पुस्तक | स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र |
लेखक | वॉलटर आयझॅक्सन |
अनुवाद | विलास साळुंके |
पृष्ठसंख्या | ६०८ |
प्रकाशन | डायमंड पब्लिकेशन्स |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.९ | ५ |
स्टीव्ह जॉब्ज हा एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान क्षेत्रातील जादूगार होता. त्याने जगाला मॅकिन्टॉश कॉम्प्युटर, आयपॉड, आयफोन, आयपॅड अशी अचंबित करणारी उपकरणं दिली. करिअरच्या सुरुवातीला मिळालेलं अद्भुत यश आणि तिशीत स्वतःच्या कंपनीतून झालेली हकालपट्टी, त्यानंतर पुन्हा मिळालेलं अद्भुत यश - असे टोकाचे दिवस त्याने अनुभवले. कॅन्सरसारख्या दुर्दैवी आजारानेही न डगमगता त्याने नवनवीन उपकरणं सादर करण्याचा सपाटा लावला आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकावर आपलं वर्चस्व ठेवलं.
स्टीव्ह जॉब्जचं हे अधिकृत चरित्र मी आतापर्यंत तीन वेळा वाचलं आहे. हे चरित्र वाचताना स्टीव्ह जॉब्ज तुमच्या अवतीभवती फिरत असल्याचा भास होतो, यातच लेखकाचं यश मानायला हवं. विलास साळुंके यांनी अनुवादाचं शिवधनुष्य उत्तमरित्या पेललं आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक संदर्भांचा अनुवादही त्यांनी चोख केला आहे. पुस्तकात असलेली स्टीव्ह जॉब्जची छायाचित्रे अप्रतिम आहेत.
या चरित्रात स्टीव्ह जॉब्जने त्याच्या मित्रासोबत अॅपल कंपनी कशी सुरू केली याची प्रेरणादायी कथा आहेच, पण त्याबरोबरच स्टीव्हच्या स्वभावाचे विविध पैलू लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. स्टीव्ह जॉब्जचा बंडखोर स्वभाव अॅपलच्या डीएनएमध्ये नकळतच कसा आला हेही आपल्याला समजतं.
आपल्याकडे उपकरणांच्या डिझाईनबाबत जास्त उत्सुकता दिसून येत नाही, पण स्टीव्हचं डिझाईनबद्दल असलेलं प्रेम बघून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. त्याच्या डिझाईनच्या या वेडामुळेच अॅपलची सर्व उपकरणं आणि सॉफ्टवेअर अतिशय विचारपूर्वक बनवली जातात. स्टीव्हची अशी इच्छा होती की त्याला एक चिरंतन काळ टिकणारी कंपनी उभी करायची होती, जिथे लोक तंत्रज्ञानाच्या नवनवीन सीमा गाठतील, आणि त्यात तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. स्टीव्ह जॉब्जचं निधन २०११ साली झालं, पण त्यानंतरही अॅपलने आपलं वेगळेपण जपलं आहे आणि आजही तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवत आहे.
आज आपण वापरत असलेले कॉम्प्युटर खरंतर स्टीव्हच्या प्रयत्नांतूनच आलेले आहेत. सर्वसामान्यांसाठी बनवलेला पहिला कॉम्प्युटर मॅकिन्टॉश त्याने १९८४ मध्ये बाजारात आणला. मॅकिन्टॉश घडवण्याची त्याची धडपड आणि टीमकडून काम करून घेण्याच्या पद्धती भन्नाट आहेत. हे पुस्तक वाचून उपकरणं किंवा उत्पादन घडवताना बारीकसारीक गोष्टींकडे आपसूकच लक्ष देऊ लागाल.
हे पुस्तक काही मॅनेजमेंटशी निगडित नाही किंवा व्यवसायाशी संबंधित नाही. हे एक चरित्र आहे, पण यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, मॅनेजमेंटचे धडे मिळतील, आधुनिक व्यवसाय कसा करावा हे देखील कळेल.
जर तुम्ही कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी मेजवानी ठरेल. चरित्र जरी स्टीव्हच्या बालपणापासून पुढे सरकत असलं, तरी काही ठिकाणी लेखकाने भविष्यातील दुवे जोडले आहेत.
मला या चरित्रातील सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे "भैरवी." या प्रकरणात स्टीव्हचं मनोगत आहे. त्याचं मनोगत म्हणजे तंत्रज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड घालून मानवी जीवन कसं सुखकर करता येईल याविषयीचे त्याचे विचार.
एकविसाव्या शतकातील या महान नायकावर अनेक पुस्तकं आली, अनेक चित्रपट आले, पण या चरित्रातून तुम्हाला स्टीव्ह जॉब्ज जसा उलगडेल तसा तो इतर कोठेही उलगडणार नाही.