योगी कथामृत - परमहंस योगानंद | Yogi Kathamrut - Paramhans Yogananda | Autobiography of a Yogi | Marathi Book Review


पुस्तक योगी कथामृत
लेखक परमहंस योगानंद 
पृष्ठसंख्या ७५०
प्रकाशन योगदा सत्संग सोसायटी
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.५ | ५



आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं आणि शतकातील सर्वोत्तम १०० आध्यात्मिक पुस्तकांपैकी एक. योगी कथामृत (Autobiography of a Yogi) हे परमहंस योगानंद यांचं आत्मचरित्र आहे. परमहंस योगानंदांनी आपल्या बालपणापासून ते अमेरिकेपर्यंतचा आणि योगविद्या जगभर पोचवण्याचा प्रवास या पुस्तकात लिहिला आहे. शिवाय, या पुस्तकात त्यांच्या महासमाधीबद्दल देखील माहिती आहे. योगदा सत्संग सोसायटीच्या तर्फे प्रकाशित या पुस्तकात त्यांची आणि तत्कालीन साधू-संतांची अनेक छायाचित्रे दिली आहेत.

पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानापासूनच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पुस्तकाचा कालखंड १८९३ ते १९५२ चा असल्यामुळे, पुस्तकात ब्रिटिशकालीन भारताचे अनेक संदर्भ आहेत. पुस्तकात मानवी जीवन, उत्पत्ती, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन, विज्ञान, आणि अध्यात्म या सर्वांबद्दल लिहिलं आहे. सामान्य माणसाला माहित असलेल्या ज्ञानापेक्षाही विलक्षण ज्ञानाबद्दल ओळख या पुस्तकातून तुम्हाला होईल. लेखकाची लेखनशैली थोडी वेगळी आहे. योगविद्येबद्दलचं ज्ञान आपणास नवीन आहे, आणि कालखंड शतकापूर्वीचा आहे, त्यामुळे वाचकांना पुस्तक वाचणं किंचित कठीण वाटू शकतं. परंतु, या पुस्तकातून भारतातील योगविद्येबद्दल जी माहिती मिळणार आहे, त्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावं असं आहे.

पुस्तकात अनेक साधू-संतांबद्दल लिहिलं आहे आणि बऱ्याच संतांची छायाचित्रंही आहेत (जी एक दुर्मिळ गोष्ट आहे). नवीन पिढीला विसर पडलेल्या प्राचीन भारतातील विद्येबद्दल सर्वसामान्यांना माहिती करून देण्यासाठी या पुस्तकाचा प्रसार होणं गरजेचं आहे. हे पुस्तक ज्ञानी लोकांना देखील त्यांच्या रीतसर विचारसरणीला छेद द्यायला भाग पाडेल, आणि आपणास माहित असलेल्या गोष्टींपेक्षा मानवी जीवन आणि विश्व अधिक गूढ व रहस्यमयी आहे, याची जाणीव आपल्याला पदोपदी करून देतं.

थोडक्यात, हे पुस्तक विलक्षण आहे, आणि भारतीय संस्कृती, संतपरंपरा, योग, तत्वज्ञान, आणि विज्ञान याबद्दल जाणून घेण्यासाठी यापेक्षा योग्य पुस्तक असू शकत नाही.




संबंधित व्हिडिओ



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने