हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल - डेल कार्नेगी | How To Win Friends And Influence People - Dale Carnegie | Book Review in Marathi


पुस्तक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल
लेखक डेल कार्नेगी
पृष्ठसंख्या ३१७
प्रकाशन फिंगरप्रिंट प्रकाशन
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन  | ५


१९३६ साली प्रकाशित झालेल्या "हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल" या पुस्तकाचा मराठी अनुवाद "प्रभाव पाडा आणि मित्र जोडा" हे पुस्तक या प्रकारातील इतर पुस्तकांपेक्षा नक्कीच उजवे आहे.

सुरुवातीलाच लेखक अशी ग्वाही देतो की जर तुम्ही पहिल्या तीन प्रकरणांमधून काही शिकला नाहीत, तर हे पुस्तक वाचन बंद करा. पण मला पुस्तकात दिलेल्या गोष्टी योग्य वाटल्या, त्यामुळे मी हे पुस्तक पूर्ण वाचले. थोडक्यात, पुस्तकात मित्र जमवण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी लोकांना जे आवडतं ते बोला, चांगले श्रोते व्हा, तक्रार करू नका, लोकांचे वाभाडे काढू नका (पुणेकरांसाठी विशेष) असे मुद्दे मांडले आहेत. आता हे मुद्दे २१व्या शतकात कितपत प्रॅक्टिकल आहेत, ते तुम्हीच ठरवा; कारण याबद्दल प्रत्येकाची वेगळी मतं असणार.

लेखकाची लेखणी (स्टोरीटेलिंग) वाखणण्याजोगी आहे. डेल कार्नेगीने हा रटाळ विषय वाचनीय बनवला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिवादन करायला हवं. अर्थात, लोकांवर प्रभाव पाडण्याविषयी लिहायचं म्हणजे लेखकाचं लेखन सुद्धा प्रभाव पाडण्यासारखंच हवं आणि ते प्रभाव पाडण्यात यशस्वी झालं आहे.

प्रकरणांची नावे तुमची उत्सुकता ताणतील. प्रत्येक प्रकरणातून तुम्हाला मित्र जोडण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी एक नवीन तत्व मिळेल.

माझ्या मते, हे पुस्तक तुमची वागण्या-बोलण्याची पद्धत घडवू शकते (अर्थात, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागेल; फक्त पुस्तक वाचून काही होणार नाही). हे पुस्तक म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुमची इंटरपर्सनल कम्युनिकेशन सुधारण्यास नक्कीच मदत करेल.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने