पुस्तक | हाऊ टू अव्हॉइड अ क्लायमेट डिसास्टर |
लेखक | बिल गेट्स |
पृष्ठसंख्या | २७२ |
प्रकाशन | एलेन लेन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.६ | ५ |
क्लायमेट चेंज किंवा जागतिक तापमानवाढ हा फक्त निबंध लिहिण्यासाठीचा विषय नसून मानवजातीसमोर उभे असलेले मोठे संकट आहे. औद्योगिक क्रांतीमुळे आतापर्यंत जागतिक तापमानात १.५ डिग्री सेल्सिअसच्या जवळपास वाढ झाली आहे. ज्याचे परिणाम वातावरण बदलांमधून आपण सर्वजण अनुभवत आहोत. जागतिक तापमानवाढीचा फटका सर्व देशांना कमी-अधिक स्वरूपात सध्या बसत आहे. २१०० पर्यंत जागतिक तापमानात ३ डिग्री सेल्सिअसची वाढ होणार आहे. ३ डिग्री म्हणजे खूप कमी असं जरी वाटत असेल, तरी जागतिक पातळीवर ही वाढ धोकादायक ठरू शकते. मानवजातीने एकत्र येऊन जरी या समस्येला तोंड दिलं तरी २१०० पर्यंत २ ते २.५ डिग्री सेल्सिअसची वाढ होणे अटळ आहे. उज्ज्वल भविष्यासाठी, विकासासाठी आणि पुढील पिढीसाठी या समस्येवर सर्व देशांनी एकत्रित येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळेच बिल गेट्स लिखित "हाऊ टू अव्हॉइड अ क्लायमेट डिसास्टर" हे पुस्तक आजमितीस सर्वात महत्त्वाच्या पुस्तकांपैकी एक आहे.
क्लायमेट चेंजबद्दल बिल गेट्स यांचा १० वर्षांहून अधिकचा अभ्यास, शेकडो शास्त्रज्ञांच्या भेटी, तंत्रज्ञानाची सखोल माहिती, आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे सहज शक्य असलेल्या गोष्टींमुळे हे पुस्तक एक अभ्यासपूर्ण, समजायला सोपं, तरीही सखोल माहिती देणारं ठरतं. पुस्तकातील सुरुवातीची प्रकरणं वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरित वायू कशा प्रकारे उत्सर्जित होतात याबद्दल आहेत. जागतिक तापमानवाढीत सर्वात जास्त योगदान वाहनांचे नसून, ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुस्तकातील शेवटची प्रकरणं जागतिक पातळीवर कोणत्या प्रकारची धोरणं राबवणे आवश्यक आहे, प्रत्येक देश क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी काय करू शकतो, सर्व देश एकत्रितपणे काय करू शकतात आणि आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो, याबद्दल लिहिलं आहे.
बिल गेट्स यांच्या मते, क्लायमेट चेंज रोखणे खूप कठीण आहे (जॉर्डन पीटरसन यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की मानवी इतिहास बघता पर्यावरण बदल रोखण्यासाठी सर्व मानवजात एकत्र येणार नाही). असं असलं तरी देखील हा बदल थांबवणे गरजेचं आहे. जागतिक तापमानवाढीस कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, याचं विश्लेषण करताना त्यांनी त्याचे परिणाम कोणत्या देशांत, कोणत्या वर्गाला, किती प्रमाणात होणार, यावर देखील भाष्य केलं आहे. पुस्तकात अनेक आलेख आणि आकडेवारी दिली आहे, जेणेकरून वाचकांना ती सहज समजतील. क्लायमेट चेंज हा विषय अतिशय क्लिष्ट असला तरी, तो खूप सोप्या पद्धतीने बिल गेट्स यांनी मांडला आहे. पुस्तकाची भाषा सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे.
थोडक्यात, "हाऊ टू अव्हॉइड अ क्लायमेट डिसास्टर" हे उत्कृष्ट पुस्तक आहे. या पुस्तकामुळे पर्यावरण बदलाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. कदाचित पुस्तक लिहिण्याचा बिल गेट्स यांचा तोच हेतू असावा. पुस्तकाची उत्कृष्ट मांडणी, बोलकी छायाचित्रं, माहितीशीर आलेख आणि सुटसुटीतपणा यामुळे पुस्तक उजवं ठरतं. हे पुस्तक सर्वांनी वाचायलाच हवं. जरी तुम्हाला क्लायमेट चेंजबद्दल विशेष रुची नसेल तरीही, काहीही नसेल तर देशाच्या विकासात कोणत्या गोष्टी हातभार लावतात, त्यामागचं अर्थशास्त्र आणि त्याचे दूरगामी परिणाम हे सर्व जाणून घेण्यासाठी तर नक्कीच हे पुस्तक वाचायला हवं. विशेषतः, बिल गेट्स यांचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत, कारण त्यांना एवढं अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिण्याची आणि पूर्ण मानवजातीला पर्यावरण बदलाशी लढण्याची ब्लूप्रिंट तयार करायची तशी बघायला गेलं तर काहीच गरज नाही.
(*क्लायमेट चेंजबद्दल अजून एक विरुद्ध मतप्रवाह आहे, ज्यात क्लायमेट चेंज म्हणजे काही सामर्थ्यशाली लोकांनी चालवलेली खोटी गोष्ट आहे, असं मानलं जातं. माझ्या वैयक्तिक मतानुसार तो मतप्रवाह चुकीचा आहे).