पुस्तक | संपूर्ण शेरलॉक होम्स |
लेखक | आर्थर कॉनन डायल |
अनुवाद | गजानन क्षीरसागर |
पृष्ठसंख्या | ९६५ |
प्रकाशन | अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
सर आर्थर कॉनन डायल यांनी १८८७ ते १९२७ या कालावधीत शेरलॉक होम्सवर एकूण ६० कथा लिहिल्या. या कथा जगभरात प्रचंड लोकप्रिय झाल्या आणि आजही त्या आवडीने वाचल्या जातात. या कथांवर असंख्य मालिका, चित्रपट, आणि नाटकं आली आणि गेली. मुळात शेरलॉक होम्स हे व्यक्तिमत्त्वच लेखकाने इतक्या ताकदीने उभं केलं आहे की त्याची तुम्हाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.
शेरलॉक होम्स हे एक काल्पनिक पात्र आहे, पण त्याची लोकप्रियता एवढी आहे की लंडनमध्ये त्याच्या नावाचं संग्रहालय आहे. पुस्तकात दिलेला पत्ता म्हणजेच २२१ बी बेकर स्ट्रीट हा आता सर्वश्रुत झाला आहे.
या कथा शेरलॉक होम्स या खाजगी गुप्तहेराच्या आहेत. या कथा आपण डॉ. वॉटसन म्हणजेच शेरलॉकचा मित्र आणि त्याला प्रत्येक रहस्य सोडवण्यात मदत करणारा साथीदार याच्या दृष्टीने वाचतो. शेरलॉक एक अवलिया व्यक्तिमत्त्व आहे. गुन्हा कोणी केला आहे ते शोधण्याची त्याची स्वतःची एक पद्धत आहे. त्याची बुद्धी प्रचंड वेगाने काम करते आणि गुन्ह्यांतील पुरावे जोडण्यासाठी तो चिलीम ओढून शांतपणे विचारांच्या जगात हरवून जातो आणि एका ठाम निष्कर्षापर्यंत येतो, आणि त्याचा निष्कर्ष सहसा चुकत नाही.
शेरलॉकच्या गुन्ह्याचा माग काढायच्या पद्धती लेखकाने कल्पना करून लिहिल्या होत्या, पण त्या वाचकांना वास्तविक वाटतात आणि त्यामुळेच तत्कालीन लंडन पोलिसांनी खुद्द लेखकालाच गुन्ह्याच्या तपासासाठी पाचारण केलं होतं. आजही या पद्धतींचा अभ्यास पोलीसखात्यांमध्ये होतो.
पुस्तक वाचताना या व्यक्तिमत्त्वाचा तुमच्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही बरेच दिवस बारीकसारीक गोष्टींचं निरीक्षण करू लागाल. कथेचा कालखंड २० व्या शतकातील आहे आणि कथा इंग्लंडच्या विविध भागांमध्ये घडते. कथेत असलेली नावं आणि स्थळं मराठी वाचकांना लक्षात ठेवताना थोडी कसरत करावी लागते. प्रत्येक कथा तुम्हाला शेरलॉकबरोबर एका रहस्यमयी जगात घेऊन जाते, आणि तुम्ही देखील त्या रहस्याचा तितक्याच उत्कटतेने उकल करण्याचा विचार करू लागता.
अर्थातच, या कथा कुतूहल वाढवतात, विचार करायला भाग पाडतात. या कथा २० व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिल्या होत्या, त्यामुळे तत्कालीन इंग्रजी आणि पार्श्वभूमी समजून घेऊन अनुवाद करणे म्हणजे मोठं आव्हानात्मक काम आहे, आणि ते गजानन क्षीरसागर यांनी उत्तमरीत्या पूर्ण केलं आहे. हा कथासंग्रह मराठीत आणल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. जर तुम्हाला रहस्यकथा आवडत असतील, तर संपूर्ण शेरलॉक होम्स तुमच्यासाठी पर्वणी ठरेल.