The Secret Of The Nagas | रहस्य नागांचे | Amish Tripathi | अमिश त्रिपाठी


लेखक अमिश त्रिपाठी
अनुवाद डॉ. मीना शेटे - संभू
पृष्ठसंख्या ४२०
प्रकाशन अमेय प्रकाशन
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.५ | ५


शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरे पुस्तक.

मागील भागात बृहस्पतींच्या हत्येनंतरची कथा या भागात पुढे नेली आहे. शिवा ज्या नाग योद्ध्याच्या मागावर आहे, तो योद्धा आता सतीच्या मागावर आहे. हा नाग योद्धा नक्की कोण आहे, हे वाचणेच जास्त इष्ट, कारण वाचकांसाठी हा एक धक्का असेल. शिवा सैतानाच्या शोधात आहे आणि हा शोध त्याला नागांपर्यंत पोचवेल, असा त्याला ठाम विश्वास आहे.

कथा जरी साधी सरळ वाटत असली, तरी या कथेत असंख्य पात्र, कट-कारस्थान आणि राजकारण आहे. पुराणांतील बरेच संदर्भ या कथेत सुंदररित्या गुंफले आहेत. कथा तुम्हाला भारतातील प्राचीन शहरांची सफर घडवून आणेल आणि तुम्हाला त्यांचा रंजक इतिहास देखील उमजेल. अमिश यांच्या लेखनशैलीचे कौतुक करावे लागेल, पण अनुवाद करताना कथेच्या मूळ गाभ्याला जराही धक्का लागू दिला नाही, याबद्दल डॉ. मीना शेटे - संभू यांना हि तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. हा अनुवाद इतका चपलख आहे की मूळ कथा मराठी भाषेतच लिहिली आहे की काय, असं वाटून जातं.

कथा पुढे सरकत असताना शिवाचं तत्वज्ञान आजच्या काळानुसार देखील योग्य आहे, असं वाटतं. तीन पुस्तकांच्या मालिकेतील "रहस्य नागांचे" हे पुस्तक लोकांच्या अधिक पसंतीस पडते, कारण यात कथा इतक्या कलाटण्या घेतात की तुम्हाला पुढे नक्की काय होईल, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहते. आणि ज्या पद्धतीने रहस्य उघड होतात, ते बघून अजूनच आश्चर्य होतं.

या भागातील युद्ध प्रसंगदेखील वाचकाच्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभारण्यात लेखक यशस्वी ठरतो. कथेच्या शेवटी, जेव्हा शिव त्याच्या ताफ्यासोबत 'पाताळ लोकात' पोचतो, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. या पुस्तकाच्या शेवटच्या दोन ओळी एक मोठ्या रहस्याचा खुलासा करतात आणि "रहस्य नागांचे" पुस्तक वाचल्याचं समाधान देतात. लेखक अमिश त्रिपाठी यांनी असाच धक्का तंत्र प्रभू रामचंद्रांवरील पुस्तकांच्या मालिकेतदेखील वापरला आहे.

या कथेच्या पुढच्या भागात, म्हणजेच "शपथ वायुपुत्रांची", शिवाचा सैतानाशी लढा आहे.

अर्थात, कथा काल्पनिक असली तरी असं वाटत राहतं की जर हेच सत्य असेल तर?? हाच आपला इतिहास असेल तर??




संबंधित व्हिडिओ





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने