पुस्तक | रिच डॅड पुअर डॅड |
लेखक | रॉबर्ट कियोसाकी |
अनुवाद | अभिजित थिटे |
पृष्ठसंख्या | २०१ |
प्रकाशन | मंजुळ पब्लिशिंग हाऊस |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४ | ५ |
मराठी भाषेत आर्थिक शिक्षण या विषयावर फार कमी लेखन झालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं "रिच डॅड पुअर डॅड" या पुस्तकाचं मराठी भाषांतर ही उणीव भरून काढतं. हे पुस्तक म्हणजे पैशांबद्दल असलेल्या प्रस्थापित विचारांना आव्हान आहे.
बालपणीपासून अर्थाजनाविषयी झालेले दोन वेगवेगळे संस्कार यांविषयी रॉबर्ट यांनी कथा गुंफून आर्थिक शिक्षण हा रटाळ विषय मनोरंजक बनवला आहे. रॉबर्ट यांचे वडील (ज्यांचा उल्लेख 'पुअर डॅड' असा केला आहे) हे एक शिक्षक आहेत, तर रॉबर्टच्या मित्राचे वडील (जे रॉबर्टचे आर्थिक गुरु आहेत आणि ज्यांना रॉबर्ट 'रिच डॅड' म्हणतात) हे दोघं पैशांबद्दल परस्परविरोधी विचारसरणीचे आहेत. या परस्परविरोधी विचारसरणीतच रॉबर्ट वाढले. त्यांनी दोन्ही विचारसरणीचे परिणाम जवळून पाहिले आणि पुढे आयुष्यात त्यांनी दोन्हीही विचारसरणी वापरून पाहिल्या. शेवटी त्यांनी 'रिच डॅड' विचारसरणीचं अनुसरण केलं.
'पुअर डॅड' नेहमी काटकसरीने वागून पैशांबद्दल आकुंचित विचार करत, तर 'रिच डॅड' पैशाने आणखी पैसे कसे मिळवता येतील याकडे लक्ष देत. या पुस्तकात प्रचलित आर्थिक समजुतींना सरळ आव्हान दिलं आहे. कॅशफ्लोचा सिद्धांत सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या शब्दांत लेखकाने मांडला आहे, आणि तोच या पुस्तकाचा गाभा आहे.
हे पुस्तक वाचून तुम्ही लगेचच श्रीमंत व्हाल असं नाही, पण जर तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडू इच्छित असाल, तर हे पुस्तक तुम्हाला दिशा दाखवू शकेल. रॉबर्ट यांनी त्यांच्या आयुष्याची बरीच वर्षे नोकरी करण्यात घालवली, नंतर त्यांनी रिअल इस्टेटमधून तुफान पैसे कमावले आणि त्यानंतर हे पुस्तक लिहिलं. रॉबर्ट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतही एक पुस्तक लिहिलं आहे.
अभिजित थिटे यांनी अनुवाद उत्तमरित्या केला आहे. 'रिच डॅड पुअर डॅड' हे पुस्तक सर्वांनी एकदातरी वाचावं, आणि विशेषतः तुमच्या मुलांना आर्थिक शिक्षणासाठी हे पुस्तक वाचायला द्यावं.