पुस्तक | चिखल, घाम आणि अश्रू |
लेखक | बेअर ग्रील्स |
अनुवाद | अनिल / मीना किणीकर |
पृष्ठसंख्या | ४०८ |
प्रकाशन | मनोविकास प्रकाशन |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.५ | ५ |
"खतरे भी असली, हिरो भी असली"
असा गाजावाजा करत डिस्कव्हरी चॅनेलवरून मॅन व्हर्सस वाईल्ड हा कार्यक्रम प्रसारित झाला आणि बेअर ग्रील्स हे नाव जगभरातील घराघरात पोचलं. फार कमी लोक जाण्याचा प्रयत्न करतील अशा ठिकाणी बेअर ग्रील्स जाऊन जिवंत राहिला आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी कसं जुळवून घेऊन स्वतःला जिवंत ठेवायचं हे देखील तो आपल्या दर्शकांना सांगतो. चिखल, घाम आणि अश्रू हे पुस्तक म्हणजे बेअर ग्रील्सची जीवनकथा.
बेअरला लहानपणी त्याच्या वडिलांकडून गिर्यारोहणाचे धडे मिळाले आणि कदाचित त्यामुळेच साहस त्याच्या अंगी भिनले असावे. पुढे ब्रिटनच्या स्पेशल फोर्समध्ये भरती होण्याच्या स्वप्नासाठी त्याने घेतलेली मेहनत वाचून तुम्ही नक्की आश्चर्यचकित व्हाल. कोणताही सामान्य मनुष्य ब्रिटिश स्पेशल फोर्सची निवड प्रक्रिया बघून हात वर करेल; पण बेअर एकदा अपयश येऊनसुद्धा पुन्हा जिद्देने त्यात उतरला आणि यशस्वी झाला. नंतर आफ्रिकेत पॅराशूटच्या अपघातात त्याच्या पाठीची तीन हाडे मोडली; पण फक्त १८ महिन्यात तो त्यातून बरा झाला आणि त्याने जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एवरेस्ट सर केला, त्यावेळी त्याचं वय होतं फक्त २३ वर्षे.
बेअर ग्रील्स म्हणजे असामान्य साहस, चिकाटी आणि धैर्य. जगभरातील मान्यवर जसे की अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बेअरच्या मॅन व्हर्सस वाईल्ड या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. बेअर जरी असामान्य मनुष्य वाटत असला तरीही त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. जीवनकथा लिहित असताना तो स्वतःबद्दलच्या काही गोष्टी लपवू शकला असता; पण त्याने लिखाणात पारदर्शकता अवलंबली. अनुवादाचं काम योग्यरीत्या झालं आहे; त्यामुळे मराठीत हे आत्मचरित्र वाचताना अजून छान वाटतं.
अशा या रिअल लाईफ हिरोची ऍक्शनपॅक्ड, रोमांचक आणि धाडसी घटनाक्रमांनी भरलेली आत्मकथा वाचकाला खूप काही शिकवून जाते.