Fast Cheap & Viral | फास्ट चीप & व्हायरल | Aashish Chopra | आशिष चोप्रा


लेखक आशिष चोप्रा
अनुवाद रोहिणी पेठे
पृष्ठसंख्या २२४
प्रकाशन साकेत प्रकाशन
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.१ | ५


फास्ट चीप & व्हायरल हे पुस्तक अत्यल्प खर्चात आणि कमीत कमी वेळेत व्हिडिओ कसे बनवायचे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचवायचे याविषयी आधारित आहे. लेखक आशिष चोप्रा हे "व्हायरल कंटेंट" आणि त्याद्वारे "ब्रँड मार्केटिंग" यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी काम करत असलेल्या इक्सिगो या कंपनीसाठी अनेक व्हायरल व्हिडिओ बनवले आहेत. पुस्तकात त्यांनी स्वतःचा "व्हायरल कंटेंट" बनवण्याचा अनुभव आणि त्यामागील विचारसरणी सांगितली आहे. कंटेंटने व्यापून गेलेल्या आजच्या जगात तुम्ही बनवलेला कंटेंट व्हायरल कसा होईल? "व्हायरल" होणे म्हणजे नक्की काय? व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? जाहिरात न विकता जाहिरात करता येणे शक्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील.

आशिष चोप्रा यांनी वारंवार "व्हायरल व्हिडिओ" बनवून सिद्ध केलं आहे की, जर विचारपूर्वक पद्धतीने व्हिडिओ बनवून आणि योग्य वितरण पद्धत निवडून, एखादा ब्रँड लोकांपर्यंत पोचवता येतो. "व्हायरल व्हिडिओ" बनविण्यामागील नऊ गुपिते तुम्हाला या पुस्तकातून कळतील, आणि ही गुपिते खरंच काम करतात! (इनसाईड मराठी बुक्सच्या टीमने पुस्तकातील गुपितांनुसार १५ सेकंदांचा एक व्हिडिओ बनवला, ज्याला सोशल मीडियावर १२ तासांत ३० हून अधिक शेअर्स मिळाले).

मी स्वतः तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्याने, मी नेहमी "कंटेंट" लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तांत्रिक गोष्टींचाच विचार करायचो, पण फास्ट चीप & व्हायरल या पुस्तकामुळे मला "कंटेंट" मागील मानसशास्त्र देखील तितकेच महत्त्वाचे असते हे समजले. ग्राहकांना जाहिरात न दाखवता त्यांच्यापर्यंत ब्रँड पोचवण्याची पद्धत भारतात लोकप्रिय करण्यामागे आशिष चोप्रा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी पुस्तकात मांडलेली गुपिते समजायला सोपी आहेत. विषयांची सुटसुटीत मांडणी, प्रकरणांतील महत्त्वाच्या लक्षवेधक टिपण्ण्या, आणि बोजड शब्दांचा टाळलेला भडीमार ही पुस्तकाची जमेची बाजू आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले फास्ट चीप & व्हायरल हे पुस्तक मार्केटिंग तज्ज्ञांनादेखील पुनर्विचार करायला भाग पाडेल इतकं प्रभावी आहे. पुस्तकात अद्ययावत अॅप्स, प्लॅटफॉर्म्स, आणि नवनवीन व्हिडिओ फॉरमॅट्सबद्दल लेखकाची मतं दिली आहेत. पुस्तक वाचून तुम्हीदेखील "व्हायरल कंटेंट" बनवू शकता यावर तुमचा विश्वास बसेल. पुस्तकाचा मराठी अनुवाद रोहिणी पेठे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केला आहे. एकूणच हे पुस्तक कंटेंट क्रिएटर, व्हलॉगर, ब्लॉगर, मार्केटिंग, वितरण, जाहिरात, लेखन क्षेत्रातील लोकांसाठी आणि जवळजवळ सर्वच सर्जनशील लोकांसाठी आहे.




संबंधित व्हिडिओ


Post a Comment

Previous Post Next Post