डू एपिक शिट - अंकुर वारिकू | Do Epic Shit - Ankur Warikoo | Book Review in Marathi


पुस्तक डू एपिक शिट
लेखक अंकुर वारिकू
पृष्ठसंख्या २९१
प्रकाशन जगरनॉट बुक्स
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन  | ५


प्रसिद्ध यूट्युबर आणि उद्योजक अंकुर वारिकू आपल्या यूट्यूब व्हिडिओजमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अर्थविषयक आणि तरुणांना मार्गदर्शक व्हिडिओज बनवण्यात ते तरबेज आहेत. फिक्स्ड डिपॉजिटवर त्यांचं विशेष लक्ष असतं. अंकुर त्यांच्या उत्पन्नाचा बराचसा भाग गरजूंना दान करतात. "डू एपिक शिट" असं विचित्र नाव असलेलं पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर अंकुर यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे की हे पुस्तक तुम्ही एका क्रमानेच वाचलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही कधीही कोणतंही पान उघडून हे पुस्तक वाचू शकता.

"डू एपिक शिट" हे पुस्तक म्हणजे अंकुर वारिकू यांनी जगलेल्या आयुष्याचं सार आहे. त्यांनी अनुभवांतून काय शिकले, त्यांचे विचार आणि मते स्पष्टपणे मांडली आहेत आणि तेही अगदी सोप्या आणि कमी शब्दांत. पुस्तक एकूण सहा भागांत विभागलेलं आहे: यश, अपयश, सवयी, जागरूकता, उद्योजकता, अर्थ आणि नातेसंबंध. तुम्हाला यातील कोणत्याही विषयावर सल्ला (किंवा अंकुर यांचा त्या विषयावरचा अनुभव) हवा असेल, तर ते प्रकरण उघडा आणि वाचा. हे पुस्तक एखाद्या गोष्टीसारखं लिहिलेलं नसून अंकुर यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांवरून लिहिलेलं आहे. प्रत्येक अनुभव आणि विचार हे बहुतांश एक ते दोन पानांत लिहिलेले आहेत. यांतूनच तुम्हाला अंकुर यांचा जीवनप्रवास देखील उलगडत जाईल. पुस्तकाच्या शेवटी अंकुर यांनी त्यांच्या मुलांसाठी लिहिलेली छोटेखानी पत्रे आहेत.

अंकुर वारिकू यांना उमजलेला जीवनप्रवास असा या पुस्तकाचा सोपा अर्थ आपण घेऊ शकतो. "डू एपिक शिट" हे एक नक्कीच वाचनीय पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्या मित्रासारखं तुम्हाला मार्गदर्शन करत राहील, जेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता भासेल.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने