लेखक | अमिश त्रिपाठी |
अनुवाद | डॉ. मीना शेटे - संभू |
पृष्ठसंख्या | ४८८ |
प्रकाशन | अमेय प्रकाशन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील पहिले पुस्तक.
मेलूहा ही प्रभू रामचंद्रांची भूमी. या भूमीत तिबेटवरून आलेला एक स्थलांतरित 'शिवा' नीलकंठ होतो आणि संपूर्ण भारतवर्षातच आशास्थान बनतो. चंद्रवंशीयांचा पराभव करण्यासाठी शिवा मेलूहाच्या बाजूने युद्धात उतरतो. या प्रवासात त्याला प्रजेचं प्रेम मिळतं, नवीन मित्र मिळतात आणि त्याची सहचारिणी सती मिळते.
मेलुहाचे मृत्युंजय हे अमिश यांच्या कल्पविश्वातील पहिले पुस्तक. जर तुम्ही अमिशचे इतर कोणतेही पुस्तक वाचले नसेल तर तुम्हाला अमिशची लेखणी आश्चर्यचकित आणि मंत्रमुग्ध करणार आहे. अगदी सुरुवातीपासूनच कथा तुम्हाला एका तत्कालीन भारतवर्षात घेऊन जाते आणि तुमच्या मनाची पकड घेते. कथेचा नायक अर्थातच शिवा हा तिबेटमधून मेलूहामध्ये येतो. सोमरस प्यायल्यानंतर त्याचा कंठ निळा होतो. मेलुहातील दंतकथेनुसार नीलकंठ त्यांच्या रक्षणासाठी अवतरतो. शिवा जर सामान्य पुरुष आहे तर तो नीलकंठ का होतो? शिवाला कोणाचं रक्षण करायचं आहे? याचं उत्तर तुम्हाला या मालिकेतील तिसऱ्या पुस्तकात मिळेल.
लेखकाने तत्कालीन समाज, नगरव्यवस्था, भूगोल यांचा सखोल अभ्यास केल्याचं दिसून येतं. शिवाचं तत्वज्ञान उत्तम आहे, तो प्रचलित अनिष्ट रूढी झुगारून देऊ शकतो. तो स्वतंत्र विचार करण्यास सक्षम आहे. तो एक विलक्षण योद्धा आहे. असं असलं तरीही त्याला माहित असलेल्या गोष्टींपेक्षा मेलूहा आणि संपूर्ण भारतवर्षात बऱ्याच घडामोडी घडत आहेत, ज्याचा सामना त्याला पुढे जाऊन करायचा आहे.
दर्जेदार कथा, उत्तम तत्वज्ञान, अप्रतिम युद्धप्रसंग, इतिहासाची जोड, गुपितं आणि धक्कादायक शेवट यांमुळे मेलुहाचे मृत्युंजय वाचणे हे वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. हे पुस्तक एका अशा वळणावर येऊन संपतं की तुम्हाला याचा पुढचा भाग रहस्य नागांचे वाचायची उत्सुकता होते.