आणि परिश्रम दोन्ही आवश्यक आहेत. जर तुम्ही झटपट श्रीमंतीच्या शोधात असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. आणि पुस्तक वाचण्याआधी किंवा ऐकण्याआधी, अवचेतन मनाबद्दल थोडी माहिती वाचल्यास पुस्तकातील काही संकल्पना चटकन समजतील. एकूणच, टी. हार्व एकर लिखित "सिक्रेट्स ऑफ मिलियनेर माईंड" हे पुस्तक सर्वांनी वाचलंच पाहिजे असं आहे.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने