पुस्तक | छावा |
लेखक | शिवाजी सावंत |
पृष्ठसंख्या | ८५३ |
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ४.९ | ५ |
झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा
ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा...
शिवपुत्र संभाजी महाराजांचा जीवनप्रवास म्हणजे एक अग्निदिव्य. छत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब पाच लाखांचं सैन्य व चौदा कोटींचा खजिना घेऊन दख्खन जिंकायला निघाला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला नऊ वर्षे निकराचा लढा देऊन जेरीस आणला. दख्खन जिंकायला निघालेल्या या क्रूर औरंगजेबाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर विराजमान होता आलं नाही.
लेखक शिवाजी सावंत यांनी छावा सन १९७२ साली लिहायला घेतलं. लिखाणाच्या पहिल्याच दिवशी जगदंबेने कसा कौल दिला याबद्दल त्यांनी प्रस्तावनेत लिहलं आहे. किल्ले प्रतापगडावर १९७९ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते छावा प्रकाशित झालं आणि महाराष्ट्राच्या जनतेने या पुस्तकाला अक्षरशः डोक्यावर घेतलं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून या कादंबरीची सुरुवात होते. पुस्तकातील भाषेवर काळानुरूप मावळ प्रांतातील रांगडी भाषेचा प्रभाव आहे. लेखकाने ज्या पद्धतीने पात्रांच्या मनाचा कौल घेण्याचा प्रयन्त केला आहे तो विशेष. प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द तुमच्या मनाला भिडत राहतो आणि शंभुकाळ तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. काही प्रसंग लेखकाने इतके उत्तम लिहिले आहेत कि तुम्ही गडावर आहात आणि सर्व घडामोडी तुमच्या डोळ्यांदेखत घडत आहेत असा भास होतो.
पुस्तक जरी संभाजी महाराजांवर असलं तरीही शिवरायांचे पराक्रम संक्षिप्त स्वरूपात आहेत कारण शंभूराजे मोठे होत असताना छत्रपती शिवाजीराजे स्वराज्य वाढवत होते आणि अनेक संकटांचा सामना करत होते. छत्रपती संभाजीराजांना वयाच्या नऊव्या वर्षी आग्र्याला जावं लागलं आणि तेथून त्यांची आणि राजकारणाची ओळख झाली.
संभाजीराजे शूर योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते कविमनाचे देखील होते. त्यांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषणम काव्यरचना केली. एक योद्धा कवी असणे हि एक दुर्मिळ आणि विलक्षण गोष्ट. एकाचवेळी पाच आघाडयांवर झुंझ देणारा भारतातील किंवा कदाचित जगातील एकमेव धुरंधर सेनानी. शंभूराजे एकाचवेळी जंजिरेकर सिद्दी, इंग्रज, गोव्याचे फिरंग, मग्रूर औरंगजेब आणि स्वराज्यातील फितूर यासर्वांशी लढत होते. म्हणूनच शंभुराजांना स्वराज्यरक्षक म्हणतात.
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
फितुरीमुळे शुंभुराजांना झालेली अटक मनाला सलते. आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचार वाचून हृदयावर अणुकुचीदार शस्त्राने सपासप वार होतायेत असं वाटतं. जगाच्या पाठीवर कोणत्या राजाने सोसल्या नाहीत त्या यातना या छाव्याने सोसल्या पण मग्रूर औरंग्यासमोर शंभूराजे झुकले नाहीत.
लेखकाने संभाजीराजांच्या शौर्याला, त्यागाला पुरेपूर न्याय दिला आहे. तत्कालीन स्वराज्याच वर्णन अप्रतिम पद्धतीने केलं आहे. या पुस्तकातून सध्या बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये संदर्भ घेतल्याचं जाणवत. पुस्तकाचा विषय, भाषेच लहेजा, प्रसंगवर्णन, पराक्रम, त्याग, लेखकाचा अभ्यास आणि निष्ठा या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता छावा हे मराठी साहित्यातील शिरोमणी आहे. खंत हीच वाटते की शंभूराजांच बलिदान लोकांपर्यंत पोचलच नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने छावा एकदातरी जरूर वाचावे आणि हा इतिहास इतरांपर्यंत देखील पोचवावा.