लेट्स टॉक मनी - मोनिका हलन | Let's Talk Money - Monika Halan | Book Review in Marathi


पुस्तक लेट्स टॉक मनी
लेखक मोनिका हलन
पृष्ठसंख्या २०४
प्रकाशन हार्पर बिसनेस
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.२ | ५


अर्थ विषयक भारतीय मानसिकता तशी पारंपरिक आणि कमी जोखीम घेण्यावर भर देणारी आहे. सोनं खरेदी करणे ही भारतीयांची आवडती गुंतवणूक आहे. पण वेळेनुसार ही मानसिकता बदलली पाहिजे का? गुंतवणुकीसाठी इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? कोणते म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी योग्य आहेत? रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का? इन्शुरन्स पॉलिसीज गरजेच्या आहेत का? निवृत्ती नियोजन कसं केलं पाहिजे? किती गुंतवणूक केली पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मोनिका हलन लिखित "लेट्स टॉक मनी" या पुस्तकात मिळतील.

मोनिका हलन, मिंटच्या संपादिका आणि अर्थविश्वातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. "लेट्स टॉक मनी" या पुस्तकाद्वारे त्यांनी वैयक्तिक अर्थ नियोजन (पर्सनल फायनान्स) हा विषय सर्व वर्गातील वाचकांसाठी सहजतेने मांडला आहे. हे पुस्तक वाचून लोक कमी चुकीचे अर्थ विषयक निर्णय घेतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. पारंपरिक अर्थविषयक विचारसरणीच्या वाचकांसाठी नवीन जगाचे नवीन नियम, नवीन संधी यांच्याशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं; परंतु महागाईसोबत वैयक्तिक अर्थार्जन वाढवणे देखील गरजेचं आहे. त्यामुळे हे बदल आवश्यक आहेत. मोनिका हलन यांनी खूप सोप्या शब्दात गुंतवणूक म्हणजे काय, ती कशी आणि कधी करावी, कधी आणि कशात करू नये, पैसे तुमच्यासाठी काम कसे करतील या सर्व गोष्टी उत्तमरित्या मांडल्या आहेत.

"लेट्स टॉक मनी" हे पुस्तक तुम्हाला श्रीमंतीची वाट दाखवणार असलं तरी ते तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवणार नाही (अशी अपेक्षा कोणत्याही गुंतवणुकीकडून करणे चुकीचं आहे). तुमच्याकडे असलेले पैसे तुम्ही येणाऱ्या गरजांसाठी कसे इन्व्हेस्ट करू शकता यावर ते भाष्य करत आहेत. जर तुम्ही सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवून समाधानी असाल तर तुम्ही शक्यतो महागाईचा दर गाठू शकणार नाही. त्यासाठी इतर काही पर्याय पुस्तकात सुचवले आहेत.

पुस्तकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक फायनान्स ऍडवायजरसोबत संवाद साधत आहात असं वाटतं. अर्थात, वीणा फणसळकर यांनादेखील त्याच श्रेय द्यायला पाहिजे. पुस्तकात दिलेली उदाहरणे तर साधी, सोपी आणि मनाला भिडणारी आहेत आणि त्यातील बरेचसे प्रसंग तुम्ही अनुभवलेदेखील असतील. मोनिका हलन यांनी फक्त गुंतवणुकीबद्दल लिहीलंच नाही, तर त्यासोबत त्यांनी स्वतः ज्या गोष्टी अमलात आणल्या आहेत त्या बद्दलही लिहिलं आहे.

एकूणच मोनिका हलन यांचा अर्थविश्वाचा सखोल अभ्यास, उत्तम लेखनशैली, उत्कृष्ट उदाहरणे, सोप्या पद्धती आणि एकूणच अनेक भारतीयांसाठी उपयुक्त ठरेल असा वैयक्तिक फायनान्स प्लॅन या सर्व गोष्टी या पुस्तकाला वेगळ्याच उंचीवर ठेवतात. माझ्या मते "लेट्स टॉक मनी" हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने एकदा तरी वाचावं/ऐकावं असं आहे आणि हे पुस्तक नक्कीच अर्थ विषयक पुस्तकांमध्ये एक महत्त्वाचं स्थान निर्माण करेल.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने